Archana Sonde
“Without publicity there can be no public support, and without public support every nation must de
The Lady Boss : दी इलेक्ट्रिक लेडी : हेमलता अन्नामलाई
आज आपल्याला रस्त्यावर सर्रास वीजेवर चालणारी ई- वाहने दिसतात. मात्र 16 वर्षांपूर्वी ई वाहने इतकी रस्त्यावरून धावतील याची कुणी कल्पना देखील केली नव्हती केली. तिच्या दूरदृष्टीने मात्र गाड्यांचं हे भविष्य हेरलं होतं. तिने 2008 मध्ये ई वाहन निर्मितीची कंपनी सुरू केली. भारतीय उद्योजकांचे आदर्श रतन टाटा यांनी तिच्या वाहन उद्योग निर्मिती मध्ये गुंतवणूक केली. ही गोष्ट आहे भारतातील दी इलेक्ट्रिक लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अँपियर व्हेईकलच्या सह संस्थापिका हेमलता अन्नामलाई यांची.
हेमाचा जन्म तामिळनाडू मधील सालेममध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. सहा भावंडांमध्ये तिचा नंबर पाचवा. तिचे वडील प्राध्यापक आणि आई शिक्षिका होती. दोन्ही पालक शिक्षक असल्याने हेमलता पण शिक्षिका बनेल असे लोकांना वाटायचे. मात्र हेमलताला तिची आवड जोपासण्याचे स्वातंत्र्य तिच्या आई-बाबांनी दिले. तिने कोईम्बतूर येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी मिळवली आणि विप्रोमध्ये काम करायला सुरुवात केली. पाच वर्षे काम केल्यावर, ती दुसऱ्या कंपनीत गेली जिथे तिने बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून काम केले. या कामामुळे तिला तिची मास्टर्स पूर्ण करण्यासाठी प्रेरणा मिळाली. हेमलताने ऑस्ट्रेलियाच्या रॉयल मेलबर्न इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून पदव्युत्तर पदवी मिळवली.
विप्रोमधील नोकरी दरम्यान तिला जाणवलं की ती लोकांमध्ये रमणारी व्यक्ती आहे. एका ठिकाणी बसून काम करणे हे तिच्यासाठी नाही. केयेन सॉफ्टवेअरमध्ये बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून तिने विविध देशांतील लोकांशी संवाद साधला. लोकांसोबत चर्चा करताना तिला तिच्यामध्ये दडलेल्या उद्योजकीय कौशल्यांची ओळख झाली. आपल्यामधील उद्योजकीय कौशल्यांचा वापर करून हेमाने मनुष्यबळ समस्या सोडवण्यासाठी सिंगापूरमध्ये एक एचआर सल्लागार कंपनी, उनी कनेक्ट नावाने सुरू केली. ही कंपनी यशस्वीरित्या हाताळल्यानंतर, तिने आणखी तीन कंपन्यांची सह-स्थापना केली सॉफ्टवेअर टूल्स, तिकीट सेवा आणि तंत्रज्ञान प्रशिक्षण सेवा आदी क्षेत्रातील या कंपन्या होत्या.
जून 2007 मध्ये, जेव्हा हेमाचे पती बाला पच्यप्पा जपानमधील वाहन संबंधी परिषदेमध्ये गेले होते तेव्हा त्यांना इलेक्ट्रिक वाहने बनवण्याची कल्पना आली. येत्या काही वर्षांत अंतर्गत ज्वलन इंजिने हळूहळू संपतील याविषयी दिग्गजांचे बोलणे ऐकले. प्रचंड संशोधन आणि दक्षिण भारतीय राज्यांमध्ये फिरल्यानंतर, दोघांनीही 2008 मध्ये अँपियर व्हेईकल प्रा. लि. ची स्थापना केली.
अँपियर व्हेईकल्ससाठी बाजारात आपली छाप पाडणे सोपे नव्हते. मात्र चिकाटी आणि नाविन्यपूर्ण विपणन धोरणाने अल्पावधीत कंपनीने आपली ओळख निर्माण केली.
स्थापनेच्या पहिल्या सहा महिन्यांत केवळ 69 ई-वाहनांची विक्री झाली. कंपनीने जेव्हा दिव्यांगांच्या गरजा दर्शविणारी वाहने तयार केली आणि तामिळनाडू सरकारला 1200 स्कूटर पुरवल्या, तेव्हा साऱ्यांचे लक्ष वेधले गेले. हळूहळू कंपनीला विस्तार करण्यासाठी गुंतवणूकदार आणि उत्पादन संशोधन व विकास करणारी उत्कृष्ट टीम मिळाली. कंपनीसाठी मोठा टर्निंग पॉइंट तेव्हा आला जेव्हा रतन टाटा यांनी हेमलता यांच्या कंपनी मध्ये गुंतवणूक केली.
अँपियरची स्थापना लोकांच्या जीवनात पर्यावरण पूरक दळणवळण पर्याय आणण्यासाठी आणि दुचाकी परवडणारी असावी यासाठी करण्यात आली. कंपनी इलेक्ट्रिक सायकल, स्कूटर, तीनचाकी आणि दिव्यांगांसाठी खास बनवलेल्या वाहनांचे उत्पादन करते. ऊर्जा वाचवणे आणि इंधनमुक्त करणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. इतकेच नव्हे तर वाहनांच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल हा स्वदेशी आहे. अँपियर व्हेईकल्सने ग्रीव्ह्स कॉटन या वैविध्यपूर्ण अभियांत्रिकी कंपनीसोबत करार केला आहे.
हेमलता या उत्कटतेने कंपनीचे नेतृत्व करत आहेत. रतन टाटा आणि इन्फोसिसचे सह-संस्थापक क्रिस गोपालकृष्णन या दोन मोठ्या दिग्गज उद्योगपतींच्या पाठिंब्याने तिच्या कंपनीची वाटचाल सुरू आहे. तिला भारतातील टेस्ला मोटर्स तयार करण्याची इच्छा आहे. तिचे लक्ष गुंतवणुकीपेक्षा ब्रँड निर्मिती आणि मार्केटिंगवर आहे. कंपनी आयात केलेल्या सामग्रीपेक्षा स्वदेशी सामग्रीचा वापर करण्यास प्राधान्य देते.
हेमलताने महिलांचे सक्षमीकरण करून आणि लैंगिक असमानता दूर करून बदल घडवून आणला आहे. तिच्या कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 30% महिला आहेत आणि त्रिसूल ही अँपिअर व्हेइकल्सने विकसित केलेली इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर प्रामुख्याने तामिळनाडूच्या महिला गिरणी कामगारांच्या गरजांसाठी निर्माण करण्यात आली होती. दरवर्षी 22000 हून अधिक वाहनांची विक्री करून, अँपियर व्हेईकलने खेडे आणि शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांचे जीवनमान उंचावले आहे.
2010 मध्ये, हेमलता यांनी सर्वोत्कृष्ट उत्पादन डिझाईनचा पुरस्कार जिंकला आणि उत्पादन क्षेत्रातील डिसप्टर ऑफ तामिळनाडू पुरस्कार प्राप्त केला. 2017 मध्ये, त्यांना रोटरी क्लब ऑफ मद्रास ईस्ट द्वारे प्रदान करण्यात आलेला महिला उद्योजक पुरस्कार देखील मिळाला आहे.
नवोदित उद्योजकांसाठी त्या मोलाचा संदेश देतात. केवळ ट्रेंड आहे म्हणून उद्योग न उभारता सतत मूल्यमापन आणि तयारीसह कल्पना राबविणाऱ्या उद्योजकांचे त्या कौतुक करतात.
कोणत्याही महिलेला प्रेरणादायी ठरेल अशीच ही इलेक्ट्रिक लेडी आहे.
प्रहार मंथन - 28 April 2024
दी लेडी बॉस
अर्चना सोंडे
मुंबई, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
The Lady Boss : मेहक सागर
`घर पहावे बांधून, लग्न पहावे करून’ अशी आपल्याकडे म्हण आहे. लग्न करताना किती संघर्ष करावा लागतो हे तिने अनुभवलं आणि त्या अनुभवातून विवाह नियोजन कंपनीची तिने स्थापना केली. ही गोष्ट आहे मेहक सागरच्या `वेड मी गुड’ कंपनीची.
मेहक सागरने 2007 ते 2009 दरम्यान दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्रात एम.ए. पूर्ण केले. 2008 मध्ये ग्लॅक्सो स्मिथक्लाइन येथे मार्केटिंगसाठी समर इंटर्न म्हणून करिअरची सुरुवात केली. 2009 मध्ये ती आयसीआयसीआय बँकेत बिझनेस इंटेलिजन्स युनिटसाठी मॅनेजमेंट ट्रेनी बनली. 2010 मध्ये गुडगावमधील ती अमेरिकन एक्सप्रेसमध्ये जोखीम विश्लेषणासाठी व्यवसाय विश्लेषक म्हणून रुजू झाली आणि त्याच विभागात सहाय्यक व्यवस्थापक म्हणून पदोन्नती देखील मिळवली. शेवटी, 2014 मध्ये मेहक `वेड मी गुड’ची सह-संस्थापक बनली. तिच्याकडे एक सर्जनशील बाजू देखील होती. तिला सौंदर्य आणि फॅशन उद्योगाविषयी गोष्टी आवडायच्या.
ही आवड जोपासण्यासाठी तिने पीचेस अँड ब्लश नावाचा ब्लॉग सुरू केला. मेहकच्या करिअरचा मार्ग पूर्णपणे बदलण्याच्या प्रवासाची ही फक्त सुरुवात होती. त्या वेळी, तिची स्वतःची विवाह नियोजन कंपनी असण्याची कोणतीही योजना नव्हती. ती आयुष्याच्या अशा टप्प्यावर होती जिथे ती स्वतःच्या लग्नाची योजना आखत होती आणि हैदराबाद शहरात ती नवीन होती. हैदराबाद मध्ये लग्नाचे ठिकाण, फोटोग्राफर किंवा मेकअप आर्टिस्ट शोधणे तिला खूप कठीण होते. तिने तिच्या ब्लॉगवर नवीन शहरात लग्नाची योजना आखण्यासाठी आलेल्या सर्व अडचणींबद्दल लिहिले.
बऱ्याच लोकांनी ते वाचायला सुरुवात केली. या पोस्टसाठी तिच्या ब्लॉगवर प्रचंड फॉलोअर मिळाले. लोकांचा हा पाठिंबा पाहून तिचं विचारचक्र सुरू झालं. तिने इंटरनेटवर संशोधन केले आणि तिला असे आढळले की भारतात फारच कमी ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहेत जे वधूंना त्यांच्या लग्नाचे नियोजन करण्यास मदत करतात.
जिथे अनेकांना अडचण दिसायच्या तिथे मेहकला व्यवसायाची संधी सापडली. तिने एक कंपनी तयार करण्याचे ठरवले जे लग्न करू पाहणाऱ्या कोणालाही छायाचित्रकार, लग्नाचा हॉल, मेकअप आर्टिस्ट, केक, लग्नासाठी लागणारे मनोरंजन आणि बरेच काही सहजपणे शोधण्यास मदत करेल. 2014 मध्ये आपली पूर्ण वेळ नोकरी सोडून मेहकने वेड मी गुड ही विवाह नियोजन करणारी कंपनी सुरू केली. मात्र कंपनी कशी चालवायची याबद्दल तिला पुरेसे ज्ञान नव्हते.
कंपनी चालवता यावी यासाठी तिला सोशल मीडिया आणि डिजिटल मार्केटिंगबद्दल सर्व काही शिकावे लागले. हे तिच्यासाठी पूर्णपणे नवीन क्षेत्र होते, परंतु तिने शून्यापासून सुरुवात केली. सुरुवात कठीण होती, पण लवकरच तिला यश मिळाले. सुरुवातीला, मेहकला तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी संघर्ष करावा लागला. पण काही वर्षांनंतर, तिने तिची तंत्रज्ञ असलेली टीम तयार केली. कंपनीच्या नावे वेबसाइट सुरू केली.
आज, तिच्या कंपनीला 10 वर्षे झाली. जी आता 5 दशलक्ष वापरकर्त्यांसह भारतातील सर्वात मोठे विवाह नियोजन व्यासपीठ बनली आहे. मेहकची कंपनी हे निश्चित करते की भारतीय वधूंना त्यांच्या लग्नाचे नियोजन करण्यासाठी यापुढे संघर्ष करावा लागणार नाही. `वेड मी गुड’ लग्नाची योजना आखणाऱ्या प्रत्येकासाठी खरी भेट आहे कारण तिचा तिच्या कल्पनेवर विश्वास होता!
२०१६ मध्ये मेहक सागरला फोर्ब्सच्या ३० वर्ष खालील वयोगटातील ३० आशियाई उद्योजकांच्या ई-कॉमर्स आणि रिटेल श्रेणीमध्ये स्थान देण्यात आले. तर 2018 मध्ये बिझनेसवर्ल्ड वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तिने सेक्विया कॅपिटल, एलिवेशन कॅपिटल, बर्जर पेंट्स सारख्या शीर्ष गुंतवणूकदारांकडून `वेड मी गुड’साठी निधी उभारला आहे.
मेहक सागर महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणाऱ्या अनेक उपक्रमांमध्ये सहभागी आहे. महिला उद्योजकता आणि सक्षमीकरण (WEE) फाउंडेशनमध्ये ती एक मार्गदर्शक आहेत आणि तंत्रज्ञानात महिलांना प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांनाही तिने पाठिंबा दिला आहे.
ग्लॅक्सो स्मिथक्लाइन येथे मार्केटिंगसाठी समर इंटर्न म्हणून काम करत असताना मेहक आनंद शाहनी या तरुणास भेटली. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. पुढे 2012 साली त्यांचे लग्न झाले. `वेड मी गुड’ या कंपनी मध्ये आनंद मेहकचा व्यावसायिक भागीदार आहे.
लग्न करताना आलेल्या अडचणींना तिने संधीत रूपांतर केले आणि स्वतःचं उद्योग साम्राज्य उभं केलं. मेहक सागरचा हा प्रवास उद्योजक होऊ पाहणाऱ्या प्रत्येक तरुणीला मार्गदर्शक ठरेल.
प्रहार मंथन 21 एप्रिल २०२४
दी लेडी बॉस
अर्चना सोंडे
मुंबई, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
The Lady Boss : कुरळया केसाच्या मैत्रिणींचा मेनटेन ब्रॅण्ड : युबा रोमीन आगा आणि हिनशरा मानदथ हबीब
शारिरीक व्यंगावरुन एखाद्याला चिडवणं हे आपल्याकडे सहज घडणारी क्रिया म्हणून पाहिलं जातं. त्या दोघींना तर त्यांच्या कुरळ्या केसांवरुन चिडवलं जायचं. कुरळे केस म्हणजे नसती आफत त्यांना वाटली होती. मात्र त्यांना वाटणाऱ्या या ‘आफत’ने त्यांना कोटींची उलाढाल करणाऱ्या उद्योगाची उद्योजिका बनवले. ही गोष्ट आहे मेनटेन स्टोअर प्रा.लिच्या संचालिका युबा रोमीन आगा आणि हिनशरा मानदथ हबीब य़ांची.
कुरळे केस असलेल्या दोन महिला, युबा आणि हिनशरा या दोघी सुद्धा कुरळ्या केसांच्या. कुरळ्या केसांच्या व्यक्तींनी तयार केलेल्या व्हॉट्सऍप ग्रुपच्या माध्यमातून या दोघींची ओळख झाली.
युबा मुंबईमध्ये लहानाची मोठी झाली. तिने होली क्रॉस हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि नंतर तिने २००८ मध्ये नवी मुंबईच्या डॉ.डी.वाय. पाटील डेंटल स्कूल आणि हॉस्पिटल मधून दंत वैद्यकशास्त्राची पदवी संपादन केली.
हिनशरा ही कोची येथील एका व्यापारी कुटुंबातील आहे. तिने माध्यमिक शिक्षण कोचीच्या राजगिरी पब्लिक स्कूलमध्ये पूर्ण केले तर तामिळनाडूच्या निलगिरी येथील लॉरेन्स स्कूल, मधून 12 वी पूर्ण केली. त्यानंतर तिने क्राइस्ट युनिव्हर्सिटी, बेंगळुरू येथून वाणिज्य शाखेची पदवी प्राप्त केली. ती डेलॉइट या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये ऑडिट असिस्टंट म्हणून काम करत होती.
2018 मध्ये प्रत्येकी 30,000 रुपये गुंतवून केसांची निगा राखणारा ‘मेनटेन’ हा ब्रँड सुरू केला.
युबाचे शिक्षण विज्ञान शाखेतून झाल्यामुळे उत्पादनांबद्दलच्या सुरुवातीच्या संशोधनात तिला फ़ायदा झाला. 2016-17 मध्ये कुरळ्या केसांची निगा राखणारी उत्पादने युबाला सापडली जी भारतात उपलब्ध नव्हती. तिला ते अमेरिका किंवा इंग्लंड मधून मागवावे लागत, ज्यामध्ये बरेच शिपिंग शुल्क होते आणि ते खूप महाग देखील होते. जेव्हा युबाला भारतीय बाजारपेठेत कुरळे केसांच्या उत्पादनांची कमतरता जाणवली तेव्हाच तिने अशी उत्पादने भारतात निर्माण करण्य़ाचा निश्चय केला.
खरंतर युबाला तिच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये, केसांमुळे खूप छेडछाड आणि उपहासाचा सामना करावा लागला. ती जेव्हा कार्यक्रम किंवा महोत्सवामध्ये कुरळे केस दाखवण्याचा प्रयत्न करायची तेव्हा लोक खोडकर कमेंट्स करायचे. तिच्या हायस्कूलच्या दिवसातील एक प्रसंग आहे. एका लेक्चर मध्ये शिक्षकांनी त्यांचा लहान कंगवा गंमतीने युबाच्या डॊक्यावर ठेवला आणि म्हटले की 'मी हा कंगवा तुझ्या डोक्यात घालण्याचा प्रयत्न केला तर? मी तो पुन्हा शोधू शकणार नाही!’ सारा वर्ग हसायला लागला. मात्र याचा युबाला खूप राग आला होता. ती मनातून दुखावली सुद्धा होती.
जेव्हा युबा आणि हिनशरा यांनी कुरळे केसांची उत्पादने बनवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांनी ॲक्सेसरीजपासून सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या गरजा आणि वैयक्तिक अनुभवावर आधारित विविध उत्पादनांची श्रेणी तयार केली आहे. त्यांनी एका स्थानिक शिंपीला गाठला. रेशीम आणि सॅटीनपासून बनवलेल्या केसांच्या उपकरणांची रचना तयार केली. ऑक्टोबर 2018 मध्ये, त्यांनी इन्स्टाग्राम द्वारे मेनटेन लाँच केले. पुढे त्यांनी फ्लेक्ससीड्सपासून बनवलेली केसांची टोपी सादर केली, ज्याला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. मेनटेन हे केस आणि हीट कॅप्स, स्क्रंचीज आणि केसांची काळजी घेणारी उत्पादने बनवते, ज्यामध्ये मॉइश्चरायझिंग शैम्पू, कंडिशनर, क्लॅरिफायिंग शैम्पू आणि को-वॉश यांचा समावेश आहे.
या दोघी पहिल्यापासून कुरळे केस असलेल्या व्यक्तींच्या व्हॉट्सऍप समुदायाचा भाग असल्याने, त्यांना ग्राहक मिळवण्यासाठी जास्त दूर जावे लागले नाही. त्यांना सुरुवातीला मिळालेला प्रतिसाद जबरदस्त होता. मेनटेनचे उत्पादन 150 रुपयांपासून सुरू होते. सर्वांत महागडे उत्पादन हे 2,240 रुपयांपर्यंत जाते.
पहिल्याच आर्थिक वर्षात, सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीत त्यांनी 20 लाख रुपयांची उलाढाल केली होती. मेनटेनला वेबसाइटद्वारे विक्रीतील 60%, ऍमेझॉन, फ़्लिपकार्ट आणि इतर तत्सम प्लॅटफॉर्म सारख्या तृतीय-पक्षाच्या वेबसाइटद्वारे 30% आणि सॅलोनसोबत भागीदारीद्वारे 10% उत्पन्न मिळते.
व्यावसायिक मॉडेल्स वापरण्याऐवजी युबा आणि हिनशरा स्वतःची उत्पादने स्वत:च प्रदर्शित करतात. ते पाहून ग्राहक त्यांच्या प्रामाणिकपणाकडे आकर्षित होतात. ब्रँडबद्दलचा त्यांचा आत्मविश्वास आणि समर्पणाचा हा पुरावा आहे. हे केवळ विपणनासाठी नाही तर आपण जे ग्राहकांना जे देणार आहे त्यावर मनापासून विश्वास ठेवण्याबद्दल आणि त्याच्या पाठीमागे दृढ विश्वासाने उभे राहण्याबद्दल आहे.
युबाचे रोमीन आगा या व्यावसायिकाशी लग्न झाले असून रिदान हा 11 वर्षाचा मुलगा आणि आयशा व अमीर ही ६ वर्षांची जुळे मुले आहेत. हिनशराचा कोचीमध्ये पीव्हीसी पाईप्सचे उत्पादन करणारा कौटुंबिक व्यवसाय आहे. ती त्यात देखील सहभाग घेते. शार्क टँक इंडियाच्या अमन गुप्ता यांनी गेल्यावर्षी 75 लाख रुपयांची मेनटेन मध्ये गुंतवणूक केली होती. मेनटेनने 1.14 कोटी रुपयांची उलाढाल केली आहे.
कोचीची हिनशरा आणि मुंबईची युबा यांच्यामध्ये १२ वर्षाचे अंतर आहे. हिनशरा २५ वर्षांची आहे तर युबा ३७. मात्र वयाचा फरक असूनही त्यांच्यामध्ये एक उत्तम भावबंध निर्माण झालेला आहे. त्या एक कुटुंब म्हणून काम करतात. वेगवेगळ्या शहरांत राहूनसुद्धा परस्पर विश्वास आणि एकमेकांबद्दल असलेला आदर हा युबा आणि हिनशरा यांच्यामधील पाया आहे. या पायावरच मेनटेनचा डोलारा उभा आहे.
प्रहार मंथन
दी लेडी बॉस
अर्चना सोंडे
मुंबई, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
The Lady Boss : शिक्षित गृहिणींच्या नोकरीचा पर्याय ‘ओव्हरक्वालिफ़ाईड हाऊसवाईव्हज’ - संकरी सुधार
आई होणं एक सुखद भावना असते. ती एका गोंडस बाळाची आई झाली होती. बाळासाठी तिने नोकरी सोडली. बाळ काहीसं मोठं झाल्यानंतर तिला कामाची ओढ वाटू लागली. आपलं शिक्षण, कौशल्य वाया जाईल काय याची भिती वाटू लागली. तिने दुसरी नोकरी शोधण्यास सुरुवात केली. पण बाळाकडे आणि नोकरीकडे समान लक्ष देता येईल अशी तिला नोकरी मिळत नव्हती. आपल्या सारखीच कितीतरी उच्चशिक्षित महिलांची स्थिती आहे हे तिला जाणवलं आणि त्यातूनच निर्माण झाली ‘ओव्हरक्वालिफ़ाईड हाऊसवाईव्हज’ नावाची महिलांना रोजगार देणारी वेबसाईट.
एक गुणसंपन्न सॉफ्टवेअर इंजिनीयर असलेली संकरी सुधार एका आयटी मेजरमध्ये काम करत होती. कोरोनाच्या जागतिक महामारीच्या काळात तिला एक मूल झाले. तिच्या कंपनीने तिला पाठिंबा दिला असला तरी, काम आणि मातृत्व यामुळे सुधरला निराश, थकवा यांचा सामना करता आला नाही. सी-सेक्शन पद्धतीने तिची प्रसूती झाली होती. त्यानंतर तिला काहीसं डिप्रेशन आलं होतं.
आठ वर्षे तंत्रज्ञ म्हणून काम सोडल्यानंतर सुधारने घरच्या जबाबदारीवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. तथापि, काही गोष्टी बिघडल्या. जेव्हा तिने नोकरी सोडून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिला वाटले की सर्व काही ठीक होईल. पण काही न करता आपण आपली क्षमता वाया घालवतोय या भावनेने प्रत्येक दिवस जायचा. तिला एक विचित्र न्यूनतेची भावना जाणवायला लागली. मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून सुधारने पदवी घेतलेली आहे.
तिने मग स्वत:ला साजेशी अशी नोकरी शोधण्यास सुरुवात केली. नोकरी पण करता येईल आणि बाळाचं संगोपन करता येईल असा लवचिक पर्याय शोधण्यास तिने सुरुवात केली परंतु अनेक कंपन्या तिला कामावर घेण्यास नकार दिला. तिने फ्रीलान्सिंग वेबसाइट्सद्वारे देखील शोध घेतला परंतु तेथे प्रचंड स्पर्धा होती. तिची चिडचिड व्हायला लागली. दरम्यान एका वृत्तपत्रात एक लेख तिच्या वाचनात आला. ज्यात म्हटले होते की जगात जास्त शिकलेल्या गृहिणींची संख्या भारतात आहे. तिला जाणवले की बऱ्याच स्त्रिया अशाच परिस्थितीत आहेत. त्यांच्या पात्रतेचा काही उपयोग नाही का असा प्रश्न पडतो.
अनेकजण आपल्या देशातील नोकरीच्या उपलब्धतेविषयी बोलतात. नोकरीच्या संसाधनांविषयी बोलतात, कामचुकार लोकांविषयी आपले मत मांडतात. परंतु अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या नोकरीसाठी पात्र आहेत आणि कठोर परिश्रम करण्यास त्या इच्छुक आहेत; जर त्यांना कंपन्यांनी वेळ आणि ठिकाणाची लवचिकता दिली, तर त्यांना कार्य कुशल महिला मिळू शकतात. या विचारातूनच ‘ओव्हरक्वालिफ़ाईड हाऊसवाईव्हज’ची पार्श्वभूमी निर्माण झाली. ऑगस्ट 2022 मध्ये सुरू झालेल्या, ‘ओव्हरक्वालिफ़ाईड हाऊसवाईव्हज’ने आजपर्यंत 600 हून अधिक महिलांना संधी उपलब्ध करून दिली आहे आणि 2,500 महिलांना पुन्हा कामावर येण्यासाठी सक्षम केले आहे. या प्लॅटफॉर्मवर 26,000 हून अधिक महिलांनी नोंदणी केली आहे. तसेच सुधारने 600 कंपन्यांसोबत करार केले आहेत यामध्ये बहुतेक स्टार्टअप आणि लघू मध्यम उद्योग आहेत.
सुरुवातीला सुधारला लिंक्डइनचा वापर करून काही लीड्स मिळाल्या. तिथे तिने तिचा वैयक्तिक ब्रँड तयार केला होता. तथापि, कंपन्यांचा महिलांप्रती वेगवेगळा दृष्टीकोन तिला अनुभवयास मिळाला. काहींना असे वाटले की ते केवळ महिलांसाठीचे व्यासपीठ असल्याने आणि महिला नोकऱ्या शोधत असल्याने त्यांना खूप कमी पगार आपण देऊ शकतो. सुधारकडे आलेल्या एका व्यक्तीने सांगितले की तो कंटेंट रायटर शोधत आहे आणि महिन्याला ५,००० रुपये देईल. इतर काही कंपन्या सेल्स आणि विमा एजंटच्या शोधात होते. पण एक गोष्ट सुधारची सुरुवातीपासूनच स्पष्ट होती. तिच्या प्लॅटफॉर्मवर डेटा प्रोसेसिंग, रिसेलिंग किंवा इन्शुरन्स खरेदी यासारख्या नोकऱ्यांना ती स्थान देणार नव्हती. कंटेंट रायटिंग, ग्राफिक डिझायनिंग, सोशल मीडिया मॅनेजमेंट, डिजिटल मार्केटिंग, कस्टमर सर्व्हिस रोल्स आणि ॲडमिन ऑपरेशन्स यासारख्या क्षेत्रातील नोकऱ्यांना ती स्थान देणार होती. सुधारची वेबसाईट फ्रीलान्सिंग आणि पूर्णवेळ असे दोन्ही पर्याय ऑफर करते पण ते पुन्हा स्त्रीच्या आवडीवर अवलंबून असते. जर ती तिचा वेळ 8-9 तास देऊ शकत असेल तर तिच्या अर्जावर वेगळ्या पद्धतीने प्रक्रिया केली जाते. सुधारचं असं निरिक्षण आहे की बहुतेक कंपन्या अधिक महिलांची भरती करण्यासाठी परत येतात. लिंक्डइन व्यतिरिक्त, ‘ओव्हरक्वालिफ़ाईड हाऊसवाईव्हज’ फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडियाचा सुद्धा वापर करते. या माध्यमातून महिला नोकऱ्या शोधत असतात. ‘ओव्हरक्वालिफ़ाईड हाऊसवाईव्हज’ची प्रक्रिया सोपी आहे. स्वारस्य असलेल्या महिला त्यांच्या बायोडाटासह या वेबसाइटवर नोंदणी करू शकतात, त्यांचे अनुभव आणि इतर तपशील आणि करिअरमध्ये घेतलेल्या ब्रेकची कारणे लिहू शकतात. डेटावर अवलंबून आणि जशी गरज असेल व आवश्यक कौशल्य जुळेल तेव्हा कंपनी त्यांना संपर्क करते.
‘ओव्हरक्वालिफ़ाईड हाऊसवाईव्हज’सारखे प्लॅटफॉर्म महिलांना केवळ नोकऱ्या शोधण्यातच मदत करत नाहीत तर त्यांना त्यांचा आत्मविश्वास पुन्हा प्राप्त करण्यास सक्षम बनवतात. अशीच एक गृहिणी भाग्यश्री, तिने अभियांत्रिकीची पदवी घेतलेली. कॉलेजनंतर लग्नाच्या कौटुंबिक दबावामुळे तिला शिक्षण सोडावे लागले. सात वर्षांनंतर, तिला स्वत:चं काहीतरी करायचं होतं. तिने शिकवणीसाठी प्रयत्न केले पण वेळेवर पैसे न मिळाल्याने तिचा उत्साह कमी झाला. “मला ‘ओव्हरक्वालिफ़ाईड हाऊसवाईव्हज’बद्दल माहिती मिळाली आणि प्लॅटफॉर्मवर नोंदणी केली. मी काय शोधत आहे याची मला खात्री नव्हती, परंतु माझ्या पात्रता आणि अपेक्षांशी जुळणारी नोकरी शोधण्यात मला मदत करण्यासाठी टीमने प्रत्येक टप्प्यावर मला मदत केली. त्यांनी एका क्लायंटसोबत मुलाखतीची व्यवस्था केली आणि मला माझ्या करिअरला सुरवातीपासून सुरुवात करण्याची संधी मिळाली,” असं भाग्यश्री म्हणते. चेन्नईस्थित एका आयटी कंपनीने या प्लॅटफॉर्मवरून तीन महिलांना इंटर्न म्हणून ठेवले आहे. काही कालावधीनंतर या महिलांना, ते पूर्णवेळ कर्मचारी म्हणून सामावून घेणार आहेत.
सुधारला अधिकाधिक महिला आणि कंपन्यांना ‘ओव्हरक्वालिफ़ाईड हाऊसवाईव्हज’च्या व्यासपीठावर आणायचे आहे. महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करायचे आहे. यामुळे अधिक महिलांची नियुक्ती करता येईल आणि एक स्वयंपूर्ण परिसंस्था तयार करायची आहे. सुधारसारख्या लेडी बॉस अशा प्रकारे गरज ही शोधाची जननी असते हे वाक्य खरं करुन दाखवतात. आज हजारो कार्यकुशल महिलांना घरबसल्या आर्थिकदृष्ट्य़ा सक्षम बनवत आहे.
प्रहार मंथन
दी लेडी बॉस
अर्चना सोंडे
मुंबई, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
The Lady Boss : शकिला शेख
फूटपाथवरील भाजीविक्रेती ते आंतरराष्ट्रीय कोलाज कलाकार
भारत देश हा अदभूत लोकांचा देश आहे. साधू-संतांचा, विद्वानांचा, कलाकारांचा हा देश आहे. लाथ मारू तिथे पाणी काढू अशी मानसिकता असलेल्या व्यक्तींचा देखील हा देश आहे. मेहनत-कष्ट करणाऱ्यांची कदर आपल्या देशात होते. कलाकारांना जाती धर्माच्या पलीकडे पाहिले जाते. प्रतिभा असणाऱ्या कलाकारास प्रोत्साहन दिले जाते. अशाच कलाकारांपैकी ती एक. भाजी विक्रेती ते आंतरराष्ट्रीय दर्जाची कोलाज कलाकार हा तिचा प्रवास थक्क करणारा आहे. ती कलाकार म्हणजे शकिला शेख.
1973 मध्ये जन्मलेल्या शकिला सहा भावंडांमध्ये सर्वात लहान होती. तिचे वडील कुटुंबाला सोडून बांगलादेशात निघून गेले तेव्हा शकिला फक्त एक वर्षाची होती. तिने आपल्या पित्याला पुन्हा कधीच पाहिले नाही. तिची आई झहेरान बीबी मात्र कणखर स्वभावाची बाई होती. तिने बाप बनून आपल्या मुलांना वाढवलं. उदरनिर्वाहासाठी कोलकात्यात भाजीपाला विकला. अत्यंत पराकोटीची गरीबी शकिलाच्या कुटुंबाने अनुभवली. अनेकदा ते उपाशी पोटी झोपले. उत्पन्न फारच तुटपुंजे आणि खाणारी तोंडे जास्त अशी परिस्थिती होती.
शकिलाची आई मोग्राहाट येथील घरापासून कोलकातामध्ये भाजी विकण्यासाठी जात असे. हे अंतर जवळपास 40 किमी आहे. पोट भरण्याशिवाय बाकी कशाचाही विचार करायला तिला वेळ नव्हता. आर्थिक अडचणींमुळे शकिला आणि तिची भावंडे अभ्यास करू शकले नाही. शकिला सात वर्षांची असताना ती तिच्या आईसोबत भाजी मंडईत जाऊ लागली. शाकिलाची आई तिला काम करू देत नव्हती पण तिला शहरात फिरायला घेऊन जायची. शकिलाला रस्त्यांवरून धावणाऱ्या ट्राम आणि बसेस बघायला खूप आवडायचं. आई काम करत असताना चिमुरडी शकिला फुटपाथवरच झोपून जायची. अशाच एका प्रवासादरम्यान तिची एका माणसाशी भेट झाली ज्याने तिच्या आयुष्याचा मार्गच बदलून टाकला.
बलदेव राज पानेसर, निवृत्त सरकारी कर्मचारी आणि एक चित्रकार, ज्यांना ती प्रेमाने बाबा म्हणून हाक मारायची. पानेसर दररोज भाजी खरेदीसाठी बाजारात येत असत. ते लहान मुलांना चॉकलेट, अंडी, पेन्सिल आणि मासिके वाटायचे. लहान मुलं त्यांना प्रेमाने “डिमबाबू” (बंगालीमध्ये डिम म्हणजे अंडा) म्हणत आणि त्याच्या मागे फिरायचे. पानेसर यांची स्वतःची शैली होती. ते कुर्ता पायजामा घालत असत. खांद्याला शबनम कापडी पिशवी आणि दुखत असलेल्या गुडघ्यांना आधार देण्यासाठी छत्री बाळगत असे. शकिला त्यांना 80 च्या दशकाच्या सुरुवातीला बाजारात भेटली होती. पानेसर मुलांना चॉकलेट आणि अंडी वाटत होते. त्यांनी शकिलाला देखील अंडे आणि चॉकलेट दिले. पण शकिलाने ते घेण्यास नकार दिला. चिमुरड्या शकिलाचा तो बाणेदारपणा पाहून पानेसर प्रभावित झाले. त्यांनी तिचे नाव शाळेत दाखल करून घेतले. तिला अभ्यासाचे साहित्य पुरवले आणि तिच्या कुटुंबाची काळजी देखील घेऊ लागले.
“त्यांच्याशी झालेल्या भेटीने आमचे आयुष्य बदलून टाकले. त्यांनी मला केवळ शाळेतच प्रवेश दिला नाही तर कुटुंबाला आर्थिक मदतही केली. सुरुवातीला, माझ्या आईला भीती वाटली आणि तिला वाटले की बाबा कदाचित तिच्या मुलीशी गैरव्यवहार करतील. पण नंतर त्यांच्या सचोटीबद्दल आईला खात्री पटली.” शकिला सांगते.
शकिलाचं इयत्ता तिसरीपर्यंत कोलकात्यात शिक्षण झालं होतं. पानेसरांना वाटले की मुलीसाठी दररोज शहरात जाणे सुरक्षित नाही. त्यांनी शकिलाचं मोग्राहाट गावात शिक्षण करायचं ठरवले. त्यांनी शकिलाच्या भावाला गावातील एका स्थानिक शाळेत प्रवेश घेण्यासाठी 300 रुपये दिले. पण तिच्या भावाने तिचं नाव शाळेत दाखल केलेच नाही. मात्र, तिने हे पानेसरांना सांगितले नाही. 1987 मध्ये तिने अकबर शेख यांच्याशी लग्न केले, अकबर तिच्यापेक्षा 15 वर्षांनी मोठा होता आणि आधीच विवाहित होता.
अकबरने तिला सुरजापूर येथे आणले जेथे हे जोडपे स्थायिक झाले. तो कोलकात्याला भाजी विकायला जायचा. पण त्याचे उत्पन्न त्याच्या दोन बायकांची काळजी घेण्यासाठी पुरेसे नव्हते. कौटुंबिक उत्पन्नाला हातभार म्हणून शकिला कागदी पिशव्या बनवण्याचे काम करायची. ती रोज 20-30 रुपये कमवत होती. 1989 मध्ये, शकिला आणि अकबरला पानेसर यांनी कोलकाता येथील अकादमी ऑफ फाइन आर्ट्स येथे चित्रकला प्रदर्शनासाठी आमंत्रित केले होते.
ते दोघेही जाण्यास उत्साही नव्हतो कारण त्यांना कलेबद्दल काहीच माहिती नव्हती पण पानेसरांमुळे जावे लागले. शकिलाने नुकतीच पेंटिंग्सकडे एक नजर टाकली. तिने बाबांना(पानेसरांना) सर्वात जास्त आवडलेली चार चित्रे सांगितली. असे दिसून आले की ती समान चित्रे सर्वात लोकप्रिय आहेत. पानेसर खूप उत्साही आणि आनंदी होते की त्यांच्या मानसकन्येचा कल कलेकडे आहे. त्या प्रदर्शनाने शकिलाच्या कलाकार बनण्याच्या स्वप्नांना जन्म दिला. घरी तिने वेगवेगळ्या आकाराचे कागद जोडण्यास सुरुवात केली आणि तिने देव, देवी आणि समकालीन कलेचे कोलाज बनवले.
अकबरने कोलाजांना कोलकात्याला नेले आणि पानेसरांना दाखवले. ते या कामाने इतके प्रभावित झाले की त्यांनी कोलाज बनवण्यासाठी फक्त आणखी वर्तमानपत्रे आणि मासिके दिली नाहीत तर शकिलाचे काम प्रदर्शित करण्यासाठी एक प्रदर्शन आयोजित करण्याचा निर्णयही घेतला. 1990 मध्ये, शकिलाने कोलकाता येथे तिचे पहिले एकल प्रदर्शन भरवले. त्यातून तिने 70,000 रुपये कमावले, ही त्या काळात मोठी रक्कम आणि निश्चितच तिच्या कुटुंबासाठी फार मोठा आधार होता.
तेव्हापासून तिने मागे वळून पाहिलेच नाही. ती आता तिच्या गावात साधारण पण आरामदायी घरात राहते आणि तिला तीन मुले आहेत. तिचा मुलगा बाप्पा शेख (22) अधूनमधून कोलाजही करतो याचा तिला अभिमान आहे.
पानेसरने शकिलाची कोलकाता येथील CIMA (सेंटर ऑफ इंटरनॅशनल मॉडर्न आर्ट) आर्ट गॅलरीशी ओळख करून दिली जी आता तिचे काम सांभाळतात. तिचे कोलाज भारतात आणि परदेशात विकत आहे. आज तिचे कोलाज आर्ट फ्रान्स, जर्मनी, नॉर्वे आणि अमेरिका यांसारख्या देशांमध्ये गेले आहेत. कलेसाठी प्रोत्साहन दिल्याबद्दल शकिला पानेसरांप्रति नेहमी कृतज्ञता व्यक्त करते. ती म्हणते, “मी खूप मेहनत आणि उत्कटतेने काम केले आहे पण आज मी जे काही आहे त्यासाठी मी बाबांचे आभार मानते. माझ्या पतीने देखील मला आयुष्यभर साथ दिली आहे."
शकीलाला पश्चिम बंगालमधील नृत्य, संगीत आणि व्हिज्युअल आर्ट अकादमीचा चारुकला पुरस्कार आणि ललित कला अकादमीचा सत्कार यासह विविध सन्मान मिळाले आहेत.
आयुष्यात काहीही अशक्य नाही याचा पुरावा म्हणजे शकिलाची जीवनगाथा आहे. आत्यंतिक गरीबी ते आज नावाजलेली कलाकार असा तिचा प्रवास म्हणजे एकप्रकारे कोलाजच आहे. कोलाज आर्ट या कलेतील शकिला शेख खऱ्या अर्थाने लेडी बॉस आहे.
प्रहार मंथन 25 Feb 2024
दी लेडी बॉस
अर्चना सोंडे
मुंबई, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
The Lady Boss : पाक कलेची नाज अंजुम
आज 31 डिसेंबर. वर्षाचा अखेरचा दिवस. सरत्या वर्षाला खाऊन- पिऊन, हसत-गात निरोप देण्याची पाश्चात्यांची पद्धत. आता जगभरच्या संस्कृतीने ही पद्धत अंगिकारली आहे. या दिवशी मांसाहाराला भरपूर मागणी असते. त्यात चिकन बिर्याणी वा मटन बिर्याणी म्हणजे सोन्याहून पिवळंच जणू. हैदराबाद मध्ये अंजुमच्या बिर्याणीला तोड नाही. अवघ्या 80 रुपयापासून सुरू झालेला बिर्याणीचा व्यवसाय आता दरमहा लाख रुपयांची उलाढाल करत आहे. यामागची प्रणेता आहे नाज अंजुम.
२०१० मध्ये लग्नानंतर नाज अंजुम हैदराबादला आली. व्यवसायाने ती टेक्सटाइल इंजिनियर पण काही वैयक्तिक कारणांमुळे तिला त्यामध्ये करिअर करता आले नाही. मात्र पाककला हे तिचं नेहमीच पहिलं प्रेम होतं. त्यामुळे हैदराबादला आल्यावर ती आपल्या पहिल्या प्रेमाकडे अर्थात पाककलेकडे वळली. प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ संजीव कपूर यांच्या क्लासेसमध्ये तिने स्वयंपाकाचे धडे गिरवले. तिच्या हाताला मुळात चव होतीच पण पाक कलेच्या वर्गाने तिच्या स्वयंपाकाला एक अनोखी चव लाभली.
तिचे शेजारी तिच्या पाककलेवर मोहित झाले. स्वत:च्या घरापासून दूर नोकरीनिमित्ताने आलेले अनेक नोकरदार तरुण अंजुमच्या इमारतीत राहायचे. अंजुम पाक कलेसाठी प्रसिद्ध होती. त्यातील काही तरुणांनी अंजुम दिदीला टिफिन सेवा सुरू करण्याची विनंती केली. त्यांच्या आग्रहामुळे अंजुमने टिफिन सेवा सुरू केली आणि ‘अंजुम्स किचन’चा जन्म झाला. एखाद्या महिलेच्या मालकीचा असणारा हैदराबाद मधील हा बहुधा पहिलाच क्लाउड किचन होता.
2016 ची रमजान ईद होती. या ईदला अंजुमने ‘डबल का मीठा’,नावाची एक चवदार हैदराबादी मिठाई बनवली सोबत ‘लौकी हलवा’ देखील बनवला. ही मिठाई तिने आपल्या दिराच्या रेस्टॉरंटमध्ये मध्ये विकण्यास ठेवली. या दोन्ही मिठाई लगोलग विकल्या देखील गेल्या. मिठाईच्या विक्रीमुळे अंजुमला हुरूप आला.
त्यानंतर काही दिवसांतच अंजुमला एका घरगुती समारंभासाठी `मटन दम बिर्याणीची’ ऑर्डर मिळाली. या बिर्याणीची चव चाखलेल्या पाहुण्यांनी देखील स्वत:च्या घरासाठी बिर्याणीच्या ऑर्डर्स दिल्या. आपल्या पहिल्या बिर्याणीच्या ऑर्डरला अंजुमला 80 रुपये खर्च आला तो देखील भाज्या आणण्यासाठी तिने वापरले होते. अशाप्रकारे ती हैदराबाद मधील पहिली होम शेफ ठरली. हळूहळू अंजुमचा व्यवसाय मौखिक प्रसिद्धीमुळे बहरू लागला. सोबतच फेसबुकचा पण तिने व्यवसाय प्रसिद्धीसाठी वापर केला.
तिच्याकडे दररोज सुमारे 25-50 ऑर्डर असतात, ज्यात दररोज टिफिन आणि बिर्याणीचा समावेश असतो. तिला पार्टी ऑर्डर्स आणि मिठाईच्या ऑर्डर्स देखील मिळतात.
अंजुम कोणतीही मार्केटिंग करत नाही. सुरुवातीला स्वयंपाक करण्यापासून ते जेवण पोहोचविण्यापर्यंत सर्व कामे ती स्वतःच करायची. मात्र ऑर्डर्सचा पसारा वाढला म्हणून तिने दोन डिलिव्हरी बॉईज आणि जेवण तयार करण्यासाठी मदतीला एका बाईस नोकरीवर ठेवले.
तिचा दिवस पहाटे 4:30 वाजता सकाळच्या नमाजने सुरू होतो. त्यानंतर ती सकाळी 6 वाजता तिच्या तीन मुलांसाठी नाश्ता बनवते. मुले शाळेत गेल्यानंतर, ती तिच्या रोजच्या ऑर्डरसाठी सकाळी 9 वाजता स्वयंपाकघरात प्रवेश करते. अंजुमचे पती रोज सकाळी मांस आणि भाज्या घेऊन येतात. तिची मदतनीस सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत भाज्या चिरणे, मांस कापणे, मसाले वाटणे आदी कामे करते. ते पूर्ण झाल्यावर, अंजुम स्वतः आमटी, भात आणि चपात्या बनवण्यावर लक्ष केंद्रित करते.
दुपारी २ वाजेपर्यंत तिचे दोन डिलिव्हरी बॉईज संपूर्ण शहरात सर्व ऑर्डर्स पोहोचवतात. दुपारच्या जेवणानंतर, ती तिच्या संध्याकाळच्या ऑर्डरवर काम करू लागते. या ऑर्डर्स मुख्यतः पार्ट्यांसाठी असतात. त्यात स्टार्टर्स, बिर्याणी, चिकन करी आणि मिठाई यांचा समावेश असतो. अंजुम आठवड्यातून सुमारे 4 वेळा पार्टी ऑर्डर स्वीकारते. या ऑर्डर्स संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत ती पुन्हा डिलिव्हरी बॉईज द्वारे पाठवते.
आज अत्यंत स्पर्धात्मक असलेल्या क्लाउड किचन व्यवसायात अंजुमला टिकून राहण्यास कारणीभूत ठरले ते तिचे सततचे नवनवीन प्रयोग. जेव्हा तिला समजले की लोकांना बिर्याणीच्या पलीकडे काहीतरी हवे आहे, तेव्हा तिने ‘इफ्तार थाळी फॉर वन’ सादर केली, ज्यामध्ये दही वडा, हलीम, स्टार्टर्स, फळे आणि खजूर यांचा समावेश आहे.
लोकांची अपेक्षा लक्षात घेऊन दर काही महिन्यांनी ती काहीतरी नवीन सादर करते. तिने इफ्तार थाळीपासून सुरुवात केली, जी लोकांना खूप आवडली. कोविड-19च्या लाटे दरम्यान, लोक लग्नाला उपस्थित राहू शकत नव्हते आणि ते जेवण चुकवायचे हे ध्यानात घेऊन तिने ‘जश्न-ए-दावत’ सुरू केले. जे लग्नाचे जेवण होते. यात एका ट्रेमध्ये एका व्यक्तीसाठी जेवण दिले जायचे. तिने हिवाळ्यात पंजिरी के लड्डू, गोंड के लड्डू सारखे मिष्टान्न देखील सादर केले. तिला कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान जेवण देण्यासाठी सरकारकडून परवानगी मिळाली आणि तिने 500 हून अधिक लोकांना जेवण दिले.
तिच्या रोजच्या टिफिनमध्ये एक सेट मेनू असतो, ज्यामध्ये ती काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करते, जसे की मिर्ची (मिरची) भजी, पकोडे, कस्टर्ड आणि बरेच काही. दररोज दुपारचे आणि रात्रीच्या जेवणासाठी ती 400 रुपये आकारते.
अंजुम तिच्या ग्राहकांचा, विशेषत: ऑर्डर देणार्या वृद्ध पुरुष आणि स्त्रियांबद्दल विचार करते. त्यांना काहीतरी वेगळे देण्याचा प्रयत्न करते. या ज्येष्ठ नागरिकांपैकी अनेक मधुमेही आहेत पण त्यांना मिठाई आवडते म्हणून अंजुम त्यांना कस्टर्ड सारखी कमी साखर घालून बनवलेली मिठाई देते.
अंजुमची बेस्ट सेलर मटण बिर्याणी आहे, जी 1800 प्रती किलो दराने विकली जाते. ही बिर्याणी 6-8 लोकांना सहज पुरते. कारण तिच्या बिर्याणीमध्ये मटण आणि तांदूळ समान प्रमाणात वापरले जातात. अंजुमने बनवलेले `डबल का मीठा’ आणि `चिकन टिक्का’ हे पक्वान्न सुद्धा लोकप्रिय आहेत. अंजुम परदेशात राहणाऱ्या लोकांसाठी ऑनलाईन कुकिंग क्लासेस सुद्धा घेते.
आपल्या यशाचे श्रेय कठोर परिश्रमाला देत अंजुम म्हणते,“जर आपल्याला स्वतःसाठी नाव कमवायचे असेल तर आपल्याला त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. मी सुरुवात केल्यापासून मला चांगल्या ऑर्डर्स मिळत गेल्या. माझ्या कुटुंबाच्या मदतीशिवाय हा सगळा व्याप सांभाळणे निव्वळ अशक्य होते. धडपडत राहा आणि तुमचे 100 टक्के द्या. सराव माणसाला परिपूर्ण बनवतो. जोपर्यंत तुम्ही सर्वोत्कृष्ट होत नाही तोपर्यंत ते चालू ठेवा. पैशासाठी काम करू नका. मी माझ्या टिफिन्सवर प्रयोग केला आणि आज मी कुठे आहे ते पहा. जर तुम्ही तुमचे लक्ष ध्येयावर ठेवले आणि तुम्ही जे करता त्याचा आनंद घेतला तर तुम्ही देखील ते करू शकता,”
80 रुपयांपासून सुरूवात केलेली अंजुम आज महिन्याला 1 लाख रुपयांहून अधिक कमावते. हैदराबादला गेल्यास या लेडी बॉसच्या हाताची चव चाखलीच पाहिजे.
प्रहार मंथन
दी लेडी बॉस
अर्चना सोंडे
मुंबई, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Thane
400059