Patwardhan Neha

Patwardhan Neha

Hi, I'm a blogger. Just putting my experiences and knowledge in words. My passion for education and

28/06/2024

अ. वि. उ. वि

कितीही सरळ जायचं ठरवलं तरी "विचार" ही अशी गोष्ट आहे जी समोरच्याला द्विधा मनस्थितीत टाकते. सरळ जाणाऱ्याला वाकडी तिकडी वाट घ्यायला भाग पाडते.

"विचार" येताना एकटेच येतात. आपण त्याला विशेषण देतो, "अति विचार आणि"उगाच" विचार आणि सगळं बदलून जातं. प्रत्येकाच्या आयुष्यात असे प्रसंग येत असतात की एक छोटीशी गोष्ट असते पण आपण त्याला खूप मोठ् रूप देतो.
सगळेच विचार हे शुल्लक नसतात. काही विचार इतिहास घडवून गेले आहेत.

विचारांवर विजय मिळवणे हे प्रत्येकाला शक्य असते पण तो विजय मिळवताना वेळ किती लागेल हे स्वतः ला निश्चित करावे लागतो. लहान मुलं असुदे किंवा मोठी व्यक्ती असुदे, नेहमीच आपण ऐकत आलोय की उगाच विचार करत बसू नकोस. अति विचार करत बसू नकोस. बऱ्याच वेळेला आपली तंद्री लागलेली असते आणि तेवढ्यात कोणी तरी आपल्याला विचलित करते.

असं म्हणतात की माणसाचा मेंदू एका मिनिटात ३८-४५ विचार निर्माण करते म्हणजे दिवसभरात सुमारे ५००००-७०००० विचार. ( Google वर मिळालेला नंबर ) एवढं नक्की की आकडा खूप मोठा आहे. पण सगळ्याच विचारांकडे आपण लक्ष देत नाही. कधीकधी विचारांमध्ये आपल्या प्रश्नाची उत्तरे आपल्याला मिळतात तर कधी सुटलेली कोडी परत नवीन प्रश्न निर्माण करतात.

आपण विचार करताना दुसरे काय म्हणाले, नातेवाईक काय विचार करत असतील, माझ्या बद्दल विचार असतील का? इथंपासून ते अगदी डोक्याला आणि मेंदूला झिणझिण्या येईपर्यंत विचार करत असतो. जर कधी ठरवलं की सगळे विचार लिहून काढायचे तर आपल्याला जाणवेल की सुरवात आणि शेवट ह्या विचारांमध्ये काही साम्य नाही.

मुलं आईच्या गर्भात असताना, डॉक्टर चांगले विचार करा असं का म्हणतात त्याच महत्व मोठं झाल्यावर कळते. आजूबाजूची लोकं, वातावरण चांगल्या विचारांचे असणे खूप गरजेचे आहे. कारण तिथेच संस्कारांना सुरवात होते. एकदा मुलं जन्माला आले की घरातल्यांचे विचार तमुलांच्या विचारांना जोडले जातात. आणि त्यातून समाज घडत जातो.

सध्याच्या काळात तिशी नंतरच्या आणि पन्नाशी पर्यंतच्या पिढीतल्या विचारांचा जर अभ्यास केला तर खूप गोष्टी उलगडतील. कारण त्यांना जास्त अस्वस्थ करणारा विचार म्हणजे की ह्या विचारांमधून शांतता कशी मिळेल. काहींना थोडं थांबायचाय, काहींना भविष्यात जायचंय तर काहींना भूतकाळात जायचंय कारण प्रत्येकाला विचार आणि त्यामधून घेतलेले निर्णय पुन्हा बदलायचे आहेत, नव्याने अनुभवायचे आहेत.

मनुष्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मोक्ष त्याच्या कर्मांनुसार मिळतो असं म्हणतात. चांगले कर्म आपल्या विचारांवर अवलंबून आहेत. विचारांचं आचरण आपण कसं करतोय ते पण तेवढंच महत्त्वाचं आहे.

अति आणि उगाच विचार तर येतच राहणार, त्यांना योग्य दिशा देणं आणि त्या विचारांवरून योग्य कर्म करणे आवश्यक आहे. आपल्या आजूबाजूला सल्ले देणारे, उपदेश देणारे भरपूर आहेत. पण आपल्याला ऐकून घेणारे फार कमी आहेत आणि त्यामुळे विचार हे फक्त मनातच राहतात. आताच्या पिढीतल्या मुलांना जर त्यांच्या विचारांना योग्य दिशा आणि वळण देता आले तर नक्कीच सकारात्मक वातावरण निर्माण होईल.

शिक्षकांकडून मिळालेले हे ज्ञान आज अनुभवायला मिळत आहे.

15/06/2024

अशी आई नको ग बाई !!

"आई" हा एक शब्द खूप काही सांगून जातो. बाळाला जन्म देण्यासाठी सोसलेल्या कळांपासून ते मुलाला / मुलीला स्वतःच्या पायावर उभे करे पर्यंत घेतलेले कष्ट, आनंद,त्याग सगळंच....

लहानपणी आईशिवाय पान हलत नाही.. मुलांसाठी चांगलं जेवण बनवणं, खेळवण, चांगले संस्कार करणे, वाईट गोष्टींपासून दूर ठेवणे.. जसं जसं मुलं मोठी होतं जातात तसं तसं शाळेचा अभ्यास, पालकसभेला हाजिर राहणं.. आणि एवढं सगळं करून सुध्दा शाळेतून येणाऱ्या सूचना की मुलांकडे लक्ष द्या आणि बरच काही... अश्या अनेक गोष्टी आई सांभाळत असते.

एकीकडे मुलांना शिस्त लावताना स्वतः वाईटपणा घेणं आणि दुसरीकडे घरातल्यांचे विचार मुलांना पटवून द्यायची तडजोड करणं.. घरात कोणाचीही भांडण झाली , अबोला धरला तर "आई" त्यांच्यातल्या संभाषणाचा दुवा असते.

मुलं मोठी होत असताना ती तीच जगणं विसरून जाते... सगळं असून सुध्दा काहीच नसल्याच्या भावना तिला येतात.. पिढ्यांमधलं अंतर आणि विचार खूप जवळून अनुभवणारी, पण काही ठिकाणी हतबल असणारी व्यक्ती म्हणजे "आई".

एक दिवस असा येतो, की जेव्हा आजूबाजूची लोकं म्हणायला लागतात," सोळावं वर्ष धोक्याच" , "नीट लक्ष ठेव", संगत बरोबर आहे ना? अश्या अनेक प्रश्नांना ती सामोरी जात असते पण त्या लोकांना काय माहित की दुसऱ्याबाजुला आई आणि वयात आलेल्या मुलाचं वेगळाच संघर्ष चालू असतो...

आणि तो म्हणजे "अशी आई नको ग बाई" ह्या विचारांचा....

आई ने अनेक पावसाळे बघितलेले असतात म्हणून ती मुलांना सतत सूचना करत असते... आणि मुलं जगाच्या स्पर्धेत स्वतःला सिद्ध करण्यात धडपड करत असते. ह्या स्पर्धेत टिकण्यासाठी आई चे जूने सल्ले, तिच्या काळातले विचार काही उपयोगाचे नाही असा समज झालेला असतो. त्यामुळे आतापर्यंत सगळं समजणाऱ्या माझ्या आईला हे कळतच नाही अशी खात्री मुलांची होते आणि बाहेरच्या जगात आपल्याला समजून घेणाऱ्या मित्रमैत्रिणींना शोधायला सुरवात होते...

मुलं मोठी झाली आता मी मोकळी हे म्हणणाऱ्या आई ला परत एक संघर्ष करावा लागतो.. "आई तुला नाही कळणार", "तू खूप जुन्या विचारांची आहेस", असे अनेक संवाद होतात..

ना आई चुकीची असते आणि नाही मुलं... कारण दोघेही आपापल्या परीने प्रयत्न करत असतात स्वतःचा मुद्दा मांडण्याचा... दोघांच्याही मनात आणि डोळ्यात तेच भाव असतात..

वेळ हेच औषधं आहे, ह्याचा प्रत्यय काही वर्ष उलटल्यावर येतो... "अशी आई नको ग बाई" वरून कधी मन "मला जन्मोजन्मी आई म्हणून तूच हवी " . ह्या विचारावर येतं तेच कळतं नाही.... अचानक आपली आई परत आपल्यासाठी परफेक्ट "आई" होते.

10/06/2024

टाईम प्लीज...

खेळ असुदे किंवा भांडण, वाद विवाद आपला मुद्दा मांडण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे "टाईम प्लीज" म्हणायचं.. नुसतं म्हणायचं नाही तर हाताची मूठ करून ती आपल्या ओठांना लावायची आणि मगच म्हणायचं. इतका दृढ विश्वास होता त्या एका शब्दावर की जणू खरंच वाटायचं साक्षात परमेश्वर सुद्धा आपल्यासाठी तो क्षण धरून ठेवतोय...

लहानपणीचं "टाईम प्लीज" आपल्या आयुष्यात इतक्या आठवणी देऊन जातात, की कधीकधी वाटतं मोठं झाल्यावर हा उपाय रोजच्या आयुष्यात इतक्या सहज वापरायला मिळाला तर जगणं किती सोप्पं होईल.
खरंच असा संवाद साधता आला तर.....

भक्त - आहे का वेळ? जरा बोलायचं..
देव - वेळच वेळ आहे ..ये भेटायला....

भक्त - ( मित्र मैत्रिणींनबरोबर गप्पा चालू होत्या.) तेवढ्यात देवाचं बोलावणं आलं आणि पटकन मुखातून आलं, ए " टाईम प्लीज" हा,.आलोच जरा....
असं म्हणून देवासमोर चर्चा सुरू होणार तेवढ्यात,
देवं म्हणाले कि तू जर सगळ्यांच्या तक्रार करणार असशील तर मी त्या रोज ऐकतो... परत तेच नको..
भक्त - अरे यार, ह्याला काय अर्थ आहे..म्हणजे खाली कोणाशी बोलू शकत नाही... आणि एवढं " टाईम प्लीज" घेतलं तुझ्याशी बोलायचं म्हणून तर आता तू नाही म्हणतोस....

देवं - (मनातल्या मनात हसले). आणि म्हणाले, मी पण आता तुमच्या सारखे " Crash Course" सुरू करणार आहे. आणि लिहिणार तिथे की "write this sentence 10 times". कारण तुम्हाला तीच पद्धत कळते.
भक्त - तुझं सगळं बरोबर आहे...पण तुला काय माहित माणूस म्हणून जगणं किती कठीण आहे ते. .. तुझ्या जवळ जे शिकलं ते सगळं विसरायला होतं.

देवं - तुम्ही विसरता, कारण जसं अभ्यास करत बसलेल्या विद्यार्थाला, टीव्ही चा आवाज विचलित करतो. तसेच माझ्या नामा पासून आजूबाजूच्या गोष्टी तुमचं मन विचलित करतात.. त्याला मी काय करू? तुम्ही का हे विसरता की मोक्ष प्राप्ती साठी तुम्हाला सारखा मनुष्याचा जन्म दिला जातो, जो पर्यंत तुमच्या सगळ्या चुका सुधारत नाही तो पर्यंत.
अरे साधं उदाहरण घेऊ तुम्ही लोकांनी मुलांना दहावी पर्यंत पास करायचा निर्णय घेतला, मुलं पुढच्या वर्गात तर गेली पण चुका सुधारल्या का वाढतच गेल्या?
त्यामुळे मला तू काही सांगू नकोस....

भक्त - तूच जर असे हात वर केलेस तर मी कुठे बघू?

देव - हा नेहमीचा Dialogue नको आता please.
भक्त - तुला बरे पाठ आहेत....

देव - तुम्ही मूर्ती समोर उभे राहून म्हणा, कुठल्याही उर्जेसमोर म्हणा किंवा कुठल्याही मंदिरात उभे राहून म्हणा, शेवटी आवाज माझ्या जवळच येतो.
सेकंदाला १०० पेक्षा जास्त लोकं हीच प्रार्थना करतात.

भक्त - संत लोकं म्हणतात की, तुम्ही कुणाच्याही सुखाची आणि दुःखाची जबाबदारी घेऊ शकतं नाही. काही संत म्हणतात, दुसऱ्याच्या मुखातून आलेल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्ही कसा काढताय आणि त्याला किती महत्व देताय, हे तुमच्या हातात आहे. कळतच नाही नक्की ऐकावं कोणाचं?
लहानपणापासूनच आम्हाला एक म्हण शिकवली आहे, ऐकावं जनाचे करावं मनाचे...
आता तूच सांग, सामान्य माणूस गोंधळात पडणारच ना...
तुझ्याशी बोलायचं ह्या आशेने देवळात(प्रार्थना स्थळी) प्रत्येकजण जातो/ जाते पण नेहमीच कुठला न कुठला उपाय सांगितला जातो...
अरे तुला काय सांगू , प्रारब्ध ह्या जन्माच आहे की मागच्या जन्माच हेच कळत नाही... म्हणजे हसण्यात बोलायचं ठरवलं तर अशी किती माती खाल्ली आहे हेच कळत नाही...

देव - (हसून) तुम्ही सगळे प्रयत्न करता, वेगवेगळे उपाय करता पण असा एक दिवस सांगा तुमच्या आयुष्यातला की निस्वार्थीपणे तुम्ही माझ्या समोर उभे राहिला आहात... देवळात सुद्धा जास्त वेळ उभे राहायला नको म्हणून काही लोक पैसे भरून VIP दर्शन घेतात. पण हे विसरून जातात की खाली कितीही पैसे भरले, ओळख काढली तरी वरती तुमची प्रार्थना तुमच्या सत्तकर्मानुसार आणि वेळ आली की मगच ऐकली जाते आणि पूर्ण होते.

पण तेवढा संयम कुठे आहे? आणि कंटाळून, त्रास करून घेऊन परत चुका करायला सुरवात होते.

कुठेही पाणी साचलं तर जो पर्यंत तिथला कचरा दूर होता नाही तो पर्यंत सगळंच तुंबून राहत. दुर्गंधी पसरते. थोडा कचरा साफ केला की थोडे पाणी निघून जाते पण तेच परत कचरा टाकला तर परत पाणी जायला वेळ लागतो.... पण तोच आजूबाजूचा कचारा साफ करताना शेवटला एकत्र येतो आणि थोडा जोर लावला की कचरा निघून जातो आणि सगळं पुन्हा सुरळीत होतं.. अगदी तसच तुमच्या आयुष्यातली पाप, दुर्गुण साफ करायला वेळ तर लागणारच... तुम्ही जसं पुण्य करायला सूरवात करता हळू हळू आनंदाचे काही क्षण तर मिळतातच... पण सगळ्यातून प्रत्येकाला बाहेर काढताना मला किती यातना होतं असतील ह्याचा विचार केला कधी? अगदी सगळं सुरळीत होणारच असतं पण ते शेवटचे चटके सहन होत नाहीत आणि परत त्याच चक्रात अडकून जातो. पण जो तरतो तो जिंकतो.
आणि त्याच तरण्यासाठी नाम घ्या, पुण्य करा, जितकी जमेल तेवढी मदत करा... वर्तमान काळात जगायला शिका... भविष्य तुमच्या वर्तमानावर अवलंबून आहे.

आणि हो, तुमच्या "टाईम प्लीज" चा वापर परत परत करत रहा... म्हणजे विचारपूर्वक निर्णय घेऊ शकाल....


* माझ्या आई वडिलांकडून आणि शिक्षकांकडून जितकं ऐकलं ते लिहिण्याचा प्रयत्न... मी खूप लहान आहे हे सांगायला. 🙏.
बरच आहे लिहायला पण आत्ता एवढेच....
धन्य ते गुरू🙏🙏

29/05/2024

I have reached 600 followers! Thank you for your continued support. I could not have done it without each of you. 🙏🤗🎉

19/03/2024

मध्यांतर....

आज खूप दिवसांनी नाटक बघण्याचा योग आला. नाटक म्हटलं की त्यातली पात्र, त्यांचे संवाद आणि कथा ही महत्वाची असतात. कलाकार, जे त्या पात्रांना जिवंत करतात, ते त्या नाटकाची उंची एका वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवतात.

पहिली घंटा वाजली.... नाट्यगृहात एक वेगळंच वातावरण होतं. सगळे जण आपापल्या जागेवर एका आशेने बसलेले, काही जण त्यांच्यात्यांचात संवाद साधत होते तर काही जण त्यांच्या लहान मुलांना पॉपकॉर्न, वेफर्स असं सगळं देऊन शांत करत होते. काही आजी आजोबा त्या इवल्याश्या प्रकाशात मोबाईल चा आवाज बंद करून द्या हो असं शेजारील व्यक्तींना सांगत होते. एकंदरीत तिसरी घंटा वाजण्याच्या आधीची गडबड , उत्साह, उत्सुकता असं वातावरण होतं आणि तेवढ्यात, कलाकारांना बघण्याची संधी सोड्याची नाही म्हणून साधारण २-३ इंच असलेल्या मानेला अजून किती उंच नेऊ शकतो असा प्रयत्न करणाऱ्या काही व्यक्ती त्यांचा प्रयत्न करत होत्या. अखेर नाटक सुरू झालं....

वेळ आली ती मध्यांतराची... नाटक, चित्रपट बघण्यामागच एक कारण मध्यंतरात तिथे जाऊन समोसा, वडापाव आणि पॉपकॉर्न खाणं हे पण असतंच. सगळे जण पटापट बाहेर कॅन्टीन जवळ गेले. इतकी लोकं म्हंटल्यावर रांगेत उभ राहणं तर होतंच..

आणि त्याच वेळी तिकडे काही मैत्रिणींचा ग्रुप उभा होता. साधारण ३५-४० वयातल्या असतील. त्यांचं एक वेगळंच संभाषण चालू होतं. त्यांच्या एका मैत्रिणीच लग्न ठरलेलं आणि लग्नाआधी केळवणासाठी त्या सगळ्या जमल्या होत्या.. ऐकून मस्त वाटलं की, ही कल्पना किती सुंदर आहे... केळवणाची... तेवढ्यात एक मैत्रीण तिला लग्न संस्थे बद्दल मत द्यायला लागली....

हल्ली घटस्फोटाचे प्रमाण खूप आहे. तू पहिल्या दिवसापासून जशी आहेस तशी वाग, उगाच स्वतःला बदलवू नकोस आणि असेच अजून सल्ले दिले जात होते. त्या लग्न ठरलेल्या मुलीच्या चेहऱ्यावर इतके हावभाव बदलत होते की जणू नाटकातलं पात्र परत समोर आल्या सारखे झाले.

मी जुळवून घेऊ शकत नाहीं म्हणून मी लग्न करणार नाही,
पगार माझ्यापेक्षा कमी आहे म्हणून मी लग्न करणार नाही, आमच्या स्वातंत्र्यावर गदा येईल म्हणून मी लग्न करणार नाही, समोरच्यांचे नखरे सांभाळायला मला वेळ आणि इच्छा नाही म्हणून मी लग्न करणार नाही असे अनेक मुद्दे दहा पैकी ५ -६ घरात रोज ऐकायला येतील. नक्कीच ही भिती मनात असते.

काही पालक लग्न का करावं, तर तुझं लग्न झालं म्हणजे आम्ही मोकळे... अशी संकल्पना जर मुलांसमोर ठेवत असतील तर आजच्या मुलांना पगार इतके आहेत आणि सोयी सुविधा इतक्या आहेत की जीवनसाथी पेक्षा companion
(सहचर) का हवा/ हवी हेच माहित नाहीये. ... मग त्या मुलीला किंवा मुलाला काय वाटतंय हे कमिवेळा विचारत घेतलं जातं. कधीकधी आपल्या आधीच्या पिढीच कौतुक आणि नवल दोन्ही वाटत की, त्यांच्या लग्नाला २५-३० वर्ष झाली तरी त्यांचं जमत नाही, भांडण चालूच असतात, एकमेकांच्या घरण्याचा उद्धार चालूच असतो पण तेच जेव्हा त्यांच्या मुलांच्या लग्नाची वेळ येते तेव्हा असे काही सल्ले देतात की जणू त्यांच्यासारखा लग्नातला समंजसपणा आज पर्यंत कोणीही दाखवला नसेल.
सत्य परिस्थिती समोर ठेवणं किती महत्वाचं आहे. मध्यंतरी एका मुलीचा मला फोन आला की, ताई मी जर आता नोकरी सोडली तर त्याने मला कमी पगाराच्या मुलांची स्थळ येतील का? ( सत्य घटना) तिकडे मला असं जाणवलं की लग्नाची व्याख्याच बदलून गेली आहे.

असो, तर आमच्या पिढीत जी भिती आहे लग्नसंस्थेला घेऊन ती जर दूर करायची असेल, तर जसं नाटकातल्या तीन घंटा असतात तसेच लग्नाची पहिली काही वर्षे ही कधी गोड कधी तिखट असतील, सकाळी जर भांडण झाले तर रात्री झोपण्यापूर्वी ती मिटवायची, एकमेकांशी आधी जुळवून घ्यायची तयारी करायची.. थोडा त्रास होईल पण तेवढंच नात घट्ट होतं जाईल.. तुमचं जुळल की मग घरातल्यानाशी जुळवायला एकमेकांना मदत करा... कारण एकमेकांची बाजू मांडणं आपल्याला सोप्पं होतं. ..

नंतर जी घंटा वाजते ती म्हणजे तुम्हाला मुलं हवंय नकोय त्याची.... हवं असेल तर मुलांच्या पुढे एकमेकांना विसरू नका. नवीन येणाऱ्या चांगल्या प्रसंगाना आणि आव्हानांना एकत्रपणे सामोरे जा.... राग, द्वेष, चिडचिड हे सगळं होईल पण समतोल साधण्याचा प्रयत्न करा.....

आत्तापर्यंत एकमेकांची इतकी सवय होते की त्या सवयीचा कंटाळा येतो आणि कधीकधी वेगळे होण्याचे विचार मनात येतात...असे विचार येऊ शकतात किंवा येणार पण नाही... जर आले तर एकत्र बसून संवाद साधा, जसं एखाद्या डब्यात जर आपण खूप गोष्टी कोंबल्या तर झाकण लागत नाही, पण जर त्यातल्या काही गोष्टी बाहेर काढल्या तर झाकण लागत... तसच रोजच्या सवयीने आपण आपल्या स्वतःला एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो आणि हीच वेळ असते हे जाणून घ्यायची की थोडी एकमेकांना स्पेस देऊया म्हणजे नाविन्य टिकून राहील आणि नवीन नात्याची गरज लागणार नाही... (काही प्रसंगांसाठी ) ( नक्कीच प्रत्येकाची situation वेगळी असतें.)

आणि ह्या तीन घंटा बहुतांश घरात वाजताताच. एकदा का ह्या तीन घंटा वाजल्या की मग तुमच्या आयुष्यात एक मध्यांतर येतो जिथे तुम्ही परत त्याच उत्साहाने, मान उंच करत एकमेकांना गर्दीत शोधायला सुरावत करता आणि जुन्या आठवणींना उजाळा देता... ही जर सत्य परिस्थिती मुलांसमोर पालकांनी ठेवली तर कदाचित खऱ्या आयुष्यात लग्न हे नाटकाप्रमाणे दोन - तीन अंकात संपणार नाही तर आयुष्यभर सुरू राहील....

हे विचार मनात आले आणि तेवढ्यात, "अहो ताई, तुम्हाला समोसा हवाय की वडापाव असा आवाज आला" आणि मध्यांतरा नंतरची घंटा वाजली......

*हे सगळं काल्पनिक पण सध्याच्या परिस्थितीबद्दल आहे...
कुणालाही उद्देशून नाही.


18-3-2024

07/03/2024

मोजमाप आधुनिक विचारांचं....

आर्यभट्टाने शून्याचा शोध लावला आणि सगळ्या आकड्यांना किंमत आणली, त्या किंमतीमुळे माणसांना मोजमाप करणं सोप झालं. आयुष्य जगताना मोजमाप हि सगळीकडे करावी लागते. अगदी जेवण बनवताना मीठ घालण्यापासून ते ताटात किती प्रमाणात भाजी असावी , सॅलड किती असावं इथं पर्यंत, घरामध्ये कोणाचं लग्न असेल तर डाएट करायचं म्हणजे तो ड्रेस / लेहंगा आपल्याला सुंदर दिसेल हे पण मोजमाप चर्चेत आहे. तसंच आपल्या घरातील कुटुंबियांना काय सांगायचं किती सांगायचं ह्याच पण मोजमाप होतंच.
बरं त्या मोजमापाची सवय इतकी झालीये कि माणसांच्या वागणुकीवरून, कपड्यांवरून ठरवतात कि लोकं आधुनिक आहेत कि जुन्या विचारांची.. कपड्यांवरून , ड्रिंक्स केला म्हणून समोरचा व्यक्ती आधुनिक आहे हि व्याख्याच चुकीची आहे. ड्रिंक्स घेणं, कुठले ब्रँडेड कपडे घालायचे हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे आणि हे प्रमाण नाही माणसंच मोजमाप करायचं.

पालक जेव्हा मुलांना शिकवणी ला पाठवतात, शाळेत पाठवतात तेव्हा मार्क्स वरून मोजमाप केलं जातं. बऱ्याचदा मुलांना concept किती समजली ते मोजमाप गरजेचं वाटत नाही. कारण प्रमाण मार्क्स दाखवत. पण जी मुलं slow learners आहेत किंवा special आहेत, ज्यांना concept समजली पण लिहिताना त्रास होतो त्या मुलांना मार्क्स मुळे वेगळं नाव दिलं जातं, त्यांना वेगळ्या मापात मांडलं जातं. शिक्षण आहे, उत्तम नोकरी आणि पगार आहे म्हणजे त्याला व्यवहार ज्ञान असेलच असं नाही. समाजात वागताना व्यवहारज्ञान महत्वाचं आहे. पैसे कोणी हि कमवू शकत.

शाळेत जर व्यवहारज्ञान मोजमाप करणारी परिक्षा असती तर कदाचित निकाल वेगळा असता. नोकरी, स्किल्स आणि व्यवहारज्ञान ह्या निकालावर द्यायची झाली तर कदाचित भारतामध्ये वेगळ जॉब मार्केट निर्माण होईल. शालेय शिक्षणात व्यवहार ज्ञान किती शिकवलं जातं ह्याचं मोजमाप करा.

मध्यंतरी पुण्यातील दोन मुलींचा एक विडिओ खूप viral झाला होता. त्यावरून हल्लीच्या मुली, मुलं, पार्ट्या करणं, पालकांचे संस्कार हे सगळं चर्चेचा विषय होता. एखाद्या डॉक्टरांचा मुलगा/ मुलगी डॉक्टर होऊन छोट्याश्या दवाखान्याचं मोठ्या हॉस्पिटल मध्ये रूपांतर करतात तेव्हा सगळे जण त्यांचं कौतुक करतात, त्यांच्या संस्कारांचं कौतुक करतात, मोजमाप करतात कि मेडिकल ला किती खर्च केला ह्यांनी, त्यांच्या मुलांनी त्याच सोनं केलं. नक्कीच कौतुकास्पद आहे.

पण जर एखाद्या कुटुंबात त्या घरातले सतत शिव्या देत असतील,चुकीचे शब्द उच्चारत असतील तर त्या वातावरणाची पुढची आवृत्ती दिसणारच एक दिवस. आपल्या मुलांसमोर ड्रिंक्स घेणं,त्यावेळी मुलांना सांगणं कि हे adult ड्रिंक आहे हे खूप व्यक्तिगत आणि वयक्तित आहे पण कधी कधी मुलं adult झाल्यावर पालकांना विचारात नाही ते डायरेक्ट कृती करतात. कदाचित विचार केला तर,घरातल्यांचा तोंडून "देशी नाही इंग्लिश घेतो/घेते" हे वाक्य किती धोकादायक आहे ह्याचा प्रत्यय देणारा तो विडिओ आहे असं वाटतं. कारण आता सगळ्यांचीच पुढचीआवृत्ती येतेय.
अगदीच जर ड्रिंक्स आणि स्मोकिंग हे आधुनिक विचारानंमध्ये मांडत असाल तर मुलांना हे समजावून देणं कि तू मोठा/मोठी झालीस कि माझ्या समोर तू ड्रिंक्स , स्मोकिंग (try) प्रयत्न कर, त्याचे परिणाम-दुष्परिणाम काय आहेत ते विचार ठेवा त्यांच्या समोर मग कदाचित त्या व्हिडिओची पुननरावृत्ती घडणार नाही.

मोजमाप व्यवहार ज्ञान आणि आधुनिक विचारांचं करूया म्हणजे एक वेगळा समाज घडवता येईल आणि त्याच्या कितीही आवृत्त्या निघूदेत कधीही चुकीचं मोजमाप होणार नाही.

Note- कुणालाही दुखवायचा हेतू नाही.

20/02/2024

The Millennials

पिढ्यानपिढ्या चालत आलेली पद्धत म्हणजे पुढच्या नवीन पिढीला नावं ठेवणं होय. मग ती नावं उद्धार करण्यासाठी असूदे किंवा कौतुक करण्यासाठी असुदे. हल्ली कानावर पडणाऱ्या पिढ्यांची नावं म्हणजे GenZ, Gen Alpha आणि The Millennials.. एकमेकांना नावं ठेवण्यापेक्षा पिढ्यांना नावं ठेवणं सोप्पं आहे.

बरं ज्यांना माहीत नाही त्यांच्या साठी Millennials म्हणजे १९८१-१९९६ ह्या वर्षात जन्मलेली मुले. GenZ म्हणजे १९९७-२०१२ ह्या वर्षात जन्मलेली मुले आणि Gen Alpha म्हणजे २०१३-२०२५ ह्या वर्षांत जन्मलेली मुले. असा हा सध्या विषय (Trend) चालू आहे.

प्रत्येक पिढी ही नवीन संस्कार आणि जीवनमूल्ये निर्माण करत असते जी त्या वयाला आणि त्या काळाला अनुरूप असतात. पण सध्या बहुचर्चित असलेली पिढी ही Millennials ची आहे. कारण आमच्या डोक्यावर एक हात " *जुनं ते सोनं* " ह्यांचा आहे तर आमच्या हातात हात " *please stop being an old schooler* " ह्यांचा आहे.. आणि ह्या दोन्ही पिढ्यांमध्ये जवळपास ६० - ७० वर्षांच अंतर आहे.

बरं, millennials ना त्यांची मत मांडणं कधी कधी इतकं कठीण होतं कारण तो समतोल साधताना त्यांच्यावर बाकीच्या दोन पिढ्यांची जबाबदारी असते. हल्ली बऱ्याचदा आपण ऐकतो की ४० वर्षाचा होता आणि heart attack ने गेला, डायबिटीस आणि बीपी सुरू झालं, ३२ वर्षांची होती आणि आत्महत्या केली आणि असे बरेच आजार झाल्याचं आपण ऐकलंय.

पण हे का होतंय? फक्त खाण्याची सवय हे कारण आहे का?
तर त्याला बरीच कारणं आहेत. Millennials एका अश्या चक्रात अडकले आहेत जिथे पैसा असेल तर एक चांगलं जीवन जगता येईल, तर तुम्हाला समाजात मान मिळेल. पूर्वीपेक्षा आत्ताचे ऑफिस जीवन वेगळे आहे. साधारणतः दिवसातले १० तास हे ऑफिस च्या कामात जातात. उरलेले २-३ तास घरची कामं करण्यात जातात..

नोकरी सोडून दुसरं काही करायचे झाले तर जबाबदारी मुळे सहज शक्य होतं नाही. आणि सामान्य मध्यम मराठी कुटुंबात हीच शिकवण असते की नोकरी सोडायची नाही, सारखी बदलायची नाही आणि गरज पडल्यास जास्त काम करायचं पण मनाला वाटलं म्हणून सगळं सोडून ब्रेक घेतला असं होत नाही. त्यातून मुलांच्या शाळेची फी, सगळेच पालक IT मध्ये नोकरी करत नाही त्यामुळे फी चा आणि इतर खर्चाचा ताण असतो तो वेगळा.

हे सगळं सांभाळताना बऱ्यापैकी millennials ची विचारसरणी अशी झाली आहे की "तुम्ही जागा आणि आम्हाला पण जगू द्या". कुटुंब पध्दती बदलली, आई वडील आणि मुलं अशी पद्धत जास्त प्रमाणात सुरू झाली. त्यावर टीका करणारे आणि समर्थन करणारे दोन्ही समाज आहेत.

आजच्या पिढीला स्पर्धा सगळीकडेच बघावी लागते कारणं नवीन दिवस नवीन बदल... नवीन बदल नवीन स्पर्धा ह्या तत्वावर जीवन जगत आहेत. नोकरीच्या ठिकाणी "तू नही तो कोई और सहि" अशी वागणूक असल्यामुळे नोकरी टिकवणे ही Millennials पुढील समस्या आहे. नोकरी टिकवण्यासाठी मुलांना वेळ दिला नाही, घरातली कामं झाली नाहीत, मुलांवर चांगले संस्कार केले नाहीत अशी अनेक उदाहरणं देऊन अपराधी भावना निर्माण करतात..

अपराधी भावनेचा परिणाम जोडप्यावर होतो आणि त्यातून उद्भवते ते म्हणजे क्लेश, भांडण, चिडचिड... कारण नकळत पणे millennials वयाच्या जोडप्याला खर काय चुकतंय हे कळतच नाही .... अहो, कुठल्या आई बाबाला वाटेल की आपल्या मुलाला, पालकांचं प्रेम म्हणजे मॉल मध्ये जाणं बाहेर खाणं, नवीन खेळणी देणं असं वाटावं...

आणि त्याच संघर्षात एकटा आहे तो " *The Millennials* "... ओले आले सारखे चित्रपट बघून सोडून द्यायला नसतात.. प्रत्यक्षात उरविण्यासाठी कधी तरी एकदा म्हणा, की थोडं थांब.. स्वतःसाठी जग... आयुष्यभर हे चालूच राहणार आहे... पण तु एकदा तरी तुझ्या स्वतःचा होऊन जग... बघ किती समाधान मिळेल....

नविन trend प्रमाणे आणि

Trend बदलत राहतील, पिढ्या बदलत राहतील आणि तसेच आपण सुध्दा स्वतः बदल घडवू....


20th Feb 2024

19/04/2023

माणूस शेवटपर्यंत हा विद्यार्थीच असतो हे वाक्य रोज अनुभवायला मिळतं. खरंच सोमवारचा दिवस काही तसाच होता. मी आणि माझे सहकर्माचारी ROI म्हणजेच returns on investment म्हणजेच गुंतवणुकीवर परतावा ह्या बद्दल बोलत होतो, की कंपनी नवीन लोकांना नियुक्त करताना त्या व्यक्तीचा ROI विचारात घेऊन मग निर्णय घेते.

खरंतर हा विषय दुपारच्या जेवणाच्या टेबलवरच संपला होता. पण माझ्या मनात वेगळाच विचार सुरू झाला,की return on investment चा विचार आपण आपल्या खाजगी आयुष्यात कधीच करत नाही. पूर्वी म्हण ऐकली आहे जसं पेरता तसं उगवतं पण कदाचित मनुष्याचा अहंकार कधीकधी इतका वाढतो की आपण नक्की काय पेरातोय ह्याकडे दुर्लक्ष होतं.

आपण ऐकतो सकारात्मक विचार करा, ध्यान करा, अहंकार बाजूला ठेवा, ऐकण सोपं आहे पण अमलात आणताना रोज कष्ट घ्यावे लागतात, कारण investment नक्की कश्यात करायची आणि किती करायची ह्याचं गणितंच उलगडत नाही.

काही नात्यांनमध्ये आपण कितीही invest केलं तरी त्याचे returns तेवढे मिळतं नाहीत कारण ते नात तेवढच असतं पण काही नाती आपोआप इतके सुंदर returns देतात की आपल्याला ५% investment पण १००टक्के गोड फळं देऊन जातात. अगदी तसच स्वतः मध्ये invest केलं तर स्ट्रेस, वेगवेगळे आजार, नैराश्य, स्वतःच्या सुखासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहणे हे सगळं निघून जाईल.

कारण ती investment म्हणजे कुठल्याही अपेक्षेशिवाय जगणं, स्वतः वर प्रेम करणं, छंद जोपासण, स्वतः च्या इच्छा स्वतः चं पूर्ण करणं आणि अश्या बऱ्याच investment schemes आहेत. पण माणूस त्या गोष्टीकडे इतकं दुर्लक्ष करतो की त्याला investment औषध, डॉक्टरांच्या फेऱ्या ह्यामध्येच करावे लागते.

बँकमधे किती invest केलं ते पासबुक भरल्यावर कळतं तसचं आयुष्याच्या पाप- पुण्याची पण एक पासबुक असायला हवी होती. रिव्हर्स entry करता आली असती की नाही माहीत नाही पण पुढच्या entry विचार करून करता आल्या असत्या.
रोज दिवस खर्च लिहून काढतो तसं रोजची स्वतः साठी केलेली investment पण लिहून काढायला हवी म्हणजे कळेल कुठल्या नात्यात किती, कुठे आणि कशी investment केली आहे.

शेवटी आपण एक वाक्य नेहमीच ऐकतो की, investments are subject to market risk. Please read the documents before investing.
स्वतःचा विचार करून invest करायचं का लोकांचा, समाजाचा विचार करून invest करायचं ते तर आपल्या आयुष्यातल्या अनुभवांचे डॉक्युमेंट्स वाचूनच ठरवायला लागेल..

ह्याला (last date) शेवटची तारीख नाहीये पण ITR file करायची शेवटची तारीख ३१ जुलै आहे बरं का....

21/04/2021

Soul respect खरंच महत्वाचा का?

जगात जन्माला आल्यापासून आपल्याला मोठ्यांचा मान ठेवा, त्यांना respect द्या असं सगळं शिकवलं जात. कधीकधी आपल्याला ज्यांना मान द्यायचा नाहीये त्यांना पण respect द्यावा लागतो. लहानांना पण रिस्पेक्ट द्या असं हि काही जण सांगतात. आयुष्यात फक्त आपण सगळ्यांना रिस्पेक्ट आणि मान द्यायलाच जन्म घेतलाय का असं वाटायला लागते.

सगळ्यात महत्वाचं रिस्पेक्ट आणि मान हा मागून मिळत नाही हे जेवढ खर आहे, तेवढच स्वतःच्या soul चा रिस्पेक्ट करणं पण तेवढंच महत्वाचं आहे. काहीजण म्हणतात कि स्वतःचे जास्त लाड करायचे नाहीत, स्वतःचा एवढा बाऊ करायचा नाही. पण हे लक्षात घ्या कि हे करणं म्हणजे soul चा रिस्पेक्ट करणं होत नाही.
एखादा जीव जन्म घेतो मग ते कुठल्याही रूपात असेल, जगतो आणि मग जातो . पण जिवंत राहतो तो फक्त आपला Soul ( आत्मा ) , मग जर आपण म्हणतो कि आत्मा हा अमर आहे तर त्याचा रिस्पेक्ट करणं हे किती गरजेचं असेल विचार करा.

कुठलाही जीव हा mind आणि soul ने बनलेला असतो. आपलं mind हे आपल्या भोवती घडणाऱ्या गोष्टींचा विचार करून, त्यांचा अनुभव घेऊन निर्णय घेतो आणि आपला soul हा एकदम pure असतो, पण जन्म घेतल्यानंतर आजूबाजूचे वातावरण त्याला घडवायला लागत असं मला वाटत.

माणसाने शिक्षणामुळे आणि त्यांचा स्टेटस काय आहे ह्यावरून जर नातं जोडण्याचा प्रयत्न केला तर कदाचित त्या नात्यात नैराश्य येईल किंवा आपण त्या व्यक्ती बद्दल त्यांचे मागे बोलायला लागतो. पण हेच जर आपण soul to soul जोडले गेलो तर खूप pure नातं निर्माण होतं. एखाद्या माणसाला जर त्याच्या नात्यातली एखादी व्यक्ती आवडत असेल पण हेच त्याच्या मुलामुलींना ती व्यक्ती आवडत नसेल तर जबरदस्ती नातं जोडण्याचा प्रयत्न करू नका. कारण तुमच्या मुलामुलींचा soul त्या दुसऱ्या soul शी नातं पुढे नेण्यात इच्छुक नसेल कदाचित किंवा जरा वेळ द्या, त्यांना त्यांचं नातं वेळ घेऊन निर्माण करू दे.

खरंतर हे फक्त मुलामुलींसाठी नाही तर सगळ्यांसाठीच आहे. Soul रिस्पेक्ट हा इतका महत्वाचा आहे कि आपण आपल्या स्वतःला आपल्या विचारांनी (thoughts) बरं करू शकतो. Soul चा रिस्पेक्ट करायचा म्हणजे काय करायचं? तर आपण मेडिटेशन करू शकतो, स्वतःच्या आवडीच्या गोष्टी करू शकतो,
ते सगळं करू शकतो ज्याने आपल्याला मनापासून आनंद मिळतो आणि शेवटी प्रत्येक soul हा वेगळा आहे त्यामुळे प्रत्येकाने ठरवायचं कि स्वतःच्या soul चा रिस्पेक्ट कसा करायचा ते.

पैसा, डिग्री , किती मोठं घर आहे ते , किती पगार आहे ते, ह्या सगळ्या मटेरिअलिस्टिक गोष्टी आहेत, पण आपल्या जवळ आपल्या मनातलं ऐकणारी व्यक्ती असेल तर त्यापेक्षा सुख नाही आणि ह्याची जाणीव गेल्यावर्षी पासून जास्त झालीये आता. मटेरिअलस्टिक गोष्टी नक्कीच मिळवायच्या पण त्या आपल्याला व्यक्त होताना अडथळा निर्माण करत असतील तर काय फायदा? अडथळा म्हणजे काय तर त्या नात्यात स्टेटसमुळे दुरावा निर्माण करत असतील तर योग्य नाही.

लहानपणी आपण काही कमावलेलं नसत त्यामुळेच कदाचित मनातलं सगळं सहज बोलायचो आपल्या भावंडांशी किंवा मित्रमैत्रिणींशी पण मोठं झाल्यावर अचानक त्याच भावंडांना आपण कमी लेखायला लागतो किंवा तो / ती लहान आहे , त्यांच शिक्षण तेवढं नाहीये कि आपले प्रॉब्लेम्स समजतील ते किंवा आपल्या level चा तो/ती नाहीयेत अश्या समजुती करून आपण व्यक्त होणं थांबवतो. पण खरंतर तेच आहेत ज्यांनी तुम्हाला लहानपणापासून घडताना बघितलंय, त्यामुळे त्या souls शी तुम्ही पटकन कनेक्ट होऊ शकते.

हे सगळं soul to soul जोडले जाणं गरजेचं आहे कारण आपला आत्मा अमर आहे आणि त्याचा रिस्पेक्ट हा सगळ्यापेक्षा जास्त महत्वाचा आहे. आपला soul हा birth to birth travel करणार आहे त्यामुळे त्याला पुढे पाठवताना full of energy आणि respect ने पाठवला तर आपल्यालाच फायदा होणार आहे.

Career counselling in Marathi #careercounselling 06/04/2021

Career counselling in Marathi #careercounselling करिअर बद्दल प्रचंड गैरसमज आहेत लोकांच्या मनात आणि तेच दूर करण्याचा प्रयत्न करतेय🙏🙏... तुम्हाला जर काही प्रश्न अस.....

Career Counselling in Marathi 06/04/2021

Career Counselling in Marathi To Quote APJ Abdul Kalam, you must dream before they can ever come true. We, at Design Career, carry a vision to guide students and alike, to pursue their dr...

05/04/2021

करिअर, soul आणि शिक्षण ...

" उच्च शिक्षण घेतलंस तरच तुझं करिअर घडेल हे लक्षात ठेव ".. सर्व साधारणपणे प्रत्येकाने हे संवाद लहानपणापासूनच ऐकलेले आहेत.
आपल्याकडे समाज आणि काही दंतकथा आपलं करिअर घडवतं कि काय असं वाटायला लागतं.

आपलं करिअर हे आपणच घडवू शकतो हे सगळ्यात मोठं सत्य आहे. शिक्षणाचा आपल्या करिअरशी काही संबंध आहे का ? जे शिक्षण घेतलं त्यातच करिअर करायचं का? करिअर निवडताना पगार किती मिळणार ह्याला महत्व द्यायचं कि नाही? असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. आपण कुठल्या प्रश्नाला महत्व देतोय ह्या वरती सगळं अवलंबून असत.

सगळ्यात महत्वाचं पालकांना एक विनंती आहे कि दुसऱ्यांच्या मुलांबरोबर आपल्या मुलामुलींची बरोबरी करू नका. प्रत्येकजण हा स्वतःचा स्वभाव, आवडीनिवडी आणि ह्या जगात जन्म घेऊन काय कार्य करायचंय हे ठरवून आलेला आहे. त्यामुळे आपण कितीही म्हंटल तरी आपण ते बदलू शकत नाही. जेवढ्या लवकर आपण हे समजू तेवढ्या लवकर करिअर बद्दलचे सगळे प्रश्न सुटतील.

शिक्षणाचा आपल्या करिअरशी नक्कीच संबंध आहे पण जरुरी नाही कि जे शिक्षण आपण घेऊ त्यातच आपलं करिअर घडेल. आपल्या छंदांना करिअर म्हणून जर आपण बघू शकलो तर त्या सारखं सुख नाही. मान्य कि सगळेच छंद आपण करिअर म्हणून बघू शकत नाही पण त्यांना आपल्या अतिरिक्त उत्पन्नासाठी म्हणून नक्कीच बघू शकतो.

हल्ली बऱ्याच वेळेला बघायला मिळतं कि विध्यार्थी इंजिनीर होऊन MBA ची पदवी घेतात , CA होऊन IT कंपनीमध्ये कॉम्पुटर संदर्भात कामं करतात किंवा सॉफ्टवेअर मधली पदवी घेऊन अध्यात्मिक क्षेत्रात कामं करतात. हे ऐकल्यावर आपण म्हणतो कि उगाच जागा फुकट घालवली पण खरंतर त्या क्षेत्रात काम केल्यावर त्यांना कळलं कि त्यांच्या soul ची इच्छा काही वेगळीच आहे. म्हणजेच त्या soul ने जन्म घेतानाच स्वतःच कार्य ठरवलं आहे पण ते कळण्यासाठी त्या व्यक्तीला कधीकधी खूप उशीर होतो किंवा खूप आधी जरी कळलं तरी हिम्मत नसते समाजाच्या विरुद्ध जाऊन निर्णय घ्यायची. पण स्वतःच्या छंदातल जर उच्च शिक्षण घेतलं तर त्याने नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे.

समाज म्हणजे फक्त माणसं नाही तर विचार, जगण्यासाठी घातलेल्या अटी, तुला एवढा पगार असेल तरच तुला किंमत आहे ह्या समाजात हे म्हणणं .... ह्या सगळ्याने आपण कधीकधी मनाविरुद्ध शिक्षण निवडतो. पगार जिथे जास्त आहे ती पदवी घेण्यासाठी धडपडतो आणि त्याचा परिणाम ताण नैराश्य ह्याला सामोरं जातो.

खरंच करिअर निवडताना आपल्या आवडीनिवडी, छंद, निवडलेल करिअर आपल्या स्वभावाला साजेस आहे कि नाही ते बघणं अत्यंत गरजेचं आहे. जवाबदारीमुळे जर आपण पगाराला महत्व देऊन वेगळं करिअर निवडल असेल तर आठवड्यातला एक दिवस तरी तुमचे छंद जोपासा ते नक्कीच तुमच्यासाठी मेडिटेशन म्हणून कामं करतील. दुसऱ्या मेडिटेशन ची तुम्हाला गरजच नाही लागणार.

शेवटी समाधान आणि पैसा हे दोन्ही जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अनुभवायला मिळालं तर नक्कीच सोने पे सुहागा ....

पालकांना एक नक्की सांगेन तुम्ही जे कष्ट घेतले ते तुमच्या मुलांबरोबर नक्की शेअर करा पण आपली मुलं त्याच साच्यात वाढतील आणि तशीच नोकरी करतील ह्याचा अट्टाहास धरू नका. प्रत्येकजण हा वेगळा आहे. तुमची साथ आणि विश्वासच त्यांना करिअर घडवायला मदत करणार आहे. एखाद्याचं करिअर लगेच घडतं तर एखाद्याला वेळ लागतो. पण मनापासून जर समोरच्या व्यक्तीच्या soul चा आदर केला आणि विश्वास ठेवला तर करिअर, soul आणि शिक्षण हातात हात घालून आयुष्य सुंदर बनवतील ह्याची खात्री आहे.

27/01/2021

" हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे."

ही प्रार्थना आजच्या काळात आपण फक्त चित्रपटातून ऐकतो. पण ह्याचा खरा अर्थ आमच्या काळात आमच्या मनात रुजवला तो आमच्या शिक्षकांनी, गुरुजनांनी. आयुष्यात कुठल्याही पदावर तुम्ही असाल, जगाच्या पाठीवर कुठेही असाल पण पहिला प्रश्न आपण विचारतो ते म्हणजे ," तू कुठल्या शाळेत होतीस? "

अहो, आपल्या शाळेतील एखादी व्यक्ती आपल्याला भेटली की जणू काही माहेरी गेल्यासारखं वाटतं.. आणि त्यातून तुमचे आई वडील जर शाळेत शिक्षक असतील तर मगं त्या माहेरच्या आठवणी अजूनच मनाला हलवून जातात..

आमच्या बाबतीत असाचं काहीसं झालं. आमची शाळा " पार्ले टिळक विद्यालय." विलेपार्ले मध्ये राहणं म्हणजे जुन्या आणि आधुनिक संस्कृतीला एकत्र हातात हात घालून चालण्यासारखे आहे. त्यातून तुम्ही पार्ले टिळक विद्यालयाचे जर विद्यार्थी असाल तर तुमचा रुबाब काही वेगळाच असतो...

" नावात काय आहे " असं जरी शेक्सपियर म्हणाले तरी "पार्ले टिळक विद्यालयाची विद्यार्थिनी " या नावात बरंच काही आहे...

२०२० ह्या वर्षावर जरी कोरोनाने हक्क गाजवला असला तरी सगळ्यात पहिला हक्क आमचा आहे. कारण आमच्या शाळेने यावर्षी शंभराव्या वर्षात पदार्पण केले आहे. शंभराव्या वर्षाचं औचित्य साधून आज " घरात आई आणि शाळेत बाई " ह्या विषयावर लिहिण्याची संधी मिळाल्याबद्दल, मी अभूतपूर्व या मासिकाचे संपादक श्री. अनिल हर्डीकर ह्यांचे आभार मानते..

" आई " एक अशी व्यक्ती जिच्या प्रेमावर कित्येक कविता रचल्या गेल्या आहेत. आईच्या प्रेमाची तुलना कुठल्याच गोष्टींशी होऊ शकत नाही. कारण तिच्या प्रेमात फक्त माया आणि जिव्हाळा असतो. पण जेव्हा तिचं आई आपल्याला शाळेत शिक्षक म्हणून लाभते तेव्हा ती कधी प्रेमळ यशोदचं रूप धारण करेल आणि कधी शिस्तप्रिय जिजाऊंच रूप धारण करेल हे सांगता यायचं नाही.

आमची आई, श्रीमती इंदिरा परशुराम पटवर्धन म्हणजे नऊवारी साडी परिधान करणाऱ्या बाई म्हणून ओळखली जायची. आई जेव्हा लग्न होऊन पार्ल्यात राहायला आली तेव्हा तिचं फक्त त्या वेळेच्या तिसरी इयत्ते पर्यंत शिक्षण झाल होतं. शिक्षणाची ओढ असल्यामुळे लग्नानंतर तिने सातवी पर्यंत शिक्षण घेऊन मॅट्रिक पूर्ण केलं. " सप्तपदी चालताना जी साथ आपण देतो" अशी साथ खऱ्या आयुष्यात आपल्या जोडीदराकडून मिळणं पण किती महत्वाचं असतं ते आमच्या नानांनी ( म्हणजेच बाबांनी श्री. परशुराम दिनकर पटवर्धन PDP sir ) ह्यानीं दाखवलं.

शाळेत ती शिस्तप्रिय शिक्षिका म्हणून प्रसिद्ध होती. शाळेत शिकवण्याचा अनुभव नसताना सुध्दा तिला हे बाळकडू कुठून मिळालं हे नवलच. मी माझा भाऊ आणि माझी धाकटी बहीण असे तिघही एकाच शाळेत होतो. त्यामुळे आमची पालक शिक्षक भेट जणू रोजचं असायची. बरं आमची आई म्हणून तिने आमच्या चुकांवर कधीच पांघरूण घातलं नाही. उलट सगळ्यात जास्त शिस्तीचं वातावरण आम्ही अनुभवलं.

माझ्या धाकट्या बहिणीला आई वर्गशिक्षिका म्हणून होती. एक अनुभव आठवतो म्हणजे तिच्या वर्गातल्या एका मैत्रिणीचा मस्ती मध्ये दात पडला. बाई वर्गात आल्यावर सगळ्यांनांच ओरडतील म्हणून त्यांनी माझ्या बहिणीच नाव पुढे केलं. पण शाळेत तिच्यातली आई बाजूला असायची आणि माझ्या बहिणीला खूप ओरडा पडला. तेव्हा बहीण काहीच म्हणाली नाही. घरी आल्यावर तिने खूप सांगण्याचा प्रयत्न केला. पण आपले विद्यार्थी खोटं बोलूच शकत नाहीत म्हणून तिचा विश्र्वासच बसत नव्हता.

हा एक आणि असे अनेक अनुभव आहेत. मात्र वेळ आणि शब्द कमी पडतील. घरात सुध्दा तिची शिस्त खूप कडक असायची. कमी खर्चात संसार सुखाचा कसा करायचा हे शिकण्यासारखं होतं. शाळेत सुद्धा उपलब्ध असलेल्या गोष्टींमधून वार्षिकोत्सिवासाठी सजावट कशी करायची ते तिच्याकडून शिकण्यासारखं आहे. तिच्या त्याच गुणाची तिला संसार सुखाचा करताना मदत झाली.

आईच्या विद्यार्थीनींनी जेव्हा शाळेत शिकवायला सुरवात केली तेव्हा त्यांच्यापुढे प्रश्न होता तो म्हणजे त्यांच्या मुलांना सांभाळणार कोण? म्हणून आई ने त्यांच्या मुलांसाठी पाळणाघर सुरू केलं आणि त्यांच्या स्वप्नांना पुर्ण करण्यास मदत केली. आम्ही जरी तिची मुलं असलो तरीसुध्दा शिस्त पाळण हे आमच्या साठी बंधनकारक होतं.

हस्तकला , हलव्याचे दागिने बनविणे, शिवणकाम ह्याची आवड असल्यामुळे आमचे आणि अगदी आमच्या मुलांचे शाळेचे गणवेष तिला जितकं वर्ष जमतील तितके वर्ष तिने शिवले. उन्हाळ्याच्या दिवसात आमच्या घरी हस्तकलेचे वर्ग भरायचे. तिच्यातली चिकाटी आणि इच्छाशक्ती ही कमाल होती आणि त्याचा प्रत्यय हा नेहमीच आम्हाला बघायला मिळाला.

तसं तर खूप आहे तिच्याबद्दल लिहिण्यासारखं पण मी इथेच थांबते कारण कितीही झालं तरी माझ्या घरातल्या आईची आणि शाळेतल्या बाईची जागा आमच्या आयुष्यात कुणीच घेऊ शकत नाही.

धन्यवाद
समस्त पटवर्धन भावंडं.
भारती, शुभा आणि वसंत.....

शब्दांकन : नेहा पटवर्धन नवरंगे

Telephone