Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shiv Sena - शिव सेना, .
महाराष्ट्र हे मराठी माणसांचं राज्य आणि मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी. परंतु मुंबईत मराठी माणूस अपमानित जिणं जगत होता. १९६१ च्या शिरगणतीनुसार मुंबईतला मराठी टक्का कमी झाला होता. शहरात बिगर मराठी लोकांचं प्रमाण ५७ टक्क्यांहून आधिक इतकं झालं होतं. हा अ-मराठी टक्का सरकारी नोकर्यांवर खुलेआम डल्ला मारत होता. तत्कालीन काँग्रेस पुढार्यांना मुंबईची आणि मुंबईतल्या मराठी माणसाची पर्वा नव्हती. या नेतेमंडळी
ंचं सगळं राजकारण ग्रामीण महाराष्ट्रात रुजलं, फोफावलं होतं. मराठी मन अस्वस्थ होतं. या विषयावर मार्मिक चं कॅम्पेन तुफान होतं. बाळसाहेबांचे दौरे सुरु होते. व्याख्यानं, सभा असा त्यांचा तडाखेबंद कार्यक्रम असायचा. विचारांचा जाळ पेटला होता. चळवळीचा व्याप तर वाढतच होता. संघटनेची वेळ येऊन ठेपली होती. मराठी माणूस पुरता कातावून गेला होता. आतल्या आत धुमसत होता. वातावरण तापलं होतं, मराठी माणसाला मन्वंतराचे वेध लागले होते आणि राजकारण अशा दिशेने चाललं होतं की मराठी माणसांच्या संघटनेशिवाय चालण्यासारखं नव्हतं किंबहुना ती काळाची गरज होती. आणि १९ जून १९६६ रोजी जन्म झाला एका सेनेचा... शिवसेनेचा... शिवसेना म्हणजे शिवाजीची सेना. छ्त्रपती शिवाजी महाराज हे शिवसेनेचं आराध्य दैवत. महाराज भवानी मातेचे फार मोठे अन् प्रखर भक्त. ’वाघ’ हे आई भवानीचं वाहन. म्हणून शिवसेनेचं बोध-चिन्ह वाघं असावं असं बाळासाहेबांच्या मनांत आलं. वाघ म्हणजे रुबाब, मस्ती अन् आक्रमकपणा. शिवसेनेचा सार व्यक्त होणार्या बोधचिन्हाला साकारले खुद्द बाळासाहेबांनीच! ३० ऑक्टोबर १९६६ रोजी महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्फूर्तिदायक चरणांवर प्रतिज्ञेचा माथा ठेऊन, महाराष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी सिद्ध झालेल्या शिवसेना सैनिकांचा पहिला मेळावा शिवतीर्थावर आयोजित करण्यात आला. दृष्ट लागवी असा स्थापना मेळावा झाला. शिवाजी पार्क खच्चून भरलेल,रस्ते तुंबले,गल्ल्या भरल्या. ’मार्मिक’ वगळता इतर कोणत्याही वर्तमानपत्रात सेनेच्या शुभारंभाच्या मेळाव्याची घोषणा अथवा जाहिरात नव्ह्ती. तरीही, मुंबई आणि महाराष्ट्रातल्या अन्य भागांतून मेळाव्याला भरघोस प्रतीसाद मिळाला. चैतन्यमय आणि संघर्षशील.... असे होते शिवसेनेचे सुरुवातीचे दिवस. पहिली सभा दणक्यात झाली. मराठी तरुणांचे तांडे ७७-ए ,रानडे रोडकडे वळू लागले. ’मार्मिक’ वर वाचकांच्या उड्या पडत होत्या. बाळासाहेबांच्या वाणीला आणि शब्दांना एक वेगळीच धार चढत होती. व्यायामशाळा,स्थानिक क्रिडासंस्था अन् गणपती-गोविंदा मंडळं यांच्या मदतीने सेनेचं ’नेटवर्किंग’ जोरात सुरु होतं. मराठी माणसांच हक्काचं माहेरघर म्हणून शिवसेनेची घोडदौड सुरु झाली. बाळासाहेब-शिवसेना म्हणजे राजकिय अविष्कार, हिंदुत्वाचा झंझावात, शिवसेना म्हणजे घटनांची रेलचेल, अनंत आंदोलने, असंख्य जाहीर सभा, मेळावे, शिवसेनाप्रमुख बाळसाहेब ठाकरेंचा करिश्मा, शिवसेना कार्यप्रमुख उध्दव ठाकरेंचा कणखर बाणा, शिवसेनेच्या कुटुंबाचा एकोपा, शिवसैनिकांची निष्ठा, मराठी माणसांचा विश्वास...हीच आपली शिवसेना...एक भगवा झंझावात! शिवसेनेचा मराठी माणसाशी असणारा संबंध अतूट राहिला आहे. इतक्या वर्षांत तीन पिढ्या तरूण होऊन गेल्या. येणारी प्रत्येक पिढी नव्याने इमान घेऊन शिवसेनेत सामील होत आहे. या भगव्या झंझावातास थांबविण्याची ताकद कोणाकडेही नाही. कारण ही भगव्या तुफानीची आगेकूच म्हणजेच आहे हिंदुत्वाची आगेकूच, मराठी माणसाची आगेकूच.