वाचकमैफल
पुस्तकांचे सौंदर्य अनुभवायचे असेल तर गरजेचे आहे वाचकमैफल.
माझ्या मनाचा एक हळवा कप्पा 'वाचकमैफल'ने व्यापलेला आहे. २०१८ ला लावलेलं रोपटं हळूहळू बाळसं धरत आहे, लवकरच वाचकमैफल सहाव्या वर्षात पदार्पण करेल. याच पार्श्वभूमीवर वीणाताईंशी गप्पांचा योग जुळून येत असेल तर वामैकर कसा सोडतील ?
वीणाताई कार्यक्रमानिमित्त २३ ते २५ मार्च दरम्यान पुण्यात येणार असल्याचं कळल्यावर त्यादृष्टीने आखणी केली आणि सोमवार, २५ मार्च रोजी सकाळी १०.३० ला 'वाचकमैफलच्या 'लेखकाशी गप्पा' या उपक्रमात आणखी एक पान जोडलं गेलं. कालच मी एका ठिकाणी म्हणालो, खरं तर वीणाताई या वाचकमैफलच्या 'आराध्यदैवत'च आहेत. कारण २०१८ साली झालेल्या दुसर्याच बैठकीला ताईंचे आशीर्वाद लाभले होते आणि तिथून हा प्रवास इथपर्यन्त येऊन पोहचला आहे.
सदस्यांनी वीणाताईंशी मनसोक्त गप्पा मारल्या आणि वीणाताईंनी त्यांच्या नेहमीच्या आपुलकीयुक्त शैलीत सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. 'एक होता कार्व्हर' पासून 'मारिया माँटेसरी' पर्यन्त आणि अगदी आताच आलेल्या लहान मुलांसाठीच्या 'किमयागार कार्व्हर' पर्यन्त! नवोदितांच्या लिखाणावर संयमाचा अंकुश नाही आणि त्यामुळे घाईघाईत फक्त जमेल तसं पुस्तक छापण्याकडे कल का वाढला आहे ? याबद्दल यादरम्यान त्यांनी चिंता व्यक्त केली. 'संपादकाची' भूमिका आता लेखक किंवा कवीला स्वत:च आपल्या साहित्याकडे तटस्थ वृत्तीने पाहत निभावली पाहिजे यावर त्यांनी पुन्हा एकदा भर दिला.
यावेळी वामै आणखी खास झाली कारण वीणाताईंना भेटायला आलेल्या एका विलक्षण व्यक्तिमत्त्वाची अनपेक्षितपणे भेट झाली. निवृत्त प्राथमिक शिक्षिका स्वाती वानखेडे असं त्यांचं नाव. नाशिकमध्ये एका आदिवासी पाड्यावर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ज्ञानदानाचं काम दोन तपांहून अधिक काळ अगदी तपश्चर्येप्रमाणेच करणार्या वानखेडेताईंनी यावेळी केलेल्या अनुभवकथनाने सर्वांच्या अंगावर काटा आणला. चारही बाजूंनी पाड्याला पाण्याने वेढल्यामुळे गळाभर पाण्यातून चालत जात शाळा सुरू ठेवण्याचा अतुलनीय निर्धार दाखवत आदिवासी बंधू आणि विशेषत: भगिनींना माहिती, आधार देत मुलींना शाळेत पाठवण्यासाठी तयार करण्यापासून ते पाड्यापर्यन्त येण्यासाठी ब्रीज बांधण्यासाठी सरकारी अधिकारी व अनेक स्थानिक पुढार्यांशीही लढा देत अखेर ब्रीज बनवून घेण्यापर्यन्त अनेक अविश्वसनीय कामं प्रसंगी आपलं कुटुंब बाजूला ठेवत आदिवासी बंधू-भगिनी हेच आपलं कुटुंब मानून केलेली या अफाट कामगिरीची दखल म्हणावी तशी घेतली गेली नसली तरी त्यांच्यावर बनलेल्या डॉक्युमेंटरीमुळे त्यांना न्यूझीलंडमध्ये गौरवण्यात आलं आणि यावेळी त्यांना सहवास लाभला तो साक्षात राम ताकवले सरांचा. स्वातीताईंच्या अखंड बोलण्यातून त्यांची तळमळ, तपस्या जाणवत होती. वामैचा वेळ त्यांना कमी पडेल इतका असल्याने नाइलाजाने त्यांना आवरतं घ्यावं लागलं. वामै लवकरच त्यांचा एक स्वतंत्र कार्यक्रम आयोजित करण्याचा नक्की प्रयत्न करेल.
.. आणि 'चेरी ऑन द केक' म्हणजे अलीकडेच प्रकाशित झालेल्या 'माणूस असा का वागतो' या माणसाच्या व्यक्तिगत अन् सामूहिक वर्तनाचा वैज्ञानिक वेध घेणार्या विशेष उल्लेखनीय पुस्तकाच्या लेखिका अंजली चिपलकट्टीही यावेळी वीणाताईंना भेटण्यासाठी म्हणून आल्या होत्या, त्यामुळे त्यांचे विचार आणि त्यांचं 'सायंटिफिक एन्क्वायरीज' या ज्ञानशाखा क्षेत्रातील योगदान आणि कार्य थोडक्यात समजून घेता आलं. वामैच्या पुढील उपक्रमांच्या दृष्टीने ही भेट फार महत्त्वाची होती.
यावेळी वामैचं माहेर असलेल्या बुकस्पेस लायब्ररीचे प्रसाद कुलकर्णी सर सुट्टी असूनही खास वेळ काढून पूर्ण वाचकमैफल बैठक संपेपर्यंत उपस्थित राहिले होते, ही आणखी एक आनंदाची बाब. इथली वाचकमैफल नेहमीच खुलते.
वामै सदस्य धनंजय तडवळकर, ऋतुजा शुभांगी, विनया हसमनीस, मेधा प्रभुदेसाई, कविता क्षीरसागर, चंचल काळे आणि स्वत: मी अनिल आठलेकर असे सर्वजण या खास मैफलीला हजर होतो. यावेळी प्रथमच अन्वी वामैला नव्हती त्यामुळे तिची अनुपस्थिती खास जाणवली त्याशिवाय निरूपमा महाजन, चिन्मयी चिटणीस या नेहमी उपस्थित असणार्या वामैच्या सदस्यांचीही उणीव भासली.
धुळवड असल्याने पुण्यात अनेक ठिकाणी 'रंग' खेळण्याचे कार्यक्रम सुरू होते, वामैला येताना वाटेत कोणी रंगवेल ही भिती सर्वांना होती, पण जाताना मात्र सर्व मंडळींच्या मनाला लागलेले हे 'आनंदाचे रंग' वेगळेच उठून दिसत होते ...
~ अनिल विद्याधर आठलेकर
मोबाईल -९७६२१६२९४२
#वाचकमैफल #पुणे #मार्चबैठक
आज झालेल्या वाचकमैफल बैठकीचा वाचकमैफलची छोटी सदस्य ऋतुजा शुभांगी हिने घेतलेला आढावा -
📚🚩
|| अभ्यासोनी परिसावे ||
भेटीगाठींचे वृत्तांत मी फार आवडीने लिहीत नाही,पण आजचा दिवस अधिक खास आहे.
निमित्त आहे सकाळी पार पडलेल्या वाचकमैफलच्या बैठकीचं, आणि खास आकर्षण 'एक होता कार्व्हर' च्या लेखिका वीणा गवाणकर यांच्या भेटीचं!
'एक होता कार्व्हर' हे पुस्तक चरित्रलेखनाचा मानदंड ठरलेलं, मागच्या दोन पिढ्यांनी लोकप्रिय केलेलं आणि अजूनही ही 'क्रेझ ' किंचितही कमी न झालेलं, 'जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर ' यांच्या चरित्रावर आधारित पुस्तक.
कार्व्हर यांचं इंग्रजी चरित्र वाचनात आल्यावर
वीणाताईंनी खरंतर त्यांच्या मुलांसाठी म्हणून गोष्टीरूपात लिहीलं होतं. पण कालांतराने काही सहकार्यांशी चर्चेअंती या गोष्टीचा विस्तार पुस्तकात त्यांनी केला. यासाठी अनेक संदर्भ, कागदपत्रे, डॉक्युमेंटरीजची मदत झाली आणि सखोल अभ्यासातून हे सुंदर पुस्तक जन्माला आलं.
वीणाताई या पेशाने ग्रंथपाल. केवळ प्रचंड पुस्तकप्रेम आणि चांगलं, सकस काही मिळवण्याची वृत्ती यातून मिळत गेलेल्या वाचनसंधींचं त्यांनी सोनं केलं.
'..कार्व्हर' मी त्यामानाने बरंच उशिरा का होईना पण वाचलं. तेव्हापासून या व्यक्तीभोवतीचं ज्ञानवलय सतत आकर्षित करत आलं आहे, हे खरं.
जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्या कामाचा परीघ बघताना त्याची अफाट व्याप्ती हळुहळू आपल्या लक्षात येते.
गुलामगिरीच्या आयुष्यातूनही शिकत, कामे करत शेतीविषयक संशोधनात त्यांनी दिलेलं योगदान असामान्य आहे.
या पुस्तकातून जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्या जिद्दीची तळमळीची आणि कार्याची प्रेरणा घेऊन कितीतरी माणसं मोठी झाली, शिकली, पुढे पुढे जात राहिली. या प्रेरणेतून घडलेल्या अशाच एका कणखर प्राथमिक शिक्षिकेची आज भेट झाली . त्यांचं नाव स्वाती वानखेडे. त्यांनी नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर जवळील पाड्यावर आदिवासी शिक्षणाचे यशस्वी प्रयोग करून दाखवले आहेत.
काही पुस्तकं जादू घडवतात, ती अशी.
ती जादू घडावी, यासाठी सखोल अभ्यास हवा,पुरेपूर संयम हवा . हे गुण प्रत्येक क्षेत्रात गरजेचे आहेतच.
घाईघाईने लिहून प्रकाशित केलेलं लिखाण कुचकामी ठरतं. त्यापलीकडे जाऊन,मनापासून अभ्यासपूर्ण लिखाण करण्याची तयारी हवी, तरच त्याचं सोनं होतं..
वीणाताईंची इतरही चरित्रपर पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत.
डॉ मरिया माँटेसरी, रोझलिंड फ्रँकलिन, गोल्डा, डॉ. आयडा स्कडर, डॉ. खानखोजे, डॉ सालीम अली, विलासराव साळुंखे, रिचर्ड बेकर, रॉबी डिसिल्व्हा ,लीझ माइटनर अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रेरणादायी दिग्गजांची त्यांनी चरित्रं त्यांनी मराठी भाषेत लिहीली आहेत.
वीणाताईंचा हा प्रवास उलगडताना आज शिक्षणक्षेत्रात नावीन्यपूर्ण प्रयोग करणार्या अंजली चिपलकट्टी यांनाही भेटता आलं! अंजलीताई या आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून शिक्षणक्षेत्रात आवडीने आलेल्या...
याव्यतिरिक्त आमचे वाचकमैफलचे अनिल आठलेकर, धनंजय तडवळकर काका, चंचल काळे, कविता क्षीरसागर, मेधा प्रभुदेसाई, विनया हसमनीस हे सगळे सदस्य होतेच , आणि होते 'बुकस्पेस ' या लायब्ररीचे अवलिया संस्थापक प्रसाद कुलकर्णी. प्रसाद सरांनीही आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून पुस्तकप्रेमापोटी सुरू केलेली ही भव्य लायब्ररी.
ही जागा माझी अत्यंत आवडती आहे!
मूळ विषयाव्यतिरिक्त इतरही अनेक गोष्टींवर अनौपचारिक चर्चेअंती ही लहानशी मैफल सुफळ संपूर्ण झालीय.
वाचकमैफलच्या गेल्या पाच -सहा वर्षांतील अशा अनेक पुस्तकभेटीची मी साक्षीदार होऊ शकले, याचा आनंद आहे.
लवकरच पुढील मैफलीच्या प्रतिक्षेत!
~ ऋतुजा शुभांगी
२५ मार्च २०२४
*एक मैफल पुस्तकांची..., वाचकांच्या आवडीची"*
संस्कार भारती पिंपरी चिंचवड समिती साहित्यविधा आयाेजित
*"वाचकमैफल"*-
*जानेवारी २०२४*
*सोमवार - दि.२९.१.२०२४*
*वेळ- ५.००ते ६.३०*
*ठिकाण - भारतमाता भवन, पिंपरी चिंचवड लिंक रोड,चिंचवड*
तरी सर्व वाचकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती.
श्री.अनिल आठलेकर
लेखक ,कवी, गझलकार
प्रणिता बोबडे
संस्कार भारती पिं.चिं. समिती साहित्य विधा संयोजिका
शुभदा दामले
संस्कार भारती पिं.चि. समिती साहित्य विधा सहसंयोजिका
लीना आढाव
संस्कार भारती पिं. चिं. समिती सचिव
संपर्क:
9762162942
🔶 एक आनंदाची बातमी 🔶
रसिकहो,
एक ध्यास घेऊन सुरू केलेल्या वाचकमैफलला नुकतीच ५ वर्षं पूर्ण झाली. यानिमित्ताने कम्युनिटी रेडिओ 'Infinity 90.4' वर उद्या माझी मुलाखत प्रसारित होणार आहे. हा सर्व वाचकमैफल च्या हितचिंतकांसाठी आनंदाचा क्षण असणार आहे.
आतापर्यंत जसं वाचकमैफलला प्रेम दिलंत तसं पुढेही द्या.
📙📚📖
नक्की ऐका,
'वाचकमैफलची गोष्ट '
Infinity 90.4 FM वर...
ेडिओ #वाचकमैफल
आपण ही मुलाखत ऍपवरही ऐकू शकता, डिटेल्स कमेंटमध्ये.
वाचकमैफलविषयी थोडक्यात माहिती : -
❍ वाचनसंस्कृतीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी वाचकमैफलची स्थापना ८ जुलै २०१८ ला झाली.
➤ वाचकांना एकत्र आणून वाचनावर चर्चा घडवावी, हा प्रमुख उद्देश.
❍ महिन्यातून किमान एकदा ही बैठक होते.
➤ बैठकीचा कालावधी 2 तास इतका असतो.
❍ सर्व वाचक बोलते व्हावेत हा उद्देश असल्याने ही बैठक अनौपचारिक स्वरूपाची असते.
➤ 'लेखक आपल्या भेटीला' उपक्रमाअंतर्गत वेळोवेळी विविध लेखकांना निमंत्रित केले जाते.
❍ वाचकमैफल पूर्णत: वाचनालाच समर्पित असल्याने पुस्तक सोडून या 2 तासांमध्ये इतर कोणत्याही वायफळ विषयांवर चर्चा होत नाही.
( बैठक संपल्यावर मनसोक्त गप्पा मारण्यावर कोणतंही बंधन नाही. )
➤ केवळ एकच विषयाभोवती न फिरता 'विविध विषयांवरील पुस्तकांवर चर्चा' हे वाचकमैफलचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
❍ प्रामुख्याने मराठी भाषेतील पुस्तकांचा प्रसार व्हावा असा हेतू असला तरीही वाचकमैफलमध्ये भाषेचं बंधन नाही. कोणत्याही भाषेतील पुस्तकांवर तुम्ही बोलू शकता.
➤ मुख्य म्हणजे सर्व वयोगटासाठी वाचकमैफल खुली असते.
वाचकमैफल हे वाचकांचं स्वत:चं हक्काचं असं व्यासपीठ आहे. तुम्हाला आवडलेल्या किंवा तुम्ही वाचलेल्या कोणत्याही पुस्तकावर तुम्ही बोलू शकता. वाचकमैफलचं यश हे आहे की सभाधीटपणा नसणारी व्यक्तीही खुलेपणाने आणि आनंदाने इथे व्यक्त होते. एकमेकांच्या चर्चेतून समजलेली पुस्तकं वाचण्याची इच्छा होणे हे आणखी एक यश.
सर्वांना वाचकमैफलला यायचं असतं. त्याचा मान ठेवून आम्ही वाचकमैफल नुकतीच सर्वांसाठी खुली केली आहे.
या महिन्यातील वाचकमैफलबद्दल माहिती -
दिनांक : २८ ऑगस्ट २०२३
वार : सोमवार
वेळ : सायंकाळी ४.३० ते ६.३०
आयोजक : संस्कार भारती - पिंपरी चिंचवड
स्थळ : भारतमाता भवन, पिंपरी-चिंचवड लिंक रोड, चिंचवड
( रामकृष्ण मोरे सभागृहापासून चालत ५ मिनिटांच्या अंतरावर )
सविस्तर पत्रिका सोबत जोडत आहे.
✸ सर्व वाचकांसाठी खुली ✸
❏ प्रवेश विनामूल्य ❏
अत्रे नावाची दंतकथा
________________
हो! दंतकथा. एखाद्या माणसामध्ये मोजता येणार नाहीत इतके गुण आणि सांगता येणार नाहीत इतकी वैशिष्ट्ये असतील तर अजून तरी आपण काय म्हणू शकतो ?
प्रल्हाद केशव अत्रे उर्फ आचार्य अत्रे यांचा जन्म १३ ऑगस्ट १८९८ रोजी सासवड येथे झाला आणि वयाच्या ७१व्या वर्षी १३ जून १९६९ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात आपल्या साहित्याने, वक्तृत्वाने व विविध क्षेत्रांतील दमदार संचाराने महाराष्ट्रावर, मराठी मनावर विलक्षण प्रभाव टाकणारे आचार्य अत्रे हे खरोखरच एक अद्भुत रसायन होते. नाटककार, विडंबनकार, विनोदी साहित्यिक, कथालेखक, चित्रपटदिग्दर्शक, पटकथाकार, संवादलेखक, आत्मचरित्रकार, बालवाङ्मयकार, शिक्षणतज्ज्ञ, वैचारिक साहित्यकार, अनुवादक, कवी अशी अत्रे यांची अनेक रूपे होती. त्याबरोबरच वक्ता, राजकीय पुढारी, संपादक अशाही भूमिका त्यांनी बजावल्या. त्यांच्यावर अफाट प्रेम करणारी माणसे होती, तशीच त्यांच्या कटू, जिव्हारी लागणाऱ्या शाब्दिक फटकार्यांनी दुखावली गेलेली माणसेही भरपूर होती; कारण अत्रे जसे आत होते तसे बाहेर होते. त्यांनी कधीही कुणाची गय केली नाही. पत्रकार म्हणून, वक्ता म्हणून, राजकारणी म्हणून अत्रे सर्वत्र लोकप्रिय होते. त्यांच्या भाषणांना लांबून लांबून लोक येत, अलोट गर्दी होत असे. कोट्या, किस्से, चिमटे, कोरडे, फटके यांनी युक्त असं त्यांचं भाषण म्हणजे श्रोत्यांसाठी पर्वणीच असे. आजही अत्रेंविषयीच्या दंतकथा, अनेक खरे-खोटे किस्से (विशेषत: व्हॉट्स अॅप /फेaसबुकच्या जमान्यात ) यांची विपुल संख्या पाहिली तरी अत्रे यांच्या लोकप्रियतेची कल्पना यावी.
त्यांनी अनेक पुस्तके लिहिली, नाटके लिहिली त्याबरोबर आपल्या नाटकातील पदेही लिहिली. आत्मचरित्राचे 'कऱ्हेचे पाणी' या नावाने पाच खंड लिहिले. 'झेंडूची फुले' हा अतिशय लोकप्रिय असा विडंबन काव्यसंग्रह लिहिला. त्यांनी ‘साष्टांग नमस्कार’, ‘भ्रमाचा भोपळा’, ‘लग्नाची बेडी’, ‘मोरूची मावशी’, ‘कवडी चुंबक’, ‘पराचा कावळा’, ‘मी उभा आहे’ ही विनोदी नाटके, ‘तो मी नव्हेच’, ‘घराबाहेर’, ‘उद्याचा संसार’, ‘जग काय म्हणेल’, ‘प्रीतीसंगम’, ‘पाणिग्रहण’ ही इतर नाटके फार लोकप्रिय झाली. याबरोबरच चित्रपटक्षेत्रातही त्यांनी दमदार कामगिरी केली इतकी की त्यांच्या 'श्यामची आई' या चित्रपटाला राष्ट्रपती पदक मिळाले. अत्रे यांनी तीनवेळा नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपदही भूषवले. त्यांची कलाक्षेत्रातली मुशाफिरी शब्दात आणि थोडक्यात सांगणे कठीणच आहे.
राजकारण आणि अत्रे यांचं फार सख्य होतं. संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील त्यांचे योगदान न विसरण्यासारखंच आहे. शिवाजी पार्कवरच्या भाषणांतून त्यांनी अनेक राजकीय बड्या धेंडांच्या टोप्या उडवल्या. यातून वरपासून खालीपर्यंत कुणीही सुटले नाही. त्यांचा दरारा विलक्षण होता. 'साप्ताहिक नवयुग' असो की 'दैनिक मराठा' असो त्यांनी सगळीकडे आपला शब्दांचा दांडपट्टा फिरवणे सुरूच ठेवले. यामुळे काही मित्र झाले तर काही शत्रू पण आत्रे यांना त्याची फिकीर कुठे होती ? अत्रे म्हणजे एक आग होती ज्याचे चटके त्यांच्यासह अनेकांना बसले. याचदरम्यान गाजलेला 'अत्रे-फडके' वाद हा एक महत्वाचा वाद. हा वाद दीर्घकाळ चालला. तरीही अत्रे यांचा दबदबा आणि त्यांची लोकप्रियता टिकून होती. अनेक वाद उत्पन्न झाले आणि त्यादरम्यान त्यांनी वापरलेल्या भाषेबद्दलही वाद झाले पण अत्रे अत्रे होते म्हणून त्या सगळ्याचा त्यांनी खंबीरपणे सामना केला.
राजकारण, समाजकारण, पत्रकारिता, चित्रपटसृष्टी, नाट्यसृष्टी आणि शक्य असणार्या जीवनाच्या सर्वच क्षेत्रात अत्रे यांनी ठसा उमटवला. आमच्या पिढीला त्यांना पाहण्याचं, ऐकण्याचं भाग्य नाही मिळालं पण त्यांनी मागे ठेवलेली त्यांची अफाट साहित्यसंपदा त्यांच्या अद्भुत व्यक्तिमत्वाची ओळख करून देत असते. ती वाचल्यावर त्यांच्या महान जीवनप्रवासाची महती समजते. आजच्या पिढीने अत्रे यांची पुस्तके, नाटके वाचली पाहिजेत आणि त्यांच्या एकूणच अष्टपैलू व्यक्तिमत्वाचीही ओळख करून घेतली पाहिजे कारण असा महान साहित्यिक, असं अष्टपैलू क्वचितच जन्माला येत असतं. आपलं भाग्य आहे की त्यांनी मराठी मातीत जन्म घेतला आणि इथे आपला ठसा उमटवला.
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे! प्र. के. अत्रे म्हणा आचार्य अत्रे म्हणा किंवा फक्त अत्रे म्हणा डोळ्यांसमोर येतो तो विद्वत्तेचा महाकाय पर्वत ! अत्र्यांची वाणी जितकी अफाट तितकंच त्यांचं कर्तृत्वही अफाट. एखादी दंतकथाच असावी अशी आचार्य अत्रे यांची कारकीर्द ठराविक शब्दांत मांडणे निव्वळ अशक्य ! तरीही आज आचार्य अत्रे यांची १२३ वी जयंती..त्यानिमित्ताने विनम्र आदरांजली म्हणून त्यांच्याविषयी लिहिण्याचा हा एक छोटासा प्रयत्न ..
_________________/\______________________
विनम्र अभिवादन ..
~ अनिल विद्याधर आठलेकर, पुणे
वाचनसंस्कृतीला हातभार लागावा, वाचनाबद्दल जनजागृती व्हावी या उद्देशाने 5 वर्षांपूर्वी पुण्यात सुरू केलेली वाचकमैफल आता पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित होत आहे.
काही अपरिहार्य कारणांमुळे आतापर्यंतच्या बैठका मर्यादित लोकांपुरत्या होत्या पण आता ही बैठक #सर्वांसाठी_खुली आहे ...
संस्कार भारती, पिंपरी चिंचवड, साहित्य विधा समितीच्या सहकार्याने यावेळी सोमवार, दिनांक 24/07/2023 रोजी ही वाचकमैफल बैठक प्रथमच पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित होत आहे ...
सर्व रसिक वाचकांचे स्वागत आहे -
मराठीच्या बोली आणि बोलीभाषांमधील विविधता
---------------------------------------------
“चाय मांड वं...”, “चहा ठेव गं...”, “च्याय कर गो..."
भाषा कोणतीही असो, प्रदेश कोणताही असो, घराघरात ऐकू येणारा हा हवाहवासा संवाद. कुणी मांड म्हणेल, कुणी टाक म्हणेल कुणी ठेव म्हणेल तर कुणी कर म्हणेल पण चहा होईल म्हणजे होईलच. चहा..! दोन अक्षरात किती जादू आहे! नाव घेतलं तरी तरतरी येते. सामान्य शेतकर्याचपासून ते अगदी राजकारण्यांपर्यंत, गरिबातल्या गरिबापासून ते अगदी गर्भश्रीमंत माणसापर्यंत सर्वांच्या घरी तितक्याच आवडीने आणि सहजतेने वावरणारा घटक म्हणजे चहा. शब्द वेगवेगळे असतील पण भावना मात्र तीच, किंबहुना अनुभवही तोच. हीच भाषेची गंमत आहे.
भाषा हे माणसाला मिळालेलं वरदानच आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. सर्व सजीवांमध्ये फक्त माणूसच भाषा बोलू शकतो, आपल्या भावना भाषेद्वारे व्यक्त करू शकतो. ही भाषा कशी निर्माण झाली याबाबत मात्र निश्चित अशी माहिती नाही. अभ्यासकांनी अनेक तर्क मांडले आहेत. ईश्वराने निर्माण केली, राजाने केली, निसर्गाकडून माणूस शिकला वगैरे वगैरे. यापैकी कोणत्याच तर्काने मात्र, भाषेची निर्मिती पुरेशा प्रमाणात स्पष्ट करू शकत नाहीत. आपल्या गरजा आणि आवश्यकता यांना अधिक प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी विचार करत असताना मनुष्याला आपल्या तोंडातील विशिष्ट पद्धतीने ध्वनि निर्माण करण्याच्या बलस्थानाचा शोध लागला असावा आणि त्यातून पुढे भाषा निर्माण झाली असावी.
आपल्या आयुष्यात भाषेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपली प्रत्येक कृती, आपले विचार भाषेच्या माध्यमातूनच सिद्ध होतात. सकाळी उठल्यापासून रात्री झोप येईपर्यंत किंबहुना रात्री झोपल्यावरही स्वप्नातदेखील भाषेचा वापर होत असतो. बोलता यायला लागल्यापासून ते शेवटचा श्वास घेईपर्यंत माणूस भाषा वापरत असतो. आपल्याला माहीत आहेच की माणूस हा समाजशील प्राणी आहे, त्यामुळे समाजात वावरतांना विविध लोकांशी त्याचा संपर्क, संबंध येतो आणि त्यावेळी प्रत्येक व्यक्तीशी बोलताना माणूस भाषाच वापरुन व्यवहार करत असतो.
भाषा बोलण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. आवाजातील चढउतार, आरोहअवरोह,विशिष्ट हेल, खास शब्दयोजना यानुसार प्रत्येक व्यक्तीची काही वैशिष्ट्यं असतात. व्यक्ती, विभाग, प्रदेश त्याचबरोबर अनेक असे घटक असतात ज्यामुळे प्रत्येकाच्या भाषेत वेगळेपणा असतो. मराठी भाषेचाच विचार केला तर एकूण एक लाख चौरस मैल इतका मराठीच क्षेत्रविस्तार आहे आणि मराठी भाषकांची संख्या जवळपास सात कोटींहून अधिक आहे. भाषा साधारणपणे बारा कोसांवर बदलते. कारण, भाषा ही सतत बदलत राहणारी गोष्ट आहे. यामुळेच दोन विविध शहरांमध्ये, गावांमध्ये राहणार्या लोकांच्या बोलण्यात तंतोतंत साम्य असत नाही. कोणत्याही प्रदेशात स्थानिक भाषाभेद असतातच, ते लक्षात घेता दैनंदिन व्यवहार सुरळीत व्हावेत म्हणून एका सर्वसाधारण बोलीची कोणत्याही प्रदेशाला गरज असते. अशाच प्रकारे, चांद्यायापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या मराठी भाषाकांमधील व्यवहार सुरळीत व्हावेत म्हणून एक सर्वसाधारण बोली म्हणून देशी मराठी भाषेला प्रमाण भाषेचं स्थान दिलं गेलं आहे.
आता, बोली म्हणजे तरी काय ? बोलण्यामध्ये जास्तीत जास्त साम्य आढळणार्याय व्यक्तींचा एखादा गट विशिष्टपणे वेगळा ओळखू येईल इतका जाणवू लागल्यास, त्या गटाच्या स्वाभाविक बोलण्याच्या पद्धतीला ‘बोली’ असं म्हणता येईल. एखादया भौगोलिक प्रदेशात किंवा संस्कृतीमधील लोकांच्या अंगवळणी पडलेले आणि मुद्दाम शिकावे न लागणारे शब्द हे बोलीमध्ये येतात. बोली मुखपरंपरेतून पुढे चालत जाते. महाराष्ट्रात साधारणपणे साठहून अधिक बोलल्या जातात. त्यात वर्हाूडी, नागपुरी,हळबी, अहिराणी, डांगी आणि मालवणी अशा प्रमुख बोली मानल्या जातात. कोकणीदेखील पूर्वी मराठीची बोली मानली जात असे, पण काही जणांना ते मान्य नाही आणि आता तर कोकणी ही गोव्याची राजभाषा आहे.
बोली म्हणजे मुख्यत: प्राथमिक स्वरुपात असणारं संभाषण माध्यम असतं. लहान मुलाची वेगळी भाषा असते, शाळेत जाणार्या मुलाची वेगळी, तरुणाईची वेगळी आणि ज्येष्ठ नागरिकांचीही वेगळी. स्थल,काल,वयोमानपरत्वे हे बदल होत असतात. 'संवाद साधणे किंवा भावना व्यक्त करणे' या प्रमुख गरजेपोटी मुखावटे विविध पद्धतीने काढलेल्या ध्वनींची एक अर्थपूर्ण साखळी म्हणजे 'बोली' असं आपण म्हणू शकतो. बोलीची स्वत:ची अशी वैशिष्ट्यं असतात ती यामुळेच. प्रत्येकाची सवय, लकब आणि क्षमता वेगवेगळी असल्याने आवाजातही तो बदल जाणवतो आणि आपण त्या त्या आवाजांच्या अनुरोधाने त्या व्यक्तीला ओळखतो किंबहुना त्याचं गाव, जिल्हा किंवा राज्यही ओळखतो.
बोलींच्या आपल्या-आपल्या गुणवैशिष्ट्यांमुळे लक्षात राहणं सोपं होतं. मालवणी बोलणारा 'माका,तुका' करतो तर नागपुरी बोलणारा 'मले,तुले' करतो. कोणी 'बे' म्हणतं तर कोणी 'रे', कोणी 'अगं' म्हणतं तर कोणी 'अगो' म्हणतं. ही गंमत बघायची असेल तर चार-पाच विविध प्रदेशातील मित्र एकत्र भेटले की त्यांच्यात होणारा अनौपचारिक संवाद कान देऊन ऐकावा. अगदी कोणत्याही आडपडद्याशिवाय बोलली जाणारी बोली अशा मैफिलींमध्ये अनुभवायला मिळते.
आपण ना, विनाकारण आपल्याच कृतीनं आपलं साधं, सोपं आणि सुंदर जीवन उगाच क्लिष्ट आणि कुरूप करून टाकतो. नको नको ते वाद, भांडणं, भेदाभेद आणतो आणि अस्सल सोन्याची माती करतो. भाषा हे सोनं आहे आणि बोली म्हणजे त्या सोन्याची झळाळी. हे लक्षात न घेता 'प्रमाण' श्रेष्ठ की 'बोली' श्रेष्ठ असे काहीही गरज आणि आधार नसलेले वाद करत-उकरत बसतो. भाषा ही कोणत्याही एका विशिष्ट वर्गाची मालकी नसते. भाषा सर्व ‘ती बोलणार्याघ आणि बोलता येणार्या व्यक्तींची’ असते. त्यामुळे मग त्यात श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद उद्भवतच नाही. आपण डोळे उघडून बघतच नाही आणि आंधळेपणा हा आपला आजार असल्याचं निदान आपणच करून बसतो. डोळे उघडून बघा, जग सुंदर आहे आणि हे सुंदर जग भाषेच्या माध्यमातून तुम्ही अनुभवू शकता. विविध परदेशांतील लोकांना भेटा, त्यांच्याशी बोला. त्यांची भाषा वेगळी असेल, ती समजून घेण्याचा प्रयत्न करा. शब्द कळले नाहीत तरी त्यातील आवाजावरून मथितार्थ नक्की लक्षात येईल आणि मग तुम्ही त्या भाषेच्या, लोकांच्या प्रेमात पडाल. एकदा असे डोळसपणे प्रेमात पडलात की जग सुंदर असल्याचं तुम्हाला नक्की जाणवेल.
बोली म्हटलं की आपल्याला ‘इरसालपणा’ आठवतो. साहित्यातूनही या बोलींना अनेक लेखकांनी अमर केलं आहे. श्री.म.माटे, बहिणाबाई चौधरी, ग.दि. आणि व्यंकटेश माडगूळकर, द.मा.मिरासदार,शंकर पाटील, आनंद यादव, रा.रं.बोराडे, उद्धव शेळके, गंगाराम गव्हाणकर यांच्यासह अगदी पु.ल.देशपांडे, बा.भ.बोरकर यांनीही या ना त्या प्रकारे बोली मुख्य प्रवाहात आणली. पु.ल. देशपांडे यांचा अनुनासिक कोकणी बाजाची मराठी बोलणारा अंतु बर्वा असो, कर्नाटक महाराष्ट्र सीमाभागातील कानडी प्रभावाखाली असणारी मराठी बोलणारे रावसाहेब आपल्याला आवडतात आणि लक्षातही राहतात. बोरकरांनी गोमंतकीय कोंकणी भाषेत लिहिलेली 'तुजिं गो पांयजणां' आजही जवळजवळ प्रत्येक मराठी रसिकाच्या हृदयात आहे. भाषा कधीच भेद करत नाही, भेद माणसं करतात. भाषा काय करत असेल तर ते ‘जोडण्याचं काम’ करते, भाषा दोन संस्कृती जोडते, दोन प्रदेश जोडते, दोन मनं जोडते.
बोलीच्या निर्मितीची कारणं अनेक असू शकतात जशी की विशिष्ट भूभाग आणि इतर उर्वरित भाग यांच्यात दळणवळणाची साधने नसणे, दुष्काळ किंवा अन्य नैसर्गिक आपत्तींमुळे झालेली स्थलांतरं,सत्तांतरं, राजकीय हस्तक्षेप, युद्धप्रसंगांमुळे झालेल्या निर्वासितांच्या समस्या, व्यवसाय, लिंगभेद, सांस्कृतिक सामाजिक दर्जा, भौगोलिक परिस्थिती, वैवाहिक नातेसंबंध त्याचप्रमाणे विविध कारणांमुळे होणारे पर्यटन, प्रवास इत्यादी गोष्टींमुळे बोलींमध्ये विविधता येत जाते.
महत्त्वाची गोष्ट ही आहे की प्रमाणभाषा आणि बोली यांचा खूप जवळचा संबंध आहे. खरंतर, प्रमाण आणि बोली एकमेकांना पूरक आहेत. प्रमाणभाषेला अनेक नव्या शब्दांची देणगी बोलीकडूनच मिळते तर प्रमाण भाषेतून जवळजवळ अदृश्य झालेले शब्द बोली भाषाच जपून ठेवते, जिवंत ठेवते. या अर्थी, बोली ही एक अत्यंत जिवंत भाषापद्धती आहे. प्रमाण भाषेला एक चौकट असते, त्या चौकटीत तिला वागणं क्रमप्राप्त असतं, पण बोलीचं तसं नाही. बोली स्वयंभू असते, स्वतंत्र असते. बोलीला वेगळी लिपीदेखील नसते, कारण ती सामान्यातल्या सामान्य माणसाच्या मनाची भाषा असते. लोकांनी लोकांसाठी जगवलेली व जपून ठेवलेली लोकांची भाषा म्हणजे बोली. शिव्या असोत की ओव्या, बोलीत त्या अमृतासारख्या वाटतात, कारण त्यातला भाव शुद्ध असतो. प्रमाण भाषा ही शासनव्यवहार तसेच इतर राज्यांतर्गत व्यवहार सुरळीत व सुलभ व्हावेत म्हणून निश्चितच गरजेची आहे. त्यामुळे तिच्याबद्दल आकस वा गैरसमज असण्याचं कोणतंही कारण नाही. बोलीला उत्तम म्हणण्यासाठी प्रमाण भाषा वाईट म्हणण्याची गरजच नाही मुळी. दोघांचंही स्वतंत्र सहअस्तित्व मान्य केलं की वादाचं रूपांतर सुसंवादात होतं आणि हे एक प्रकारे माध्यमांतर शक्य होतं ते भाषेमुळेच.
आज माणुसकी हरवत चाललेल्या काळात अस्सल जगण्याची ओळख असणार्याह बोलीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बोलीकडून तिचं शुद्ध सत्व घेऊन मराठी भाषेची पताका सदैव फडकवत ठेवण्यासाठी प्रमाण भाषेचीही मदत घेऊ. मायबोली म्हणजे आईची भाषा, आईची माया करणारी भाषा. मग, आई कधी सापत्नभाव करते का? आई ही आई असते. आईच्या मायेने आपल्या पंखाखाली घेतलेल्या या सर्व बोली जपू. त्यांना मान देऊ. आपल्या बोलीत बोलणार्याप सामान्य माणसाला कमी न लेखता, त्याचा अभिमान असणारी बोली जाणून घेऊ. मराठी भाषेचा गौरव करण्यासाठी आपली मराठी भाषा किती समृद्ध आहे हे स्वत: अगोदर जाणून घेऊ आणि सर्वांना समजावून देखील सांगू. भाषा जगली तर संस्कृती जगेल आणि संस्कृती जगली तरच मानवता जगेल. म्हणूनच आपली भाषा आपणच जपू आणि तिची पालखी सदैव आपल्या खांद्यावर वाहू. ‘भाषेचे भोई’ होण्यात मिळणार्या समाधानाचं वर्णन करण्याचं सामर्थ्य आणखी कशातच नसेल, नाही का?
~ अनिल विद्याधर आठलेकर
[ संदर्भसूची : *मालशे,इनामदार,सोमण (संपादक), भाषाविज्ञान:वर्णनात्मक आणि ऐतिहासिक, पद्मगंधा, 1982 | *मालशे,पुंडे,सोमण, भाषाविज्ञान परिचय, पद्मगंधा,1987 | *गोखले करुणा, प्रामाणिकही,सुंदरही..., राजहंस, 2021, |* मराठी विश्वकोश ]
#मराठी_भाषा_गौरव_दिन #मराठीभाषा_आणि_बोली
भाषा! म्हणाल तर क्लिष्ट, अवघड वाटणारी बाब, पण जर मनापासून शिकण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न कराल तर भाषेसारखी मनोरंजक गोष्ट दुसरी कुठली नाही.
मनोरंजक म्हणालो आणि मला माझ्या मालवणीतला एक विनोद आठवला,
मी शाकाहारी माणूस. त्यामुळे अर्थातच मासे-मटण खात नाही. हे सर्वांना माहीत असल्यामुळे त्यावरून गमतीजमती होत. एकदा एक मित्र मला म्हणाला,
'' आठलेकरा, मी मासे खाताना तुका कितीवेळा बघलंय!''
त्यातली खोच मला माहीत असल्यामुळे मी त्याला लगेच म्हणालो,
'' मेलेलो बैल मी झाडावर चढताना बघलंय तेव्हाच मां?''
ही दोन वाक्यं नीट लक्ष देऊन वाचल्यास यातली गोम तुमच्याही लक्षात येईल.
मराठीत असे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत.
'' तू माझी बायको मी तुझा नवरा सिनेमाला जाऊ...''
हे वाक्य विरामचिन्हे न देता म्हटल्यावर होणारा विनोद असो की
'' महाराष्ट्रात सर्वात मोठे नाटककार कोण असतील तर ते मामा वरेरकर!'' (असं मोठ्या आवाजात बोलून, मग हळू आवाजात म्हणायचं..) ''असं त्यांचं स्वतःचं मत आहे!''
शब्दनिष्ठ विनोद असो, प्रसंगनिष्ठ विनोद असो की भाषिक कोट्या भाषा शिकण्याचा आणि तिच्याशी मैत्री करण्याचा हा एक जवळचा मार्ग आहे.
अशाच हलक्याफुलक्या शैलीत २००२ साली दै.लोकसत्ताच्या 'पुणे वृत्तान्त' पुरवणीसाठी 'भाषा-वेध' सदर लिहिणारे लेखक द.दि.पुंडे यांच्या या सदरातील लेख आणि त्याबरोबरच काही पूरक ललितलेख अशा एकूण ४१ खणखणीत लेखांचं पुस्तक म्हणजे मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसने २००४ साली प्रकाशित केलेलं पुस्तक -
'भयंकर सुंदर मराठी भाषा '
लेखक पुंडे या लेखांमध्ये अत्यंत साध्या व सोप्या शैलीत विनोदी चिमटे घेत या गमतीजमती सांगतात. कधी हळूच आपण गालात हसतो तर कधीकधी खोखो हसतो. अनेक ऐकीव-लिखित संदर्भ, कथा, कहाण्या, किस्से अशा घटकांनी ओतप्रोत भरलेलं हे पुस्तक भाषेची आवड असणाऱ्यांसाठी त्याचप्रमाणे भाषेची आवड लागावी अशी इच्छा असणाऱ्यांसाठीही खूप उपयुक्त आहे. (दुर्लक्षित करावेत इतपतच काही किरकोळ मुद्रणदोष आहेत.) रात्री जेवून झाल्यावर वाचता येईल, दुपारच्या सुट्टीत वाचता येईल, चहा घेता घेता वाचता येईल किंवा अगदी समविचारी मित्रमंडळी जमवून एकत्रितपणे आनंद घेत वाचता येईल इतकं 'भयंकर सुंदर' आहे.
नक्की वाचा -
पुस्तक : 'भयंकर सुंदर मराठी भाषा'
प्रकाशन : मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
मूल्य : ₹ १३०/- फक्त
धन्यवाद...
©अनिल विद्याधर आठलेकर, पुणे
संपर्क क्रमांक - 9762162942
कोण म्हणतो/म्हणते/म्हणतंय लोक पुस्तकं वाचत नाहीत ?
-------------------------------------------------------------------------
आहेत, म्हणणारे तसे बरेच आहेत, पण तुम्ही किती प्रयत्न केलेत बरं लोकांनी वाचावं म्हणून ? तर, उत्तरादाखल मिळेल -मौन! बोलणं तसं सोपं आहे पण आपण काहीतरी सक्रिय सहभागही नोंदवला पाहिजे ना ? गेली 4 वर्षे वाचकमैफल उपक्रम सातत्याने चालवून वाचनसंस्कृतीला थोडीफार का होईना चालना देण्यासाठी आपला वाटा मी उचलत असल्याने त्यावर बोलायचं नक्कीच धाडस करू शकतो असं मला वाटतं.
आज विषय असा आहे की, लोकांचं आयुष्य फारच गतिमान झालेलं आहे. इतकं की सकाळी उठल्यानंतर रात्री झोपेपर्यंत वाट्याला येणार्या मिनिटामिनिटाचा हिशोब करून वेळापत्रक आखलेलं असतं. त्यात इच्छा असूनही अशा खरेदीसाठी वेगळा वेळ काढणं खरंच काही लोकांना शक्य होत नाही. ( शब्दश: जीवनावश्यक गोष्टींमध्ये पुस्तकं येत नसल्याने असावं कदाचित !) दुसरं म्हणजे आजकाल इन्स्टंट गोष्टी जागीच मिळण्याची सुविधा उपलब्ध झाल्यापासून सगळं जागीच मिळावं असं वाटतं. यात गैर असं काही नाही, आवड असल्यास सवड मिळतेच, पण आवडी किती आहेत आणि त्यांना प्राधान्यक्रम कसा देता यावरही गोष्टी अवलंबून असतात ना !
एवढं सगळं सांगायचं कारण म्हणजे गेल्या डिसेंबर महिन्याच्या अखेरीस अधिकृतपणे मी पुस्तकविक्रीची घोषणा केली. त्या दिवसापासून आजपर्यंत (तसा जेमतेम एक महिन्याचा कालावधी ) अधिक पुस्तकं गेली नसली तरी वाचकांचा कल मात्र लक्षात आला आहे आणि तो नक्कीच कौतुकास्पद आणि उत्साहवर्धक ( काही दिवसांत अभामसासंमधील पुस्तकविक्रीचा आकडाही समजेलच) आहे.
उल्लेखनीय म्हणजे
1) मारुती चितमपल्ली यांचं 'चकवाचांदण' ( मूल्य : रु. 1000 )
आणि
मुक्ता आगशीकर यांनी संपादित केलेलं
2) 'अक्षय कविता बाकीबाबांची' (मूल्य 1200/-)
या पुस्तकांना मागणी येते याचाच अर्थ वाचक सजग आहे आणि उत्तम वाचतही आहे. गरज आहे ती आपण योग्य प्रकारे योग्य ती माहिती आणि ज्ञान वाचकांपर्यंत पोहचवण्याची. याशिवाय तसं पाहिलं तर टेक्निकल असं असणारं करुणा गोखले यांचं पुस्तक 'प्रामाणिकही, सुंदरही..' देखील मी इथे केलेल्या पोस्टनंतर किमान 5 ते 6 जणांनी जमेल तिथून विकत घेतलं.
चुका दाखवण्यात काही गैर आहे असं नाही पण त्या सुधारण्यासाठी उपाय सुचवण्यातही जर तुम्ही पुढाकार घेत असाल, तर तुम्ही खरे हितचिंतक. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचा एक वाचन वाटाड्या म्हणून काम करण्यात ला मिळणारा आनंद म्हणूनच अवर्णनीय आहे. पुस्तक जर योग्य व्यक्तीपर्यंत पोहचत असेल तर ते मिळवण्यासाठी आणि पाठवताना माझं पेट्रोल किती गेलं आणि वेळ किती गेला याचा हिशोब मी करत नाही कारण त्यादरम्यान जमा झालेलं समाधानाचं व्याज न मोजता येईल एवढं असतं.
दुष्यंतकुमारांच्या शब्दात सांगायचं झालं, तर -
सिर्फ़ हंगामा खड़ा करना मिरा मक़्सद नहीं
मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए ...
~ अनिल विद्याधर आठलेकर
मोबाइल : 962162942
गोव्याची भूमी तशी आमची अगदी शेजारी म्हणजे 'वेंगुर्ल्याचा पाऊस' 'माझ्या गोव्याच्या भूमीत' सहजपणे निघून जावा इतकी जवळ. तिचा तसा भौगोलिक लळा आहेच पण तिच्याशी एक वेगळं नातंही आहे. त्या नात्याचं नाव आहे बाकीबाब अर्थात थोर कविवर्य पद्मश्री बा.भ.बोरकर!
बाकीबाबांची कविता लहानपणापासून वाचत आलोच पण एक शालेय विद्यार्थी ते एक रसिक चाहता या प्रवासात अनेक मंत्रमुग्ध करणारे क्षण जमा होत गेले. गोखले इन्स्टिट्यूटमध्ये (मला वाटतं 'कलासंगम'अंतर्गत) सलील कुलकर्णीचा 'बाकीबाब आणि मी' कार्यक्रम ऐकला आणि यात आणखी एक मोरपीस जोडलं गेलं. सलील ज्या तन्मयतेने आणि प्रेमाने बोरकर उलगडून सांगतो त्याला तोड नाही.
बोरकर, पोएट बोरकर...
तुमचा प्रत्येक शब्द 'संधिप्रकाशातलंच नाही तर युगानुयुगे झळाळत राहील असं सोनं' आहे आणि ते तुम्ही आमच्या झोळीत टाकून गेलात. याअर्थी आमच्यासारखे भाग्यवान आम्हीच असं म्हटलं तर वावगं ठरू नये. 'अक्षय कविता बाकीबाबांची' हा तर हृदयात जपून ठेवावा असा खजिना. मुक्ता आगशीकर यांनी हे जे अमूल्य काम केलं आहे त्यासाठी अखिल बाकीबाब रसिक त्यांचे सदैव ऋणी राहतील.
साधारणपणे 'सकाळ होणे' ही एक नैसर्गिक आणि दैनंदिन प्रक्रिया आहे, पण ती सुंदर आणि रम्य होणे हे मात्र भाग्यात लिहिलेलं असावं लागतं. सध्या प्रत्येक सकाळ अशी रम्य आणि सुंदर होत आहे. सकाळी उठताच दोन-चार क्षण या 'काव्यधर्मग्रंथावर' नजर जरी फिरवली तरी दिवस खूप सुंदर जाण्याची हमीच मिळते जणू.
या साहित्यकृतीला 'पुस्तक' म्हणणं थोडं संकुचित होईल, ही प्रत्येक सारस्वतासाठी, काव्यरसिकासाठी गीता आहे. बाकीबाब नावाच्या भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली.
साष्टांग नमन ...
प्रत्येक रसिकाने वाचलाच पाहिजे असा ग्रंथ:
'अक्षय कविता बाकीबाबांची'
संपादन : मुक्ता आगशीकर
मूल्य : रु. १२००/-
~ अनिल विद्याधर आठलेकर, कुडाळ.
मोबाइल - 9762162942
माझी वाचन प्रेरणा
खरं तर पुस्तकांचा लळा लागायला सुरूवात झाली तेव्हा कळतही नव्हतं की याला वाचन म्हणतात.....
मला आठवतंय त्यानुसार मी तेव्हा प्राथमिक मधे होते, म्हणजे पहिली ते चौथी मधे कुठेतरी... अक्षर ओळख पूर्ण होऊन छान एकसंधपणे वाक्य वाचता येत होते आणि त्याचा अर्थ पण कळत होता. तेव्हा आईने मला मोठ्या मोठ्या अक्षरातली जोडाक्षरविरहीत दोन पुस्तकं आणली होती.
आई पोळ्या करायला ओट्याशेजारी उभी राहिली की मी खाली बसून एकेका शब्दावरून बोट ओढत तिला वाचून दाखवायचे. ते फक्त माझ्यासाठी असलेलं माझं गोष्टीचं पुस्तक होतं. धाकट्या बहिणीच्या हाताला लागून त्याची पानं मोकळी होऊ नयेत म्हणून खूप जपायचे मी त्याला. 😊
मग चौथीत गेल्यावर स्कॉलरशिपला बसवलं आईने. त्यात मराठी विषयातल्या म्हणी, वाक्प्रचार हे सगळं कळायला लागल्यावर तिने दिवाळीच्या सुट्टीत माझ्यासाठी कॉमिक्स आणली. उन्हाळ्याच्या सुट्टीत तर गावीच जायचो, पण दिवाळीची सुट्टी दिवाळी झाली, दिवाळीचा अभ्यास झाला की आईचं डोकं खाण्यात जातेय असं लक्षात आल्याबरोबर तिने बहुतेक मला पुस्तकांची सवय लावायचा विचार केला असावा तेव्हा 😃
त्यात आधी पौराणिक कथांपासून सुरुवात झाली, म्हणजे रामकथा, कृष्णलीला, हनुमान कथा अशा..... आणि हळूहळू नल दमयंती, शकुंतला, स्वप्न वासवदत्ता ही पण कॉमिक्स वाचायला मिळाली. ( नंतर कळलं की ते मुळात शृंगार वाङ्मय आहे, पण त्यावेळी ते लहान मुलांना कळेल अशा गोष्टी रुपात होतं.)
मला तर त्यांची मुखपृष्ठांवरची चित्रं पण अजून डोळ्यासमोर आहेत.
मग दर महिन्याला चांदोबा घरात यायला लागला. तो तर आधी आई बाबा पण वाचायचे आणि मग माझ्या हातात पडायचा. 😃
मग पाचवीच्या दिवाळीच्या सुट्टीत तिने मला समग्र कथारुप रामायण आणून दिलं. एवढं जाडं पुस्तक सुट्टी संपायच्या आत वाचून पूर्ण करायचं म्हणून मी अगदी जेवताना सुद्धा पुस्तक वाचत वाचत जेवायचे.... खरंच.... अजून आठवतंय मला....एका मांडीवर पुस्तक आणि एका मांडीवर ताट 😂
जे काही वाचेन ते आईला सांगायचं असायचं, त्यामुळे बारकाईने वाचलं जायचं.... कदाचित म्हणूनच त्यातल्या काही काही गोष्टी अजूनही लक्षात आहेत.
ते झाल्यावर दुसऱ्या वर्षी कथारुप महाभारत आणलं.ते तर रामयणापेक्षाही मोठं होतं 🙄
मग दुपारी खेळायच्या ऐवजी माझ्या हातात पुस्तकच दिसायचं.कदाचित तिथूनच माझी 'वाळवी' व्हायची सुरूवात झाली होती. 😍
त्यानंतरच्या सुट्टीत तिने मला दिवाळी अंकाची लायब्ररी लावून दिली. तेव्हा बाल, कुमारांसाठी खूप छान छान दिवाळी अंक निघायचे. त्यात किशोर, कुमार हे अग्रणी होते. एक महिनाभर ती लायब्ररी असायची. ती दरवर्षी सुरू झाली त्यानंतर.
आणि मग आठवीत गेल्यावर रितसर शाळेची लायब्ररी लावायची परवानगी मिळाली आणि तिथून मग माझ्या वाचनाची घोडदौडच सुरू झाली........
आता हे सगळं आठवताना कळतंय की माझी आईच माझ्या वाचनाचं प्रमुख प्रेरणास्थान आहे ❤❤❤❤
~ डॉ. Madhuri Chavan-Joshi , देवगड
प्रसिद्ध कवयित्री, गझलकारा
( 'मधुघट' हा गझलसंग्रह प्रकाशित )
Click here to claim your Sponsored Listing.
Videos (show all)
Category
Contact the establishment
Telephone
Website
Address
Pune, 411014
If you are an artist or an art lover- this is the right place for you! Photography | Paintings| Writi
NDA Pashan Road
Pune, 411021
Shree Ektatvam Academy of Performing Arts is an institute established by Bhagyashree Kulkarni. Bhagy
Pune, 411057
Welcome to Parmeshwar kripa where we share interesting stories about ancient history and mythology!
Pune
"Bolly Minds: Where Inspiration and Entertainment Collide!" "प्रेरणा और मनोरंजन की जगह!"
Pune
hello friends I am badal kumar here you will see me playing online or offline games comedy entertainm
Pune, 412101
I stream PUBG Mobile esport game everyday. You can expect a rush unknown battle game play More tips and tricks . My youtube channel is Vrish gaming and I am adding advancements eve...
HARI KALA MUSIC CLASSES , ANAND CORNER APPARTMENT NEAR ANAND PARK BUS STOP WADGAON SHERI PUNE 14
Pune, 411014
HARMONIUM, PIANO, TABLA, GUITAR, DANCE & YOGA CLASSES