Shivaji University Kolhapur

Shivaji University, established in 1962. It was inaugurated on 18th November, 1962.

30/05/2024

‘कॉमेलिनेसी ऑफ इंडिया’ संदर्भग्रंथाचे शिवाजी विद्यापीठात प्रकाशन

‘कॉमेलिनेसी ऑफ इंडिया’ हा संदर्भग्रंथ वनस्पतीशास्त्राच्या भावी संशोधकांसाठी एक महत्त्वाचा ठेवा आहे. अशा प्रकारचे संशोधन व संदर्भसंचय आपल्या हातूनही व्हावा, यासाठीची प्रेरणा वनस्पतीशास्त्राच्या अभ्यासक व संशोधकांनी यापासून घ्यावी, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतिशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. राजाराम गुरव आणि डॉ. मयूर नंदीकर यांनी अनेक वर्षांच्या परिश्रमातून संयुक्तपणे सिद्ध केलेल्या ‘कॉमेलिनेसी ऑफ इंडिया’ अर्थात ‘केना कुळातील भारतीय वनस्पती’ या महत्त्वपूर्ण संदर्भग्रंथाचे प्रकाशन अधिविभागाच्या नीलांबरी सभागृहात नुकतेच करण्यात आले. त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन कुलगुरू डॉ. शिर्के बोलत होते. कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह एमेरिटस संशोधक प्राध्यापक डॉ. एस. आर. यादव आणि पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञ डॉ. रितेश कुमार चौधरी यांच्या हस्ते या ग्रंथाचे अनावरण करण्यात आले.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, सन २०१३मध्ये पीएच.डी.चे संशोधन पूर्ण केल्यानंतरही या विषयातील संशोधन जारी ठेवून डॉ. मयूर नंदीकर आणि त्यांचे मार्गदर्शक डॉ. राजाराम गुरव यांनी एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला. त्यांच्या या समर्पणवृत्तीमुळेच वनस्पतीशास्त्राच्या एका शाखेमधील महत्त्वाचा संदर्भग्रंथ साकार झाला. अशा प्रकारच्या संशोधनासाठी खूप संयम लागतो तसेच वेळही द्यावा लागतो. त्याखेरीज भरीव असे संशोधन साकारणे अशक्य आहे, याची जाणीव ठेवून नवसंशोधकांनी आपल्या संशोधनकार्याला दिशा द्यावी, असेही त्यांनी सांगितले. यापुढील काळातही वनस्पतीशास्त्र अधिविभागातील संशोधकांकडून उत्तमोत्तम संशोधन साकारेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

डॉ. रितेश कुमार चौधरी म्हणाले, शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागातील संशोधकांनी वनस्पतीशास्त्राच्या संशोधनात, विशेषतः पश्चिम घाटावरील वनस्पतींच्या वेगवेगळ्या प्रजातींविषयी संशोधन, संवर्धन या अनुषंगाने मोलाचे योगदान दिले आहे. या परिसरातील संशोधनामध्ये मलाही काही वाटा उचलता आला, याचे समाधान वाटते. डॉ. एस.आर. यादव यांनी तर ‘ग्रासेस ऑफ महाराष्ट्र’ या ग्रंथाच्या रुपाने अमूल्य संशोधकीय ठेवा निर्माण करून ठेवला आहे. त्याच संशोधकीय परंपरेतून डॉ. गुरव व नंदीकर यांचा संदर्भग्रंथ साकारला आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

डॉ. मयूर नंदीकर यांनी संदर्भग्रंथाची प्रस्तुतता आणि त्याचा प्रकाशनापर्यंतचा १५ वर्षांचा प्रवास सांगितला. ते म्हणाले, पारंबी प्लांट रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या या ग्रंथात आफ्रिका आणि आग्नेय आशियातील १३१ प्रजातींसह भारतातील कोमेलिनेसी कुटुंबातील विविध प्रजातींची टीपांसह माहिती दिली आहे. त्यांची छायाचित्रे, रेखाचित्रे आणि आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ (IUCN) यांनी दर्शविलेल्या धोक्याचे मूल्यमापन आहे. निसर्ग संवर्धनवादी, वनस्पतिशास्त्राचे विद्यार्थी आणि वनस्पतीप्रेमींसाठी म्हणून ते महत्त्वाचे ठरते. स्कॉटिश वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. हेन्री नॉल्टी (रॉयल बोटॅनिक गार्डन एडिनबरा) यांची प्रस्तावना ग्रंथास लाभली आहे, हेही याचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. राजाराम गुरव यांनी या ग्रंथाच्या निर्मिती प्रक्रियेविषयी माहिती दिली. ते म्हणाले, सन १८७९मध्ये ब्रिटीश अभ्यासक आल्फ्रेड यंग यांनी पश्चिम महाराष्ट्रातून या प्रजातींमधील काहींचे संकलन केले होते आणि त्यांची माहिती ब्रिटीश म्युझियममध्ये होती. ही माहिती आजवर कधीही प्रकाशात आली नव्हती. डॉ. नंदीकर यांच्या संशोधनाद्वारे आणि आता या ग्रंथाद्वारे ती माहिती वनस्पतीशास्त्रांना उपलब्ध झाली आहे, ही फार मोठी उपलब्धी असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. मनोज लेखक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर डॉ. घाणे यांनी आभार मानले.



संदर्भग्रंथाची वैशिष्ट्ये:

• प्रख्यात ब्रिटीश वनस्पतीशास्त्रज्ञ सी. बी. क्लार्क यांच्या १८८१मधील कॉमेलिनेसीवरील मोनोग्राफनंतरचे महत्त्वाचे ठळक कार्य.

• १२ नवीन नावे आणि प्रजाती

• १३ नवीन समानात्म प्रजाती

• १०८ द्विपदींचे (Binomial) वर्गीकरण

• १३१ नावांसाठी ५१६ द्विपदींची नोंद

• केना कुळातील वनस्पती त्यांची प्रदेशनिष्ठता आणि ओळख

• गुणसूत्रांची संख्या निश्चितीकरण

• १०० पेक्षा जास्त रेखाचित्रे आणि छायाचित्रे

• या लेखनासाठी जगभरातील ५० हून अधिक पादपालयाचा (herbaria) अभ्यास. त्यात लंडनचे ब्रिटिश म्युझिअम व कीव, इंग्लंड यांचा समावेश.

04/05/2024

Yashwantrao Chavan School of Rural Development organizes Management Development Programme for HR managers and academicians on Future of work, workplace and human resources.
Day and Date Saturday, 11th 2024.

04/05/2024

लेखनशिस्त व वेळेचे व्यवस्थापन ही डॉ. विलास शिंदे यांची वैशिष्ट्ये: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के
मराठी विज्ञान परिषदेच्या सुधाकर आठले पुरस्काराबद्दल प्रशासनातर्फे गौरव

लेखनाची शिस्त आणि वेळेचे व्यवस्थापन या वैशिष्ट्यांच्या बळावरच शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव तथा विज्ञानलेखक डॉ. विलास शिंदे यांना लेखनसातत्य टिकविणे शक्य झाले. त्यामुळेच मराठी विज्ञान परिषदेच्या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचे ते मानकरी ठरले, असे गौरवद्गार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी काल येथे काढले.

मराठी विज्ञान परिषदेतर्फे समाजात विज्ञान प्रसार तसेच वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्याकरिता किमान दहा वर्षे विविध प्रकारे कार्य करणाऱ्या, पण ६० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या व्यक्तीला सुधाकर उद्धवराव आठले पुरस्कार देऊन गौरविले जाते. सन २०२४साठीचा हा पुरस्कार डॉ. विलास शिंदे यांना नुकताच मुंबई येथे परिषदेच्या ५८व्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रदान करण्यात आला. त्या निमित्ताने आज विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व ग्रंथभेट देऊन डॉ. शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, डॉ. विलास शिंदे यांची कार्यनिष्ठा कौतुकास्पद आहे. जबाबदारीचे कार्यालयीन प्रशासकीय कामकाज सांभाळून त्यापलिकडे व्यक्तीगत वेळ लेखनासाठी काढणे हे फार कष्टाचे आहे. त्यामधील सातत्य सांभाळणे ही तर फारच जिकीरीची बाब असते. मात्र, डॉ. शिंदे यांनी त्या संदर्भात जोपासलेले सातत्य महत्त्वाचे आणि सर्वांसाठीच आदर्शवत स्वरुपाचे आहे.

प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील म्हणाले, डॉ. शिंदे यांच्यावर प्रशासनातल्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आल्या. त्या यशस्वीरित्या सांभाळत असताना त्याच्या बरोबरीने आपले विज्ञानलेखनावरील प्रेम त्यांनी सांभाळले. लेखनातील नियमितता आणि ताज्या विषयांच्या अनुषंगाने संदर्भ संशोधन आणि सर्वसामान्य लोकांना समजेल अशा सोप्या शब्दांत त्यांचे विश्लेषण करण्याची हातोटी त्यांना साधलेली आहे. हे समाज प्रबोधनाचे काम त्यांनी या पुढेही चालू ठेवावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी डॉ. शिंदे यांची सर्जनशीलता वाखाणण्याजी असल्याचे सांगितले. यावेळी जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन उपकुलसचिव गजानन पळसे यांनी केले. यावेळी विद्यापीठाच्या वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार यांच्यासह प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

04/05/2024

शिवाजी विद्यापीठात महाराष्ट्र दिन उत्साहात

शिवाजी विद्यापीठात आज महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

आज सकाळी ठीक ८ वाजता प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.यावेळी कुलसचिव डॉ.विलास शिंदे यांच्यासह परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ.सुहासिनी पाटील,वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ.श्रीकृष्ण महाजन, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ.सरिता ठकार, मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉ.महादेव देशमुख, इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजेस केंद्राचे संचालक डॉ.सागर डेळेकर, बॅ.बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ.धनंजय सुतार, क्रीडा संचालक डॉ.शरद बनसोडे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.प्रकाश गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ.तानाजी चौगुले यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी संगीत व नाटयशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थिनींसह सामूहिक राष्ट्रगीत, राज्यगीत तसेच विद्यापीठ गीत गायन करण्यात आले.प्र-कुलगुरू डॉ.पाटील यांच्यासह सर्व मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्प वाहून अभिवादन केले.सर्व उपस्थितांना प्र-कुलगुरूंनी महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

Photos from Shivaji University Kolhapur's post 26/04/2024

डॉ. प्रतापसिंह जाधव यांची पत्रकारिता व्रत आणि व्यवहाराच्या संतुलनाचे प्रतीक: डॉ. अनिल काकोडकर
पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांना विद्यापीठाचा प्राचार्य कणबरकर पुरस्कार प्रदान

पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांची पत्रकारिता म्हणजे व्रत आणि प्रामाणिक व्यवहार यांच्या संतुलनाचे मूर्तीमंत उदाहरण तथा प्रतीक आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी आज येथे काढले.

शिवाजी विद्यापीठाचा प्राचार्य रा.कृ. कणबरकर पुरस्कार-२०२४ दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांना डॉ. काकोडकर यांच्या हस्ते आज राजर्षी शाहू सभागृहात प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.

डॉ. काकोडकर यांच्या हस्ते डॉ. प्रतापसिंह जाधव यांना प्राचार्य कणबरकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, मानपत्र, ग्रंथभेट, पुष्पगुच्छ आणि एक लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरुप होते.

यावेळी पद्मश्री डॉ. जाधव यांच्या ‘सिंहायन’ या गौरव ग्रंथातील प्राचार्य कणबरकर यांच्या लेखाचा दाखला देऊन डॉ. काकोडकर म्हणाले, डॉ. जाधव यांनी व्रत आणि प्रामाणिक व्यवहार यांची सांगड घालून पत्रकारिता केल्याचे प्रतिपादन प्राचार्य कणबरकर यांनी केले आहे. यावरुन शिवाजी विद्यापीठाने त्यांच्या नावे असलेल्या पुरस्कारासाठी डॉ. जाधव यांची केलेली निवड अत्यंत सार्थ आहे, याची प्रचिती येते. पत्रकारितेमध्ये प्रबोधनाचे कार्य उच्च मानून अन्यायग्रस्तांसाठी आधारस्तंभ म्हणून तिचा वापर त्यांनी केला. लोकशाहीत लोकशिक्षणाचे महत्त्व ओळखून त्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न महत्त्वाचे आहेत. डॉ. जाधव यांच्या वक्तव्यातूनच त्यांच्या वैचारिक, तात्त्विक आणि मानसिक उंचीची झलक पाहावयास मिळाली, असेही ते म्हणाले.

डॉ. काकोडकर पुढे म्हणाले, प्रगल्भ समाजव्यवस्थेमध्ये दर्जेदार संस्था, उत्तम पायाभूत सोयीसुविधा, प्रगत तंत्रज्ञान आणि चांगले कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन या चार बाबींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. तंत्रज्ञान हे तंत्रज्ञानच असते. त्यामध्ये भलेबुरेपणाची चर्चा गैरलागू असते. वापरणारे त्याचा वापर कोणत्या दिशेने करतात, यावर ते अवलंबून असते. म्हणूनच प्रगल्भ समाजामधील जीवनमूल्यांशी प्रामाणिकता, पाशवी वृत्तीवरील नियंत्रण, त्याच्यामधील मूल्यसंवर्धनाची क्षमता आणि सामाजिक जडणघडणीचा साकल्याने विचार या बाबी तंत्रज्ञानाच्या सकारात्मक वापराला प्रेरणा देतात. शोषणविरहित आणि सर्वांचे सक्षमीकरण अशा पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर होणे चांगल्या समाजनिर्मितीसाठी आवश्यक आहे. त्यात शिक्षण आणि समाज प्रबोधनाचे महत्त्व मोठे आहे.

हा पुरस्कार कोल्हापूरच्या जनतेचा; ‘पुढारी’च्या वाचकाचा: डॉ. प्रतापसिंह जाधव

यावेळी पुरस्काराला उत्तर देताना पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी शिवाजी विद्यापीठाने प्रदान केलेला हा पुरस्कार कोल्हापूरच्या जनतेचा तसेच ‘पुढारी’च्या वाचकाचा असल्याचे सुरवातीलाच सांगितले आणि त्यांच्या वतीने आपण अत्यंत विनम्रतेने पुरस्कार स्वीकारत असल्याचे सांगितले. प्राचार्य कणबरकर यांच्याशी आपला अतिशय जवळचा स्नेह होता, त्यांचे संपूर्ण आयुष्य शिक्षणाला समर्पित होते. समाजाला शिक्षण देण्यासाठीच त्यांनी आपली लेखणी आणि वाणी वापरल्याचे त्यांनी नमूद केले.

आपल्या भाषणामध्ये त्यांनी ज्ञानाचे कालातीत महत्त्व विषद केले. ते म्हणाले, आजच्या कालखंडात बौद्धिक संपदेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भौतिक संपत्ती लुटली जाऊ शकते, मात्र बौद्धिक संपत्ती कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे सर्वांनी सातत्याने नवनवीन गोष्टी शिकत राहण्यास प्राधान्य दिले पाहिजे. यामुळेच ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या प्रत्येकाविषयी माझ्या मनात नितांत आदर आहे. शिक्षक हे वर्गाला शिकवितात, मात्र संपादक-पत्रकार समाजाला शिकवितात. या शिक्षण परंपरेचा आपण आदर करायला हवा. भारताला नालंदा, तक्षशीला विद्यापीठांची प्राचीन शैक्षणिक-सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. तिचा मला नितांत अभिमान आहे. आपला साक्षरतेचा दर ७४ टक्क्यांपर्यंत गेला असला तरी अद्याप ४३ कोटी जनता अशिक्षित आहे. त्यांच्या शिक्षणासाठी खर्च केला पाहिजे, कारण शिक्षण हीच खरी संपत्ती आहे. कोठारी आयोगाने सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहा टक्के इतका खर्च शिक्षणावर करण्याची शिफारस केली होती, मात्र अद्याप तिची अंमलबजावणी केली गेलेली नाही. ती व्हायला हवी, असे त्यांनी आग्रही प्रतिपादन केले.

डॉ. प्रतापसिंह जाधव पुढे म्हणाले, राज्यघटनेने देशातील प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्तीचे मूलभूत स्वातंत्र्य दिले आहे. कोणतेही स्वातंत्र्य अनिर्बंध असू शकत नाही. सर्वसामान्य नागरिकापेक्षा कोणतेही अतिरिक्त अधिकार पत्रकारांना नाहीत. तथापि, निकोप पत्रकारितेची आज मोठी गरज निर्माण झाली आहे. लोकशाहीच्या विधिमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिका या तीन स्तंभांमध्ये सुसंवादाचा मोठा अभाव निर्माण झाल्यामुळे पत्रकारितेच्या चौथ्या स्तंभाची जबाबदारी वाढली आहे. साहित्य आणि पत्रकारितेमध्ये समाजाचे प्रतिबिंब आढळते. साहित्यिकाकडे अभिव्यक्तीसाठी वेळ असतो, पत्रकाराकडे मात्र नसतो. त्यामुळे साहित्यिकाच्याही पुढे दोन पावले तो असतो. त्यामुळे समाजबदलाचा कानोसा त्याला लगोलग घेता येतो. उद्योगपती आणि राजकारणी या दोन शक्ती प्रसारमाध्यमांचा ताबा घेऊ लागल्या आहेत. हे एक मोठे आव्हान आज पत्रकारितेसमोर उभे ठाकले आहे. त्याचप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या तंत्रज्ञानाचेही आव्हान आहे. मात्र, तंत्रज्ञान कितीही बदलले तरी पत्रकारितेचा सर्वसामान्यांसाठी काम करण्याचा जो आत्मा आहे, तो मात्र कदापि बदलणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कणबरकर यांच्या नावे शिष्यवृत्तीसाठी देणगी

यावेळी डॉ. जाधव यांनी पुरस्काराच्या १ लाख ५१ हजार रुपयांच्या रकमेमध्ये स्वतःकडील तितक्याच रकमेची भर घालून त्यामधून प्राचार्य डॉ. कणबरकर यांच्या नावे विद्यापीठाने शिष्यवृत्ती सुरू करावी, असा प्रस्ताव ठेवला. त्याचा स्वीकार करून सदर प्रस्ताव अधिकार मंडलांसमोर घेऊन जाण्याची ग्वाही कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी यावेळी दिली.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, कणबरकर यांच्यासारख्या ध्येयनिष्ठ व्यक्तीमत्त्वाच्या नावचा पुरस्कार डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्यासारख्या ध्येयनिष्ठ व्यक्तीमत्त्वास प्रदान करताना विद्यापीठास मोठा आनंद होतो आहे. विद्यापीठात ललितकला विभागाच्या स्थापनेबाबत कुलगुरू कणबरकर यांच्या कारकीर्दीत त्यांच्याच अध्यक्षतेखालील बैठक आयोजित करण्यात डॉ. जाधव यांनी पुढाकार घेतला. पुढे त्यासाठी स्थापन झालेल्या समितीचे अध्यक्षपद त्यांच्याकडेच आले आणि विद्यापीठात ललितकला विभागाची स्थापना झाली. आज विद्यापीठात पद्मश्री डॉ. ग.गो. जाधव अध्यासनाची अत्यंत देखणी वास्तू उभी राहिली आहे. त्यासाठीचा पाठपुरावा आणि शासनाकडून निधी प्राप्त करण्यासाठीचे प्रयत्न डॉ. जाधव यांनी केले आहेत. सात कोटी रुपयांहून अधिक निधी त्यामधून मिळाला. देशातील पत्रकारितेच्या या पहिल्या अध्यासनात डिजीटल पत्रकारितेसह बी.ए. इन फिल्म मेकिंग, कम्युनिटी रेडिओ असे आधुनिक अभ्यासक्रम आणि उपक्रम सुरू होत आहेत, याचे संपूर्ण श्रेय डॉ. जाधव यांनाच जाते. गेल्या चाळीस वर्षांत शिवाजी विद्यापीठाच्या शैक्षणिक विकासासाठी ते करीत असलेल्या प्रयत्नांची प्रचिती देणारे हे प्रसंग असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी प्राचार्य डॉ. बाबासाहेब खोत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. भालबा विभूते यांनी मानपत्राचे वाचन केले. कणबरकर कुटुंबियांतर्फे डॉ. अरुण कणबरकर यांनी शाल व श्रीफळ देऊन डॉ. जाधव यांचा सत्कार केला. नंदिनी पाटील व धैर्यशील यादव यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले.

कार्यक्रमास दै. पुढारीचे चेअरमन डॉ. योगेश जाधव यांच्यासह परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, माजी कुलगुरू डॉ. बी.पी. साबळे, डॉ. वसंत भोसले, डॉ. नमिता खोत, डॉ. अंजली साबळे यांच्यासह कणबरकर कुटुंबिय, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, विविध अधिकार मंडळांचे सदस्य, दै. पुढारीचे अधिकारी-कर्मचारी, उद्योग-व्यवसाय तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

16/04/2024

महात्मा फुले प्रखर बुद्धीवादी साहित्यिक: डॉ. रवींद्र ठाकूर

महात्मा जोतीराव फुले हे प्रखर बुद्धीवादी लेखक, साहित्यिक होते; मात्र, त्यांचा कोणीही साहित्यिक म्हणून उल्लेख केला नाही, हे वेदनादायी आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. रवींद्र ठाकूर यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रातर्फे फुले, शाहू, आंबेडकर सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत आज सकाळी महात्मा फुले जयंतीच्या निमित्ताने विद्यापीठाच्या ‘शिव-वार्ता’ () या युट्यूब वाहिनीवरून डॉ. ठाकूर यांचे ‘महात्मा फुले: व्यक्ती आणि वाङमय’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

डॉ. ठाकूर म्हणाले, महात्मा फुले यांनी आपल्या आयुष्यात विपुल लेखन केले. अखंड काव्यरचना, ‘तृतीय रत्न’सारखे नाटक, शेतकऱ्याचा असूड, ब्राह्मणाचे कसब, गुलामगिरी यांसारखे ग्रंथ, पोवाडे अशी महत्त्वपूर्ण साहित्यनिर्मिती केली. सत्सारसारखे नियतकालिक काढून पत्रकारिताही केली. मात्र त्यांना या समाजाने साहित्यिक म्हणून मान्यता दिली नाही. ते प्रखर बुद्धीवादी होते. त्यांच्या विचारधारेत अंधश्रद्धेला थारा नाही. त्यांनी वर्णवर्चस्ववाद, जातिश्रेष्ठत्वाची मानसिकता यांविरुद्ध या बुद्धीवादाच्या बळावर रान उठविले. विद्येपासून वंचित समाजाला विद्यार्जनाचा मार्ग दाखविला. त्यांनी जसा सामाजिक विषमतेला विरोध केला, तसाच आत्माही नाकारला. त्यांनी धार्मिक कर्मकांडांपेक्षा विचारांना महत्त्व दिले.

डॉ. ठाकूर म्हणाले, इंग्रजांनी बहुजनांना शिक्षणाची दारे खुली केली म्हणून त्यांनी इंग्रजांचे कौतुक केले, तर त्यांना इंग्रजधार्जिणे ठरविण्यात आले. हिंदू धर्मातील विषमतावादी, अंधश्रद्धा पसरविणाऱ्या चालीरितींना विरोध केला, म्हणून ब्राह्मणद्वेष्टेही ठरविण्यात आले. प्रत्यक्षात फुले ना इंग्रजधार्जिणे होते, ना ब्राह्मणद्वेष्टे. ‘ख्रिस्त, महंमद, मांग ब्राह्मणांसी। धरावे पोटाशी। बंधुपरी।।’ असे सांगणारे फुले हे ब्राह्मणद्वेष्टे कसे असू शकतील, असा प्रश्न ठाकूर यांनी उपस्थित केला.

महात्मा फुले यांच्या विचार व कार्याकडे अभ्यासकांचे, साहित्यिकांचे लक्ष जाऊ लागले आहे. त्यांच्या साहित्याविषयी संशोधन, लेखन होऊ लागले आहे, ही महत्त्वाची बाब असल्याचेही डॉ. ठाकूर यांनी सांगितले.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

16/04/2024

डॉ. उषा इथापे थोर विदुषी: डॉ. राजन गवस
‘घरंदाज सावली’ पुस्तकावर विद्यापीठात चर्चासत्र

शिवाजी विद्यापीठाच्या माजी कुलसचिव डॉ. उषा इथापे या केवळ इथे शिकलेल्या विद्यार्थ्यांच्या माताच नव्हत्या, तर एक थोर विदुषी सुद्धा होत्या. त्यांचे मोठेपण विस्मृतीच्या पडद्याआडून सामोरे आणण्याचे काम डॉ. रणधीर शिंदे यांच्या ‘घरंदाज सावली’ या पुस्तकाने केले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचे कै. श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन आणि डॉ. आप्पासाहेब पवार कमवा व शिका प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. रणधीर शिंदे संपादित ‘घरंदाज सावली- डॉ. उषा इथापे: कार्य आणि आठवणी’ या ग्रंथावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. त्या चर्चासत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते.

डॉ. गवस म्हणाले, कोणतीही संस्था ही इमारतींनी मोठी होत नसते. तिच्या उभारणीत योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या योगदानातून ती मोठी होते. डॉ. आप्पासाहेब पवार, डॉ. उषा इथापे यांचे शिवाजी विद्यापीठाच्या उभारणीत तशा प्रकारचे भरीव योगदान आहे. अशा व्यक्तींना जाणीवपूर्वक विस्मृतीत ढकलणे परवडणारे नसते. डॉ. इथापे यांचे कार्य अत्यंत परिश्रमपूर्वक डॉ. रणधीर शिंदे यांनी सामोरे आणले आहे. या व्यक्तीबद्दल लिहीले जात असताना त्याच्या बरोबरीने संस्थेचा इतिहासही संग्रहित झालेला आहे. डॉ. इथापे यांनी मार्गदर्शकाविना अत्यंत भरीव अशा प्रकारचे पीएच.डी. संशोधन केले. ते संशोधनही या निमित्ताने उजेडात आले. डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी त्यासंदर्भात अत्यंत मौलिक स्वरुपाचे लिहीले आहे. भविष्यातील उजेडाची अर्थात संशोधनाची एक रेघ या निमित्ताने ओढली गेलेली आहे.

माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे म्हणाले, डॉ. उषा इथापे यांनी शिवाजी विद्यापीठासाठी घेतलेली अविश्रांत मेहनत न विसरता येणारी आहे. त्यांचे वात्सल्य आणि योगदान यामुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांची पहिली फळी घडली, जिने विद्यापीठाचा लौकिक सर्वदूर केला. रणधीर शिंदे यांनी केवळ संपादकाची भूमिका न बजावता त्यापुढे जाऊन संशोधकाच्या नजरेतून पुस्तकाची मांडणी करताना अनेक बाबी सप्रमाण पुढे आणल्या आहेत, तर काही गोष्टी नव्याने प्रकाशात आणल्या आहेत.

नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन. पठाण यांनी आपल्या गतायुष्यातील आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, डॉ. आप्पासाहेब पवार, डॉ. उषा इथापे आणि शिवाजी विद्यापीठ या तीन गोष्टींमुळे माझ्यासारखा एक गवंड्याचा पोर राज्याचा शिक्षण संचालक, मध्य भारतातील एका मोठ्या विद्यापीठाचा कुलगुरू होऊ शकला. येथूनच सर्वधर्मसमभावाची शिकवण घेऊन जगभर जाता येऊ शकले. माझ्यासारखे हजारो विद्यार्थी इथापे बाईसाहेबांमुळे आयुष्यात काही तरी होऊ शकले, हे त्यांचे थोर उपकार आहेत.

यावेळी गडहिंग्लजच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांनीही डॉ. इथापे यांच्या अनेक आठवणी जागविल्या. त्या आम्हा गोरगरीब मुलांच्या माताजी होत्या, अशा शब्दांत त्यांनी गौरव केला. विद्यापीठाचे माजी कर्मचारी गजानन साळुंखे यांनीही डॉ. आप्पासाहेब पवार आणि डॉ. इथापे यांनी विद्यापीठ उभारण्यासाठी घेतलेल्या कष्टांची आठवण काढताना त्यांच्यामुळेच आपले कुटुंब उभे राहू शकले, अशी कृतज्ञ भावना व्यक्त केली.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार आणि कुलसचिव डॉ. उषा इथापे यांचा कार्यकाळ हा विद्यापीठाच्या पायाभरणीचा जसा होता, तसाच तो सुवर्णकाळही होता. कुलसचिव म्हणून त्यांच्यावर प्रचंड मोठी जबाबदारी होती. त्या जबाबदारीच्या सोबतच इथल्या विद्यार्थ्यांना घडविण्याची, उभे करण्याची जबाबदारीही त्यांनी शिरावर घेतली होती. त्याचे दर्शन सदर पुस्तकाद्वारे होते. त्यांनी लावलेल्या ‘कमवा व शिका’च्या रोपट्याला पाणी शेंदण्याचे काम काही काळ करता आले, याचे समाधान वाटते. प्रबोधिनीचे काम पुढे घेऊन जात असताना या योजनेतील पुढील फळ्यांतील विद्यार्थ्यांनाही सामावून घ्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी अध्यासनाच्या समन्वयक डॉ. भारती पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. रणधीर शिंदे यांनी पुस्तकाविषयी मनोगत व्यक्त केले. प्रबोधिनीचे उपाध्यक्ष प्रा. सी.टी. पवार यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. यावेळी शब्दशिवार प्रकाशनाचे इंद्रजीत घुले आणि मुद्रितशोधक विष्णू पावले यांचा सत्कार करण्यात आला. सुस्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले, तर राजेश पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक यांच्यासह डॉ. इथापे यांचे कुटुंबीय आणि डॉ. इथापे यांच्या कार्यकाळात ‘कमवा व शिका’ योजनेतून शिकून बाहेर पडलेले अनेक ज्येष्ठ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Photos from Shivaji University Kolhapur's post 16/04/2024

फुले, शाहू, आंबेडकरांकडून देशाला समाजबदलाचा कृतीशील कार्यक्रम: सुधाकर गायकवाड
शिवाजी विद्यापीठात फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहाचे उद्घाटन

महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या त्रयीने विषमतावादी मूल्यांना नाकारून समाजबदलासाठीचा कृतीशील कार्यक्रम देऊन समता प्रस्थापनेच्या दिशेने समाजाला नेण्याचे काम केले, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत सुधाकर गायकवाड यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या वतीने आयोजित फुले, शाहू, आंबेडकर सप्ताहाचे उद्घाटन आज राजर्षी शाहू सभागृहात झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे प्रमुख उपस्थित होते. यावेळी श्री. गायकवाड लिखित ‘दलित सौंदर्यशास्त्र’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

डॉ. गायकवाड म्हणाले, तत्कालीन प्रचलित समाजव्यवस्था ही विषमतेला धर्मसत्तेचा आधार देऊन तिचे समर्थन करीत होती. या मानवी वर्तन नियंत्रित करणाऱ्या विषमताधारित समाजव्यवस्थेला आव्हान देऊन नाकारण्याचे काम बुद्धानंतर फुले, शाहू, आंबेडकर यांनी केले. भौतिक बदलांपेक्षा माणसाच्या माणसाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात, वर्तनात आणि निकषांत बदल करण्यासाठी त्यांनी कृतीशील कार्य केले. सामाजिक न्यायाची संकल्पना समाजाच्या मानसिक व बौद्धिक रचनेत बदल घडविण्याचा प्रयत्न करते. या न्यायाचा पुरस्कार त्यांनी केला. या चिकित्सेतूनच फुले सार्वजनिक सत्यधर्माकडे तर बाबासाहेब बुद्धाकडे वळले. शाहू महाराजांनी आपल्या राज्यसत्तेचा वापर समाजरचनेतील अधिसत्तेला आव्हान देण्यासाठी केला आणि त्याद्वारे त्यांनी लोकांना त्यांच्या सामाजिक अधिकारांचे वाटप केले.

प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील म्हणाले, आजच्या समाजाच्या नेमक्या गरजा लक्षात घेऊन युवकांनी काम करणे अपेक्षित आहे. ते करीत असताना फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारकार्याचा आदर्श समोर ठेवून त्यांनी वाटचाल केल्यास प्रगती होईल.

कुलसचिव डॉ. विलास शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले, शाहू, आंबेडकर यांच्या कार्यामध्ये स्त्री सन्मान, शेतकऱ्यांप्रती आस्था आणि शिक्षण हे समान धागे आहेत. महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांना इतके ज्ञानवंत केले की त्यांना अनेक भाषा अवगत होत्या. संस्कृतमध्ये ‘बुधभूषण’सारखा महाग्रंथ लिहीण्याइतके पांडित्य त्यांनी प्राप्त केले.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, फुले, शाहू, आंबेडकरांनी महाराष्ट्रात खूप मोठी वैचारिक क्रांती डवून आणली. त्या क्रांतीला कृतीशीलतेची मोठी जोड होती. बुद्धीवादाचा वापर मानवी जीवन सुकर व सुखकर होण्यासाठी त्यांनी केला, हे त्यांच्या कार्याचे मोठे वेगळेपण ठरते. बुद्धीच्या वापराने मानवी वर्तन नियंत्रित वा अनियंत्रित होत असते. या बुद्धीचा नियंत्रित वापर सामाजिक हित डोळ्यांसमोर ठेवून करणे आवश्यक आहे, ही प्रेरणा या त्रयीकडून आपणास मिळत राहते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते सुधाकर गायकवाड लिखित ‘दलित सौंदर्यशास्त्र’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. या ग्रंथावर झालेल्या चर्चेत डॉ. देवानंद सोनटक्के, डॉ. सचिन गरूड आणि प्रा. श्यामसुंदर मिरजकर यांनी सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी केले. डॉ. अविनाश भाले यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. दीपा श्रावस्ती यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. मुरलीधर भानारकर, डॉ. कैलास सोनवणे, उपकुलसचिव विलास सोयम यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

16/04/2024

विज्ञानलेखक डॉ. व्ही.एन. शिंदे यांना
विज्ञान परिषदेचा सुधाकर आठले पुरस्कार

येथील प्रसिद्ध विज्ञान लेखक आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नेताजी तथा व्ही.एन. शिंदे यांना मराठी विज्ञान परिषदेकडून प्रतिष्ठेचा सुधाकर उद्धवराव आठले पुरस्कार-२०२४ जाहीर करण्यात आला आहे. येत्या २८ एप्रिल रोजी मुंबई येथे पुरस्कार प्रदान सोहळा होईल. परिषदेचे कार्यवाह प्रा. भालचंद्र भणगे यांनी पत्राद्वारे ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्रात विज्ञान प्रसार व जागृतीच्या अनुषंगाने कार्यरत असलेल्या प्रतिष्ठित मराठी विज्ञान परिषदेतर्फे समाजात विज्ञान प्रसार तसेच वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्याकरिता किमान दहा वर्षे विविध प्रकारे कार्य करणाऱ्या, पण ६० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या व्यक्तीला सुधाकर उद्धवराव आठले पुरस्कार देऊन गौरविले जाते. सन २०२४च्या पुरस्कारासाठी डॉ. व्ही. एन. शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. रुपये २५ हजार आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. २८ एप्रिल रोजी होणाऱ्या मराठी विज्ञान परिषदेच्या ५८व्या वर्धापन दिन कार्यक्रमात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येईल. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर प्रमुख पाहुणे असतील, तर परिषदेचे अध्यक्ष डॉ. ज्येष्ठराज जोशी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित असतील.

डॉ. शिंदे हे गेली अनेक वर्षे विज्ञान लेखनाच्या माध्यमातून वैज्ञानिक प्रसार व जागृतीचे कार्य करीत आहेत. एककांचे मानकरी, हिरव्या बोटांचे किमयागार, असे घडले भारतीय शास्त्रज्ञ, आवर्त सारणी व मूलद्रव्यांची दुनिया, एककांचे इतर मानकरी आणि कृषीक्रांतीचे शिलेदार ही त्यांची पुस्तके प्रकाशित आहेत. त्यासाठी डॉ. शिंदे यांना महाराष्ट्र शासनाचा महात्मा जोतीराव फुले पुरस्कार, इंडियन फिजिक्स असोसिएशन (पुणे) यांचा मो.वा. चिपळोणकर पुरस्कार, मिरजेच्या चैतन्य शब्दांगण संस्थेचा कै. अशोक कोरे स्मृती पुरस्कार, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा कृ.गो. सूर्यवंशी पुरस्कार, एन्वायर्नमेंट कॉन्झर्वेशन अँड रिसर्च ऑर्गनायझेशनचा वसुंधरा पुरस्कार तसेच किर्लोस्कर समूहाचा किर्लोस्कर वसुंधरा सन्मान पुरस्कार मिळाले आहेत.

डॉ. शिंदे यांच्या विज्ञान प्रसार कार्याचा गौरव: कुलगुरू डॉ. शिर्के

कुलसचिव डॉ. शिंदे यांना पुरस्कार जाहीर झाल्याचे समजताच शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी अभिनंदनाचे पत्र आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. ‘डॉ. शिंदे गेली दहा वर्षांहून अधिक काळ आपली लेखणी, वाणी आणि प्रत्यक्ष कार्य या माध्यमातून विज्ञानविषयक जागृतीचे कार्य करीत आहेत. त्यांचे हे वैज्ञानिक कार्य स्तुत्य स्वरुपाचे आहे. हा पुरस्कार त्यांच्या या कार्याचा गौरव आहे. शिवाजी विद्यापीठाचा परिसर ही त्यांच्या जल, वनस्पती आणि विज्ञानविषयक कार्यासाठीची प्रयोगशाळाच आहे. त्यामुळे विद्यापीठास त्यांच्या कार्याचा अभिमान आहे. यापुढील काळातही ते विज्ञान प्रसाराच्या क्षेत्रातील प्रबोधनाचे कार्य निरंतर करीत राहतील आणि स्वतःबरोबर विद्यापीठाचे नावही उज्ज्वल करतील,’ असा विश्वास कुलगुरू डॉ. शिर्के यांनी व्यक्त केला.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजेस केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर उपस्थित होते.

30/03/2024

अधिविभागांमधील संशोधकीय साहचर्य वृद्धिंगत व्हावे: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

शिवाजी विद्यापीठाच्या विविध अधिविभागांमध्ये निर्माण होत असलेले संशोधकीय साहचर्य व देवाणघेवाण वृद्धिंगत होत राहावे, अशी अपेक्षा कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केली.

शिवाजी विद्यापीठाच्या इनोव्हेशन, इनक्युबेशन आणि लिंकेजेसच्या वतीने आज विद्यापीठातील पेटंटप्राप्त तसेच प्रकल्प अनुदानप्राप्त आणि आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकांमध्ये शोधनिबंध प्रकाशित झालेल्या संशोधकांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन आणि इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजेस केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर प्रमुख उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या आधीपासूनच विद्यापीठातील विविध अधिविभागांतील संशोधकांमध्ये संशोधन सहकार्य सुरू झाले. विशेष म्हणजे विज्ञान शाखांमध्ये अंतर्गत सहकार्यवृद्धीबरोबरच सामाजिक विज्ञान शाखांशीही सहकार्य सुरू झाले. आज अशा प्रकारच्या आंतरविभागीय, आंतरविद्याशाखीय संशोधन प्रकल्पांमध्ये वृद्धी होण्याची मोठी आवश्यकता आहे. त्याचबरोबर भावी पिढीमध्ये उच्चशिक्षणाविषयी ओढ जागृत व्हावी, यासाठी शालेय विद्यार्थ्यांनाही आतापासूनच विद्यापीठाशी जोडणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, विद्यापीठातील संशोधकांनी विषयांतर्गत तसेच आंतरविद्याशाखीय संशोधनात घेतलेली आघाडी कौतुकास्पद आहे. ती अबाधित राखण्यासाठी संशोधनात सातत्य ठेवा. आता पेटंटच्या पुढचा विचार करताना त्याचे तंत्रज्ञानात अथवा वाणिज्यिक उपयोजनात रुपांतर करता येऊ शकेल का, या दृष्टीने विचार करावा, अशी सूचना त्यांनी केली.

यावेळी डॉ. महाजन यांनी कुलगुरू व प्र-कुलगुरू हे दोघेही संशोधनकार्य करणाऱ्यांना सातत्याने उभारी देण्याचे काम करतात आणि त्यांचे मार्गदर्शन उत्तम नेतृत्वाचे उदाहरण असल्याचे सांगितले.

यावेळी डॉ. राहुल माने, डॉ. के.डी. कुचे, डॉ. सुनील गायकवाड, डॉ. एम.के. भानारकर, डॉ. पद्मा दांडगे, डॉ. संतोष सुतार यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते डॉ. राहुल माने, डॉ. किशोर खोत, डॉ. मुरलीधर भानारकर, डॉ. संतोष शिंदे, डॉ. कबीर खराडे, प्रमोद कोयले (सर्व पेटंटधारक), डॉ. सचिन पन्हाळकर, डॉ. तुकाराम डोंगळे, डॉ. एस.ए. संकपाळ, डॉ. के.डी. कुचे (सर्व विविध संशोधन प्रकल्पधारक), डॉ. सुनील गायकवाड, अक्षय खांडेकर, डॉ. डोंगळे, डॉ. संतोष सुतार, डॉ. क्रांतीवीर मोरे आणि डॉ. पद्मा दांडगे (आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित शोधनिबंधांचे लेखक) यांचा ग्रंथभेट देऊन गौरव करण्यात आला. डॉ. डेळेकर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले आणि आभार मानले.

गायत्री गोखलेला ‘पेटंटदूत’ पत्र प्रदान

विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागाची बी.टे. तृतीय वर्षात शिकणारी पेटंटधारक विद्यार्थिनी गायत्री गोखले हिला विद्यापीठाची ‘पेटंट सदिच्छादूत’ बनवावे, अशी सूचना कुलगुरू डॉ. शिर्के यांनी गेल्या बैठकीमध्ये केली होती. त्यानुसार तिला आज कुलगुरूंच्या हस्ते पेटंटदूत म्हणून पत्र प्रदान करण्यात आले. विविध महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी तिने संवाद साधून त्यांना संशोधनासाठी प्रेरित करावे, अशी अपेक्षा कुलगुरूंनी यावेळी व्यक्त केली.

30/03/2024

शिक्षणशास्त्र अधिविभागाच्या जडणघडणीत
डॉ. प्रतिभा पाटणकर यांचे योगदान मोलाचे: डॉ. महाजन

डॉ. प्रतिभा पाटणकर यांनी शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अधिविभागाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले आहे, असे प्रतिपादन विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी केले. डॉ. पाटणकर येत्या ३१ मार्च रोजी नियत वयोमानानुसार निवृत्त होत आहेत. त्या निमित्ताने अधिविभागाच्या वतीने त्यांचा निरोप समारंभ आज आयोजित करण्यात आला. त्यावेळी अध्यक्षीय मनोगतात ते बोलत होते.

डॉ. महाजन म्हणाले, डॉ. पाटणकर यांनी शिक्षणशास्त्र अधिविभागाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडविले. त्यांचे विद्यार्थी विविध महाविद्यालये, विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांत शिक्षण म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे त्या खऱ्या अर्थाने गुरु घडविणाऱ्या गुरु आहेत. सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी केलेले कार्य अशा व्यक्तिमत्त्वामुळे सार्थ झालेले दिसते, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

डॉ. पाटणकर सत्काराला उत्तर देताना म्हणाल्या, अधिविभाग हे माझे जणू दुसरे घरच बनले होते, इतकी मी त्याच्याशी एकरुप झाले. विद्यार्थ्यांनी अध्ययन आणि संशोधन या दोन गोष्टी सातत्याने करण्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी अधिविभागातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी डॉ. पाटणकर यांच्या योगदानाविषयी मनोगते व्यक्त केली. यामध्ये डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. एम.के. भानारकर, डॉ. रुपाली संकपाळ, डॉ. विद्यानंद खंडागळे, सुहाना नायकवडी, प्राची पाटील, अतुल जाधव, स्मिता पाटील, सरस्वती कांबळे, आरती पाटील यांचा समावेश होता. कार्यक्रमास अॅड. डॉ. एस.बी. पाटणकर यांच्यासह त्यांचे कुटुंबिय, डॉ. निलिमा सप्रे, डॉ. के.बी. पाटील प्रमुख उपस्थित होते.

कार्यक्रमात डॉ. प्रतिभा पाटणकर यांच्या जीवनावरील तीन मिनिटांची ध्वनी-चित्रफित दाखविण्यात आली. डॉ. महाजन यांच्या हस्ते डॉ. प्रतिभा पाटणकर यांचा मानपत्र प्रदान करून सत्कार करण्यात आला. डॉ. सोनकांबळे यांनी मानपत्राचे वाचन केले. शिस्त, निष्ठा आणि समर्पण ही जीवनाची त्रिसूत्री असणारे व्यक्तीमत्त्व म्हणजे डॉ. प्रतिभा पाटणकर असा गौरव मानपत्रात करण्यात आला. डॉ. खंडागळे यांनी आभार मानले.

Want your school to be the top-listed School/college in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू (जम्मू आणि काश्मीर) येथून केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या प्रधानमंत्री उच्चतर श...
शिवस्पंदन@ताल उत्सव!....#Shivajiuniversity #masscommunication  #news  #shivspandan #university #program #activities #ree...
शिवाजी विद्यापीठात शिवजयंती उत्साहात
Shivjayanti celebration at Shivaji University, Kolhapur....#Shivajiuniversity #kolhapur #shivjayanti #chatrpatishivajima...
'पॅलेस्टाईन आणि इस्राईल संघर्ष: माध्यमांची भूमिका' विषयावर विद्यापीठात कार्यशाळा युद्धजन्य परिस्थिती तसेच संघर्षाच्या का...
सावित्रीबाई फुले यांना शिवाजी विद्यापीठात अभिवादन....#shivajiuniversity #masscommunication #students #masscom #news
शिवाजी विद्यापीठाचा हीरक महोत्सवी दीक्षांत समारंभ....#shivajiuniversityconvocation2023#suk2023 #convocation
@श्रेया #shivajiuniversityconvocation2023#suk2023 #convocation2023 #convocation
@अमृता #shivajiuniversityconvocation2023#suk2023 #convocation2023 #convocation
@स्नेहा #shivajiuniversityconvocation2023#suk2023 #convocation2023 #convocation
@Ravindra#shivajiuniversityconvocation2023#suk2023 #convocation2023 #convocation
शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाच्या पार्श्वभूमीवर एमबीएच्या विद्यार्थ्यांनी लावलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलविषय...

Category

Address

Vidyanagar Kolhapur
Kolhapur
416004

Other Schools in Kolhapur (show all)
Genius Public School & Junior College, Bhuyewadi Genius Public School & Junior College, Bhuyewadi
Near Warana Bazar, Main Road, Bhuyewadi
Kolhapur, 416229

Genius Public School and Junior College, Bhuyewadi Is established to provide the best education for the students who are living in a rural area in the medium of English...

Disha Academy Disha Academy
Sake Road, Bachani
Kolhapur, 416221

Nature's Lap Pre School Nature's Lap Pre School
Near Government Engineering College, Behind Institute Of Engineers, Station Road# 2
Kolhapur, 431005

ज्ञान प्रबोधिनी,बाचणी ज्ञान प्रबोधिनी,बाचणी
Kolhapur

न हीं ज्ञानात परम चक्षु:

Suraj Motor Training School Suraj Motor Training School
Arban Bank Jarag Nagar
Kolhapur, 416007

Motor Training School

Nagojirao Patankar High School Nagojirao Patankar High School
Shivaji Peth A Ward, C Ward
Kolhapur, 416012

ना.पा. हाय स्कूल Official Page B.N.Patankar Trust

Future Kid's Pre-School Future Kid's Pre-School
Plot No. 26 , Nursingh Colony , Near Gangai Lawn, Phulewadi Ring Road
Kolhapur, 416010

"Where little minds bloom, and big dreams take root." 🌱✨

Ostrich International School, Shingnapur Ostrich International School, Shingnapur
A/6, Shakambhari Colony, Near Anandkash Lawn, Shingnapur
Kolhapur, 416010

Where Learning Becomes Fun With The Help Of Technology Based Teaching Methods.

Tiny Hearts Preschool Tiny Hearts Preschool
Behind HDFC Bank, Opp Pandurang Nagari , Near Honda Service Centre, Deokar Panand
Kolhapur, 416012

Innovative Public School Borawade Innovative Public School Borawade
Mudhal Titta Radhangri Road Borawade. Tal-Kagal, Dist/Kolhapur
Kolhapur, 416208

Job Recruitment

Shree Shamrao Patil Group of Institutions Talsande Shree Shamrao Patil Group of Institutions Talsande
𝐓𝐚𝐥𝐬𝐚𝐧𝐝𝐞, 𝐖𝐚𝐫𝐧𝐚-𝐕𝐚𝐭𝐡𝐚𝐫 𝐑𝐨𝐚𝐝, 𝐓𝐚𝐥. 𝐇𝐚𝐭𝐤𝐚𝐧𝐚𝐧𝐠𝐚𝐥𝐞
Kolhapur, 𝟒𝟏𝟔𝟏𝟏𝟐

The official page of Shree Shamrao Patil Group of Institutions Talsande.

Barbie World pre primary and primary school Barbie World pre primary and primary school
1761 E Ward, Rajarampuri 4th Lane
Kolhapur

A self financed government recognised English medium Pre primary and primary school since 22 years.